Ticker

10/recent/ticker-posts

पावसाळ्यात आरोग्य जपा

पावसाळ्यात आरोग्य जपा
-दादासाहेब येंधे
(dyendhe1979@gmail.com)

सध्या पावसाळा सुरू आहे. दरवर्षी येणारा पावसाळा विविध साथीच्या आजारांना देखील आमंत्रण देत असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळी दिवसांमध्ये योग्य आहार व साथीचे आजार टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या तर साथीच्या आजारांपासून आपल्याला संरक्षण करता येईल. यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे. या दिवसात बाहेरील पदार्थ न खाणे चांगले. दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच लहान मुलांकडेही लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना किरकोळ वाटणाऱ्या आजारांबाबत तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हितकारक आहे. 



पावसाळ्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळेही अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्या दरम्यान गॅस्ट्रो, टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासारखे आजार मोठ्या प्रमाणात होत असतात. या आजारामुळे दरवर्षी अनेक लोक मृत्युमुखी पडतात. प्रशासनाने आजारांचा सामना करण्यासाठी कंबर कसली असली तरी आजार उद्भवण्याच्या प्रमाणात फार कपात होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. दरवर्षी आजारी पडणाऱ्या  रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. यावर वेळीच आळा घातला गेला पाहिजे व आपणही काही नियम, पथ्ये पाळून प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे.

मुंबईत दरवर्षी अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्यातून सर्वसामान्यांना होणारा आजाराचा प्रादुर्भाव अधिक असतो. पावसाच्या पाण्यात चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. साचलेल्या पाण्यातून चालणे हे आजार बळावण्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्ती स्थळे मुंबई अधिक आहेत. पूरसदृश्य पस्थितीमध्ये साथीचे आजार वेगाने वाढतात. त्यादृष्टीने विचार करणे गरजेचे आहे.

लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू यासारखे आजार पावसाळ्यामध्ये झपाट्याने वाढतात. मुंबईमध्ये सव्वा कोटींची लोकसंख्या मर्यादित जागेमध्ये राहते. त्यामुळे या आजारांचा प्रादुर्भावही झपाट्याने होतो. साथींचे आजार कशामुळे होतात याची माहिती अनेकांना नसते. ती माहीत करून घेणे गरजेचे आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याने होणारे आजार याला साथीचे वा संसर्गजन्य आजार असे म्हटले जाते. पाणी, हवा, अन्नातून होणाऱ्या प्रादुर्भावामुळे हे आजार पसरतात. पसरणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया पाण्यामार्फत पसरणारे आजारांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ यांचा समावेश असतो. लेप्टोस्पायरोसिस हा मातीच्या पाण्याच्या प्रादुर्भावातून होऊ शकतो.

तसेच घरांमध्ये पाणी साठवण्याच्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित बंद करावीत. त्यामध्ये फट असेल तर डासांचा शिरकाव होऊ शकतो. मच्छरदाणीचा वापर करावा. घरात व परिसरामध्ये कोणत्याही ठिकाणी पाणी जमा होऊ देऊ नये. नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक पिशव्या तसेच त्यांच्यामध्ये पाणी साठले तर मोठ्या प्रमाणात डासांची वाढ होते. साचलेल्या पाण्यातून चालत आल्यानंतर जलजन्य आजार होण्याचा प्रादुर्भावही वाढतो. त्यादृष्टीनेही प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात तापाची बदलती लक्षणे पाहता कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर काढू नये. २४ ते ४८ तासांत ताप उतरला नाहीतर, त्वरित डॉक्टरांना दाखवावे. त्यांनी सांगितलेल्या आरोग्य चाचण्या करून वैद्यकीय उपचार सुरू करावेत. रुग्णालय पातळीवर जनजागृती डासांची उत्पत्ती स्थळं नष्ट करणे आवश्यक आहे .

सतत उलट्या होणे, जुलाब होणे, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, गळून गेल्यासारखे वाटणे, हातपाय दुखणे, खूप थकवा जाणवणे आदी पाण्यातून प्रादुर्भाव होणाऱ्या आजाराची काही सामायिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवू लागल्यास अंगावर काढू नयेत. घरगुती औषधांवर चालढकल करु नये. डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावा. औषधांचा कोर्स पूर्ण करावा. गरज पडली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचणी करावी. आजाराची लक्षणे आढळल्यास प्राथमिक स्वरूपात 'ओआरएस' पाणी पिणे फायदेशीर ठरते. ओआरएस  उपलब्ध नसलयास हलका आहार घ्यावा. भाताची पेज, सरबत, ताक, नारळ पाणी आदी भरपूर प्रमाणात सेवन करावे. जेणेकरून, अशक्तपणा नाहीसा होऊन प्रति रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या गंभीर रूप धारण करू नये यासाठी आजारपणाची लक्षणे जाणवल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यातच उपचार घेणे फायदेशीर ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या