आरोग्यदूतांना मानाचा मुजरा...
-दादासाहेब येंधे
सध्या संपूर्ण जगासह आपल्या देशावरही महाभयंकर अशा कोरोना या रोगाचे सावट आहे. देशभरात या रोगाचे जेवढे रुग्ण आहेत त्यातले सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या रोगाने बाधित झालेल्यांची संख्या वाढत असताना राज्यातल्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस, स्वच्छतादूतांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णसेवेला समर्पित केले आहे. खरे तर इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच जेव्हा कोरोनासारखे महासंकट उभे रहाते तेव्हा त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण येणे स्वाभाविक आहे. परंतु, या आव्हानांवर मात करत महाराष्ट्रातल्या आरोग्यदूतांनी आपली रुग्णसेवा चालू ठेवली आहे. आरोग्यदूतांना किती आव्हानांना सामोरे जावे लागत आहे हे बातम्यांमधून आणि समाजमाध्यमांवरच्या व्हिडिओमधून समोर येत आहे. संसर्ग होऊ नये यासाठी सतत विशिष्ट पोषाख घालून डॉक्टर आणि नर्स यांना रुग्णांच्या सोबत वावरावे लागते. कामाचे तास संपल्यानंतर विशिष्ट पद्धतीने हा पोशाख त्यांना काढावा लागतो. हा संसर्गरोधक पोशाख इतके तास जवळ बाळगणे म्हणजे स्वतःला त्यात कोंडून घेण्यासारखेच आहे. रुग्णाचा जीव वाचवताना या आरोग्यसेवकांना मेहनत घ्यावी लागतेच. पण त्यासोबत स्वतःलाही संसर्ग होऊ नये याचीही सातत्याने काळजी घ्यावी लागते. स्वतःला संसर्गापासून वाचत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबालाही संसर्ग होण्यापासून रोखायचे असते. तपासणीसाठी आलेला एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे आणि कोणता निगेटिव्ह हे तपासणी नंतरच कळते. तोपर्यंत त्या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांनाही संसर्गाचा धोका असतोच असतो. तरीही हे आरोग्यदूत कशाचीही तमा न बाळगता रुग्णसेवेसाठी उभे आहेत.
नागरिकांच्या आरोग्यासाठी पाणीखाते, महापालिका, ग्रामपंचायतीचे सफाई कामगार रस्त्यावर उतरून करणारे दोन हात करत आहेत. आपल्या रोजच्या दिवसाची सुरुवात जणू गटारी, रस्ते आणि नालेसफाईने ते करत असतात. आरोग्यदूतांच्या रूपात काम करणाऱ्या सफाई कामगारांमुळे देशवासीयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येकजण लढत असताना या आजाराला घाबरून स्वच्छतेच्या कामापासून पळ कसा काढायचा? हे आम्हाला जमणार नाही, स्वच्छतेचे काम स्वीकारले आहे ते पूर्ण करणारच, कामापुढे जीव महत्त्वाचा नाही.... ही भावना जणू मनाशी बाळगून स्वच्छता कामगार कर्तव्य पार पाडत आहेत. लॉक डाऊनमुळे देशाचा प्रत्येक नागरिक घरात अन आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार रस्त्यावर अशी स्वच्छता साखळी तयार करून करून कोरोनाला घराच्या बाहेरच रोखून ठेवण्याचं काम जणू हे योद्धे करत आहेत.
कोरोनासारख्या महामारीच्या वेळी घराच्या बाहेर राहून स्वच्छतेचं हे काम अतिशय जोखमीचे बनले आहे. पण, जिगरबाज सफाई कामगार कोणालाही न घाबरता तोंडाला मास्क लावून आणि हॅन्ड ग्लोज वापरत स्वच्छतेचे काम करत आहेत. गोळा केलेला ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून तो रोजच्या रोज डंपिंग ग्राउंडवर जात आहे. एवढेच नव्हे तर हे स्वच्छतादूत नागरिकांना स्वच्छतेची माहितीही देत आहेत. अशा या सफाई कर्मचाऱ्यांना सलाम..!
1 टिप्पण्या
मस्त लेख लिहिला आहे. हे खरे कोविड योद्धे आहेत.
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.