१०/८/२०

मुंबईला तुंबई पासून वाचवा

मुंबईला तुंबई पासून वाचवा
-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)

मुंबईत धुवाधार पावसाला सुरुवात झाल्यावर २६ जुलै २००५ रोजी मुंबईत मुसळधार पडलेला पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे उडालेल्या थरकापाची मुंबईकरांना आजही तितकीच आठवण होते. इतकी वर्ष होऊन सुद्धा मुंबईकरांच्या मनातील पावसाळ्याची भीती जरासुद्धा कमी झालेली नाही. देशाची ही आर्थिक राजधानी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने अजूनही ठप्प होते. रस्त्यावर साचलेले पाणी, विस्कळीत झालेली रेल्वे आणि विमान सेवा मुंबई दरवर्षी अनुभवत आहेत. वारंवार येणारे पुर, विस्कळीतपणा यातून यातून पुनः पुन्हा एकच गोष्ट स्पष्ट होते ती अशी की, आपल्या शहरी क्षेत्रांमध्ये पाण्याचे पारंपारिक स्तोत्र दुर्लक्षित केले गेले आहेत. वास्तविक ते सर्वांसाठी कितीतरी फायदेशीर होते.
मुंबईत पावसाचे पाणी भरणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. यावर्षी तसे घडले आणि धावती मुंबई ठप्प झाली यात काही नवीन नाही. वस्तुतः अनेक शहरांची हीच गत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक जलस्तोत्रांकडे केलेले दुर्लक्ष. असेच जलस्त्रोत मृत किंवा निरुपयोगी मानून जमीन वापरात बदल करणे ही जमीन विकासकांच्या हवाली करणे आणि तिथे उत्तुंग इमारती बांधणे ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू असल्यामुळे नैसर्गिकरित्या होणारा पावसाच्या निचरा थांबलाच; शिवाय भूजल पातळी वाढण्यालाही मर्यादा आल्या.


मुंबईत जमिनीत पाणी भरण्यासाठी आता एक इंचही जागा शिल्लक राहिलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने मुंबईकरांच्या रोषापासून वाचण्यासाठी सरसकट सर्वच रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एवढया मोठया प्रमाणात काँक्रिटिकीकरण मुंबईत होत असल्याने पाणी जमिनीत मुरणार तरी कुठे?

तसेच मुंबईत उद्याने आणि मोकळ्या जागा दहा टक्के देखील नाहीत. तसेच उद्यानात पाणी मुरले तरी इतर अवाढव्य पसरलेल्या मुंबईचे काय करणार हाही प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत जमिनीत पाणी मुरण्यास पूर्वी कांदळवन, दलदल आणि मिठागरांच्या जमिनी मुबलक प्रमाणात होत्या. काळाच्या ओघात  कांदळवनांवर आणि मिठागरांच्या जमिनीवर प्रचंड अतिक्रमण झाले आहे. या नैसर्गिक जागा कमी झाल्याने पाणी मुरण्यास जागा शिल्लक राहिली नाही. ठिकठिकाणी असलेले पेव्हर ब्लॉकचे रस्ते हेही आणखी कारण ठरले आहे. ब्रिटिश काळातही इतका पाऊस पडत होता. मात्र, मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणात असल्याने ही समस्या उद्भवत नव्हती. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मुंबईचा राक्षसी विकास मुंबईला मारक ठरत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नाल्यांच्या प्रवाहात घरातील केरकचरा, प्लास्टिक पासून टेबल, खुर्च्या, सोफासेट पासून सगळं काही स्वाधीन होते. त्यामुळे सरकारी यंत्रणांना दोष देताना एक बोट आपल्याकडेही ठेवावे लागेल. नदीपात्रात, नाल्यात अतिक्रमणाचे मोठे प्रमाण वाढले आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जितकी जबाबदार नागरिकांची तितकीच राजकारणी व सरकारी यंत्रणांचीही आहे. फक्त निसर्गाला दोष देऊन आपण आपली जबाबदारी टाळू शकत नाही.

महामुंबई साठी किती यंत्रणां व किती प्राधिकरणे काम करतात? मुंबई महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, नगरविकास खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास महामंडळ वगैरे झोपडपट्टी पुनर्वसन खाते. एवढ्या यंत्रणा एकट्या मुंबईत काम करीत आहेत. एवढ्या यंत्रणा एकट्या मुंबईत काम करीत असतानाही पावसामुळे मुंबई दरवर्षी जलमय होते व त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. तुंबलेलेले पावसाचे पाणी मुंबई प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे दरवर्षी वेशीवर टांगते.

तसेच पालिका जितके लक्ष पर्जन्य जलवाहिन्यांवर देते तितके छोट्या-मोठ्या गटांवर देत नाही. बाजारांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गटारांमध्ये कचरा साचून राहतो. पावसाळ्यात हा कचरा अडकून गटारे तुंबतात. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास पोलीस कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. तसाच बाजारांच्या, मंडयांच्या आणि झोपडपट्ट्यांमध्येही घेण्याची गरज आहे. गटारांच्या साफसफाईला ही महत्त्व द्यायला हवे.
1 टिप्पणी:

  1. गटारांच्या साफसफाईला ही महत्त्व द्यायला हवे. छान लेख लिहिला आहे.

    उत्तर द्याहटवा

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...