Ticker

10/recent/ticker-posts

नात्यात प्रेम व्यक्त करणे गरजेचे

कोणत्याही नात्याचा पाया संवादावर आधारलेला असतो. नवरा-बायकोमधलं संभाषण कमी झालं किंवा एकमेकांचं बोलणं नीट ऐकलं नाही किंवा लक्ष दिलं नाही तर नात्यात दुरावा येऊ लागतो. कोणत्याही नात्यात संवादाचा अभाव गैरसमजांना जन्म देतो. हळूहळू यामुळे नात्यात दुरावा येतो. पती-पत्नीच्या नात्यात कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. काही वेळा कुटुंबातील सदस्य किंवा मित्र, मैत्रिणीच्या मतामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. अनेकदा लोक आपल्या जोडीदारापेक्षा तिसऱ्या व्यक्तीला जास्त महत्त्व देतात. यामुळे त्यांचं नातं बिघडतं.


-दादासाहेब येंधे

लग्न ही जीवनातील मोठी गोष्ट आहे. हे नातं जन्मोजन्मीचं असतं. हे नातं निभावताना कधी गोड तर कधी कडू अनुभव येत असतात. पण संसार म्हटलं तर असं चालायचंच. कधी पैशाचा वाद, कधी घरच्यांच्या वागणुकीमुळे होणारे वाद तर कधी शुल्लक वादही या संसारात अनुभवयाला मिळतात. अनेकवेळा काही जोडपे त्याकडे दुर्लक्ष करतात. तर काहींची कडाक्याची भांडणं होतात. पण या समस्यांचे वेळेवर समाधान करून आपण आपल्या नात्याला आनंदी आणि मजबूत बनवू शकतो.


वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. नव्याची नवलाई संपली की नात्यातला गोडवा हळूहळू कमी व्हायला लागतो. 



एकमेकांना वेळ द्या - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांशी संवाद कमी होत चाललाय. रोजरोज काय बोलायचे या विचाराने एकमेकांसोबत वेळ घालवणे तर सोडाच पण साधी विचारपूस करणंही दूरचीच गोष्ट झाली आहे असे दिसून येत आहे. करिअरच्या मागे धावता धावता एकमेकांना द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही. जर नात्यातला ताजेपणा टिकवून ठेवायचा असेल तर एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे. कामावरून घरी परतल्यानंतर एकत्र चहा घेत एकमेकांशी गप्पा मारा. रात्रीचे जेवण एकत्र, एकमेकांसोबत घ्या. एकमेकांच्या कामाची विचारपूस करा. वादाचे विषय अशावेळी बाजूला ठेवा. तेवढ्यानेही तुमच्यातील नाते घट्ट व्हायला मदत होईल.


संवाद साधा- नवरा-बायकोच्या नात्यात संवाद असायलाच हवा. संवाद असेल तरच नातं व्यवस्थित राहतं. पण अनेकदा नात्यात संवादाचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे गैरसमज वाढतात आणि त्याचं रुपांतर भांडणात होऊ शकतं. कधी कधी तर, हे नातं तुटण्याचं कारण बनतं. म्हणून, दोन्ही पार्टनर्सनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला पाहिजे. चांगला संवाद साधण्यासाठी, दोघांनाही एकमेकांना ऐकून घेऊन समजून घेतलं पाहिजे.


तडजोड करायला शिका- एकदा एखाद्या व्यक्तीला आपलं म्हटलं की त्या व्यक्तीला तिच्या गुणदोषांसकट स्वीकारणे गरजेचे आहे. एकमेकांच्या मताचा आदर करणे गरजेचे आहे. प्रत्येक नात्यात केव्हा ना केव्हा तरी त्याग, तडजोड ही करावीच लागते. नव्या नवलाईच्या दिवसात सगळच गोड गोड आणि छान वाटत असतं. पण, नव्याचे नऊ दिवस संपले की, खटके उडायला सुरुवात होते आणि नात्यात ताण निर्माण होतो. म्हणूनच प्रत्येकाने आपला इगो, गर्व बाजूला ठेवणे गरजेचे आहे. 


नेहमी खरं बोला- नातं टिकवण्याची सर्वात मोठी आणि पहिली अट म्हणजे नेहमी खरं बोला. पार्टनरसोबत आपले विचार, भावना आणि इच्छा व्यक्त करा. आपल्या पार्टनरसोबत कधीही खोटं बोलू नका किंवा बहाणे बनवू नका. पारदर्शिकता संबंधांमध्ये विश्वास आणि स्थिरता आणते. म्हणून समस्यांना लपविण्याऐवजी खुलेपणाने बोला.


भावनिक गुंतवणूक महत्त्वाची- सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांची एकूणच भावनिक गुंतवणूक कमी होत चालली आहे. पण, एकमेकांचा विश्वास आणि एकमेकांच्या भावनांचा आधार हीच आदर्श नात्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे जोडीदाराच्या भावना समजून घेऊन प्रेमाने आणि विश्वासाने एकमेकांशी सगळी गुपिते शेअर करा. तरच तुमचं नातं सुदृढ राहील.


रोमँटिक डेट- नात्यात पुन्हा पूर्वीसारखा तजेला आणायचा असेल तर जोडीदारासोबत एखाद्या छानशा ठिकाणी डेटवर जा. एखादी कॉफी डेट किंवा समुद्रकिनारी घालवलेले एकांताचे क्षण अनुभवा. ते एकांताचे क्षण तुमच्या जुन्या दिवसात तुम्हाला नक्कीच घेऊन जातील. न ठरवता अचानक एखाद्या विकेंडला आउटिंगला जाऊन मजेचा अनुभव घ्या.


सरप्राईजची मजा- नात्यांमधली वीण घट्ट करण्यासाठी कधीकधी छोटे छोटे सरप्राईज, गिफ्ट कामी येतात. म्हणूनच खास दिवस नसतानाही एखादे छानसे गिफ्ट किंवा फुलांचा गुच्छ एकमेकांना द्या. आज आपण बाहेरच जेऊ या इथपासून ते ऑफिस मधून लवकर निघून एकमेकांना भेटा  कधीतरी एकमेकांच्या मनासारखं तयार होऊन एकत्र फोटो काढा.



प्रेम व्यक्त करा- प्रत्येक वेळी शब्दातून किंवा गिफ्ट देऊनच प्रेम व्यक्त होते असे नाही तर तुमच्या कृतीतून आणि देहबोलीतूनही ते समोरच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. पण, ते व्यक्त मात्र व्हायला बऱ्याचदा आपण जोडीदाराला गृहीत धरून चालतो. त्यातून मग वाद विवाद आणि ताण निर्माण होतात. हे टाळण्यासाठी प्रेम व्यक्त करायला शिका.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या