येरे येरे पावसा..
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
लहानपणी पावसात भिजला नसेल असा माणूस दुर्मिळच. जून-जुलैला सुरुवात झाली की, लहानपणी खरंतर शाळेत जाण्याची लगबग असायची. पण त्याहीपेक्षा 'एक्साइटमेंट' असायची ती पावसाची. मला आठवते सायंकाळी पाच वाजता शाळा सुटेपर्यंत दिवसा उकाड्याने व अभ्यासाने हैराण झालेले आम्ही सारे दोस्तमंडळी. सायंकाळच्या गारव्याने अन पावसाची चाहूल लागल्याने काहीसे सुखद अनुभवायचो. एरवी 'शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली.' असा आरडाओरडा करत शाळा कधी सुटते अन कधी घरी जातो, अशा उत्साहातील आम्ही.
पावसाचा जोर ओसरला की मलाही घराची ओढ लागायची. तोपर्यंत नाले, ओढा, गल्ली-गल्लीतून पाणी खळखळत वाहायचे. आमचे ते 'टायटॅनिक' तर कधीच पाण्याखाली गेलेले असायचे आणि अशातच घराच्या अंगणात येऊन मी उभा राहायचो. आनंदाने फुललेला चेहरा थोडा पाडून थांबायचो तोच बाळा अरे! ताप, सर्दी होईल पुरे झाले आता चल ये घरात! असा वात्सल्यपूर्ण पण थोडा रागीट असलेला स्वर कानावर पडला की घरात जावंच लागायचे. अगदी तोपर्यंत पाऊस जणुकाही त्याच्या आईच्या धाकाने परतलेला आहे, असेच वाटायचे.
यानंतरच्या सृष्टीचे रूप त्या बालवयात अत्यंत आनंद द्यायचे. हळूच इंद्रधनुचे सप्तरंग बाहेर यायचे आणि आपणच सप्तरंगी झाल्याचा भास मला व्हायचा. यानंतर व्हायचा तो प्लान गावाकडच्या टेकडीवर जायचा आहा! उंच उंच टेकडीवरून दिसणारे हिरवेगार शेत, तलाव, कौलारू शाळा, गावातलं मुक्ताई देवीचं मंदिर हे सारं माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव असायचा. यातच टेकडीवर रंगायचा लपंडावाचा खेळ. कसा? प्रत्येकाने त्या टेकडीवरून आपले घर शोधायचे. खरं तर घर जेथे आहे तेथेच असायचे. पण, ते कोठेतरी झाडाच्या आड लपतयं आणि अशातच सापडलं... सापडलं म्हणत लपंडावाचा खेळ पहिला मीच जिंकला या आनंदात टेकडीवरून सरसर खाली उतरायचो. खरंतर टेकडीवरून मी खाली यायचो पण आनंद हा गगनाला भिडायचा. पुन्हा एकदा तोच पाऊस भरून आलाय. कदाचित पुन्हा कोणीतरी पावलांची गती संथ करून निघाला असेल घरून आपली नाव वल्हवत, म्हणत येरे.. येरे.. पावसा....
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.