-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून महिला विविध क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. कुटुंबाचा आधार असलेल्या अनेक महिला कष्ट करताना आपल्याला दिसून येतात. कष्टाची त्यांना जणू काही सवयच झाली आहे असे कधी कधी वाटते.
दिवस-रात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण, डोक्यावर हक्काचे छत्र नाही. सतत कष्ट करूनही पदरी काहीच न पडल्यामुळे अनेकदा उपवास घडतो. आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. पण, तोंड कुणापुढे उघडायचं..? आपलं आयुष्य कष्टात गेलं पण; मुलांचं शिक्षण नीट पार पडावं यासाठी त्यांचा झगडा सुरू आहे. अशा अनेक समस्या घेऊन घरेलू कामगार, कचरावेचक महिला, बांधकाम मजूर महिला आपल्या अस्तित्वाची रोज लढाई लढत आहेत.
मुंबई शहरात कचरावेचक महिलांची संख्या हजारोच्या वर आहे. सकाळी सहा वाजल्यापासून त्या कचरा भंगार गोळा करण्यासाठी पाठीवर भलेमोठे गोणपाट घेऊन घराबाहेर पडतात.
सतत कचऱ्यात वावर असल्यामुळे त्यांना त्वचेचे रोग उद्भवू लागले आहेत. तीस वर्षाच्या कमलाबाई झोपडपट्टीमध्ये राहतात. दोन वर्षांचे एक आणि तीन वर्षांचे एक अशी दोन लहान मुले त्यांना आहेत. पतीही भंगार, कचरा गोळा करतो. रोज सकाळी बाहेर पडताना दोन्ही मुलांना शेजारी कोणाकडे तरी सोपवून जावं लागत असल्याचं त्या सांगतात. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण या महिलांच्या नशिबीच नाही. चार वाजेपर्यंत भंगार गोळा करून ते भंगारवाल्याला विकायचे आणि जे चार पैसे हातात पडतील त्याचे घरी जाऊन सहा वाजता जेवण करायचे. 'एकवेळच्या अन्नासाठी आजही महिलांना अशी वणवण करावी लागते...!'. आमच्या मागण्यांचा कोण विचार करणार, कोण आम्हाला विचारतो? असा प्रश्न या महिला उपस्थित करीत आहेत.
दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या घरेलू कामगार महिलांची संख्याही मोठी आहे. नवरा व्यसनांमध्ये बुडालेला सासू-सासऱ्यांचा सांभाळ, घरातील जेवणाची तजवीज, मुलांचे शिक्षण यासाठी आजही या महिला सात ते आठ ठिकाणी दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करून आपला उदर निर्वाह करतात. हात साबणाने पांढरे फटक पडलेले, त्वचेचे प्रश्न उद्भवूनही पैशांअभावी दवाखान्याची पायरी चढता येत नाही, अशी व्यथा बऱ्याचजणी बोलून दाखवतात.
पहाटे चार-साडेचारच्या सुमाराला ज्या लोकल मुंबई सीएसटी दिशेने जातात, त्यात महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी असते. ही गर्दी मच्छी आणायला जाणाऱ्या महिलांची.
पहाटे अडीच-तीनला उठून स्वयंपाक करून गाडी पकडायची. डॉकयार्ड येथे जाऊन किंवा मोठ्या बाजारात जाऊन पाटी भरून मच्छी आणायची. ठाणेतील घोडबंदर परिसरात किंवा शहरातल्या ठरलेल्या नाक्यांवर वर्तकनगर, कळवा येथे पाटी न्यायची. रिक्षाभाडं कसंबसं परवडतं. मच्छी विकायच्या जागी कावळे, मांजरं, कुत्रे, माशा हे ठरलेलेच. कधी हाताला कोयता लागतो. कधी माशांची धारदार खवले लागतात. दुपारी उन्हात छत्री घेऊन बसायचं. हा पूर्ण रोजचा क्रम.
पहाटेच्या गाडीला काही भाजी वाहून आणणाऱ्याही भेटतात. विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात हौसाबाई राहतात. नवरा गेल्यावर भाजी विकून त्या घर चालवत आहेत. वाशीला जाऊन माल आणतात. कळव्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे रस्त्यावर भाजी विकतात. भर रहदारीचा रस्ता. गाड्यांचा, रिक्षांचा धक्का लागण्याची भीती. पाठीमागे गटारासारखा छोटा नाला. तिथून उंदीर चावण्याची भीती. उन्हा-पावसाला आडोसा नाही. आसपास स्वच्छतागृह नाही. त्या म्हणतात, 'पोटाला आग लागली आहे सांगायचं कुणाला, दादा..?
बऱ्याच महिला सोसायट्यांमध्ये कंत्राटदारांकडे सफाई काम, सार्वजनिक स्वच्छतागृहाची सफाईकामे करतात.. भाजीबाजारातील सडक्या भाज्यांचे ढीग उचलायचे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्त्याच्या कडेला पडलेली घाण, मैला, दुर्गंधीयुक्त पॅड्स, मेलेले उंदीर, काचांचे तुकडे, घाणीला अंत नाही अशी परिस्थिती. कधी ढकलगाड्यांमध्ये हा कचरा भरायचा. हाताला काच वगैरे लागली तरीही तसंच काहीतरी चिंधी बांधून काम करत राहतात. सोसायट्यांमध्ये काही मजले कचऱ्याचे ड्रम वर न्यायचे ते पुन्हा वरून खाली उतरायचे सुरक्षा साधनं तर लांबच!
कष्टकरी महिलांचं आरोग्य सतत धोक्याच्या पातळीवर असतं. ओझी उचलून पाठीचे, कंबरेचे, मानेचे आजार, अपुरं जेवण, मासिक पाळीच्या आजारांनी, स्वच्छतागृह नसल्यामुळे होणाऱ्या आजारांनी त्या ग्रस्त आहेत. तरी त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नाही. जगण्याच्या संघर्षात त्या आजही वाट चालतच आहेत अशा या असंघटित महिलांना सलाम!
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.