Ticker

10/recent/ticker-posts

सायबर चोरांचा गॅसला सिलिंडरला विळखा

विद्यार्थी, व्यावसायिक आणि निवृत्त नागरिकांची मोठी संख्या डिजिटल देयक प्रणाली वापरत असल्यामुळे नागरिक अशा फसवणुकीचे लक्ष्य बनत आहेत. सायबर फसवणूक करणारे लोक जाणूनबुजून ग्राहक सेवांशी संबंधित कथा वापरतात. कारण त्या विश्वासार्ह वाटतात. आणि लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या असतात.

-दादासाहेब येंधे

अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे गॅस सिलिंडरचा नागरिकांना तुटवडा भासत असतानाच एलपीजी गॅस सिलिंडरच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याअंतर्गत ग्राहकांना ग्राहकांना केवायसी, बनावट बिले आणि सेवा बंद करण्याच्या धमक्या सायबर चोरांकडून दिल्या जात आहेत.
एलपीजी गॅस पुरवठा, वाढती गॅस बिले आणि केवायसी पडताळणीसंदर्भातील संदेश राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत असताना सायबर भामटे या दैनंदिन चिंतेचा फायदा घेत नवनवे घोटाळे करत आहेत. सध्या वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये बनावट गॅस बिलाचे संदेश, एलपीजी केवायसी पडताळणीचे फोन आणि तातडीने सेवा बंद करण्याच्या धमक्यांचा समावेश आहे. तत्काळ केवायसी तपशील अद्ययावत केले नाहीत तर त्यांचे गॅस कनेक्शन बंद केला जाईल, असे संदेश अनेक नागरिकांना येत आहेत.


तुमचे बिल सिस्टीमवर दिसत नाही ते त्वरित भरा अन्यथा गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवून डोंबिवलीतील एका महिलेला सायबर चोरट्याने तीन लाखांना फसवले आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावर हे सायबर चोरटे आपली फसवणूक करून स्वतःचा खिसा भरताना दिसत असून त्यांनी फसवणुकीचा हा नवा फंडा शोधला आहे. डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या स्मिता राणे यांच्या पतीच्या मोबाईलवर गेल्या आठवड्यात एक एसएमएस आला होता. तुम्ही भरलेले महानगर गॅस बिल आमच्याकडे दिसत नाही. तातडीने अपडेट न केल्यास गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल असा इशारा त्यांना देण्यात आला होता. सिलेंडर गॅस तुटवड्याच्या चिंतेत असल्याने स्मिता राणे यांनी घाईघाईने त्या मेसेज मधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला महानगर गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांना विश्वासात घेतले व त्यांना एक लिंक पाठवली. ती लिंक उघडल्यावर आणि त्यात राणे यांनी त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती भरली. त्याच दरम्यान त्यांच्या क्रेडिट कार्ड मधील दोन लाख रुपये आणि डेबिट कार्ड मधून ९९ हजार ५०० असे एकूण २ लाख ९९,५०० रुपये सायबर चोरट्याने काढून घेतले होते. काही वेळाने बँकेचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे राणे यांच्या लक्षात आले.


सध्या विद्यार्थी, व्यावसायिक आणि निवृत्त नागरिकांची मोठी संख्या डिजिटल देयक प्रणाली वापरत असल्यामुळे नागरिक अशा फसवणुकीचे लक्ष्य बनत आहेत. सायबर फसवणूक करणारे लोक जाणूनबुजून ग्राहक सेवांशी संबंधित कथा वापरतात. कारण त्या विश्वासार्ह वाटतात. आणि लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या असतात.

भीती, तातडीची भावना आणि अधिकृततेचा आभास या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणामुळे अनेकदा लोक स्वतः ची सुरक्षित ठेवणारी माहितीही शेअर करतात आणि फसतात.

काही साध्या गोष्टी आपण लक्षात घेतल्यास अशा केवायसी फसवणुकीपासून मोठ्या प्रमाणावर बचाव होऊ शकतो. अपरिचित कॉल किंवा संदेशातून आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नये आणि ॲप इन्स्टॉल करू नये. ओटीपी, बँकिंग तपशील किंवा डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नये.


* गॅस केवायसी किंवा बँक पडताळणीबाबत संदेश आल्यास लिंकवर लगेच क्लिक करू नका.


* अधिकृत संकेतस्थळ किंवा ग्राहक सेवा क्रमांकावरून पडताळणी करा.


* अपरिचित व्यक्तीने सांगितलेले ॲप डाऊनलोड करू नका.


* पैसे किंवा ओटीपीशी संबंधित तातडीची कृती करण्यास सांगितले तर आधी माहितीची खात्री करा.


* संशयास्पद संदेशाविरोधात त्वरित हालचाल करा.


* तुम्हाला संशयास्पद संदेश किंवा फोन आला असेल तर राष्ट्रीय सायबर गुन्हे मदत क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या