-दादासाहेब येंधे
वसंतपंचमी नंतर ४० दिवसांनी येणारी ही होळी; हा हिंदूंचा एक धार्मिक सण आहे. होळी या सणाला रंगाचा, प्रेमाचा आणि वसंत ऋतूचा सण असेही म्हणतात. होळीपासून हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात होते. फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी विधिवत अग्नीची पूजा करून होलिकाच्या दहनाने होलीकोत्सव सुरू होतो. त्यासाठी शेकोटी पेटवली जाते. या शेकोटीत वाईटाचा नाश व्हावा अशी प्रार्थना करतात. हीच छोटी होळी. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाने खरी होळी सुरू होते. 'वाईट शक्तीच्या दहनाचे प्रतीक म्हणजे होळी.' 'आयुष्यात चांगुलपणाचा वाईटावर नेहमीच विजय' ही होळीची शिकवण देणारी ऐतिहासिक गोष्ट.
हिरण्यकश्यपू असूरांचा राजा होता. त्याला मिळालेल्या विशेष वरदानामुळे तो उन्नत होऊन स्वतःला देव समजू लागला होता. त्याच्या आग्रहामुळे भीतीपोटी सारी प्रजा त्याची पूजा करीत होती. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता. प्रल्हादाला विष्णूच्या भक्तीपासून दूर करण्यासाठी हिरण्यकश्यपूचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीपासून बचावाचे वरदान मिळालेले असल्याने तिने प्रल्हादाला फसवून मांडीवर घेत अग्नीच्या चितेत ती बसली. पण, भगवान विष्णूने भक्त प्रल्हादाला वाचविले आणि दुष्ट मनाची होलिका आगीत जळून भस्मसात झाली. होलिकाला जाळणे म्हणजे दुष्ट विचार, प्रवृत्तीला जाळणे होय अशी आख्यायिका आहे.
त्याच रात्री होणारी शिमग्याची बोंब हा जुन्या काळात एक जागर होता. अग्नीला साक्ष ठेवून गत वर्षातील चुका जाळून भूतकाळ विसरून दहन करा, आणि येणाऱ्या वसंत ऋतूचे स्वागत करा असे म्हटले जाते. म्हणून होळीला वसंत ऋतू सण असेही म्हणतात. होळीच्या भडकलेल्या ज्वालेत प्रत्येकाचा चेहरा उजळून निघतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला, मैत्रीच्या भावनेने मोकळ्या वातावरणात मोकळेपणाने गुलाब उधळत आनंद घेणे असा हा रंगोत्सव! घरी येणाऱ्याला प्रथम रंग लावला जातो. नंतर पुरणपोळीने तोंड गोड केले जाते. रंग जीवनातली नकारात्मकता दूर ठेवत माणसांना एकत्र आणतो. रंग लावणे, भिजवणे याचा संदर्भ धार्मिक ग्रंथात वृंदावनात बालपणी राधा-कृष्णाने सुरू केलेल्या रंग होळीशी आहे.
होळी उत्सवाची धूम : होळीची धूम ही केवळ एक दिवसापूर्वी ती मर्यादित नसतेच, कारण रंगपंचमीचा उत्साह हा सगळ्यांनाच पर्वणीचा ठरून जातो. शिमगोत्सवाची प्रथा कोकणात आपले वैशिष्ट्य आजही जपून आहे. परंपरेचा वसा जपताना शिमगोत्सवाची आगळीकता संस्कृतीचा ठसा उमटवून जाते. पालखी, निशाणी, आरत्या, गाणी संखासुरची गाणी, राधा नृत्य, नाखवा- गोमूचे नृत्य हे सारे डोळे दिपवून टाकणारे असते.
पुरणपोळीचा स्वाद : होळी म्हटले की पुरणपोळी आलीच. त्याच बरोबर कटाच्या आमटीचा स्वाद पाहता, घरोघरी होळीच्या निमित्ताने रचलेला पुरणपोळीचा स्वाद हा सणासुदीच्या निमित्ताने संस्कृतीचा वसा जपत आहे.
रंगपंचमी : होळीच्या दुसऱ्या दिवशीचा रंगपंचमीचा आनंद, उत्साह अवर्णनीय असतो. होळीपूर्वीच सुरू झालेल्या रंगांचा खेळ बच्चे कंपनीसोबतच तरुणाई साठी देखील अक्षरशः मनमुराद आनंदाची लयलुट ठरवून जातो. विविध रंगांची उधळण, रंगांचे नजराणे, रंगांच्या पिचकाऱ्या, रंगांची होणारी लयलूट पाहता रंगपंचमीचा हा सण वर्षातील अविस्मरणीय ठरवून जातो.
राधानृत्य : शिमगोत्सवात खास आकर्षण ठरते ते राधा नृत्याचे. होळी, शिमग्याच्या निमित्ताने कोकणात विशेषतः राधानृत्य सगळ्यांना भुरळ घालणारे ठरते. शिमगोत्सवाचे हे खास आकर्षण येथे आजही दिसून येते. मात्र, यामागे परंपरा, संस्कृतीचाही भाग असल्याचे म्हटले जाते. शिमगोत्सवात राधानृत्य हे एक संस्कृतीचं प्रतीक असते. फागपंचमीपासून सुरू होणाऱ्या होळी उत्सवाची रंगपंचमीला सांगता करण्यात येते. तर काही ठिकाणी होळी उत्सवानंतर शिमगोत्सवाला सुरुवात केली जाते. प्रत्येक गावाची प्रथा निराळी असते. शिमगोत्सवात राधानृत्य घरोघरी केले जाते. प्रथेनुसार प्रत्येक घरी राधानृत्य करताना गावातील उत्सव एक आगळावेगळा भासतो. कोकणात ही संस्कृती आजही जपली जाते. यावेळी देवादेवीकांची स्तुती करणारी गाणी गायली जातात. ग्रामदेवतेची स्तुती केली जाते. तर नाखवा-गोमू नृत्य सादर करताना विशेषतः कोळीगीतांचाही समावेश यामध्ये दिसून येतो. यावेळी विविध सोंगे सादर केली जातात. धुलीवंदनापासून सुरू होणारी ही धूम साऱ्यांच्याच आनंदाला उत्साहाला एकप्रकारे उधाण आणणारी ठरते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.