Ticker

10/recent/ticker-posts

हरवलेल्या महिला, मुली जातात तरी कुठे..? ओळखीचे मित्र, नातेवाईक विश्वास संपादन करून फसवतात! वाचा सविस्तर लेख

मदतीचा, मैत्रीचा बहाणा करून मित्र, नातेवाईक महिलांना, मुलींना फसवतात, कुंटनखान्यात विकतात तर लग्नाचे आमिष दाखवून प्रियकर फसवतात तर काहीजणी मुंबई, दुबई सारख्या चंदेरी दुनियेला भुलून घरातून पळून जातात. अशा महिला, मुली नंतर वेश्याव्यवसायात पोलिसांना मिळून येतात, तर काही मानवी तस्करीच्या शिकार ठरलेल्या असतात. पुन्हा अशा महिलांना घराचे दरवाजे कायमचे बंद झालेले असतात. पुन्हा त्यांना परतायचे असते. पण, नंतर घरचे, समाज स्वीकारत नाही. त्यामुळे महिलांनो, मुलींनो आपण कुणाच्या गोड बोलण्याला फसून स्वतःला इतरांच्या स्वाधीन करू नका... वेळीच सावध व्हा.

-दादासाहेब येंधे

दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढत चालली असून ही चिंताजनक गोष्ट असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. 

विडिओ पहा...👇

लोकमत या चॅनेल वर प्रसिद्ध झालेली मुलाखत 

बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्यास पोलीस अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास करतात.  दिवसाला किमान तीन अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे होत आहे. या मुलींचा सामान्य तपासातून शोध घेण्यासोबतच ऑपरेशन मुस्कान सारखे उपक्रम राबवूनही पोलीस मुलींचा शोध घेत आहेत. मात्र, मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे. 

बेपत्ता म्हणून प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये मुली सेक्स रॅकेट तसेच मानवी तस्करीच्या शिकारही बनतात. राजस्थान गुजरात या ठिकाणी अल्पवयीन मुलींसह लग्नासाठीही मुली,महिलांची तस्करी होण्याच्या घटनाही पोलीस कारवाईतून वेळोवेळी समोर येत आहेत. 

अनेक मुली आपल्या घरात नाखूश असतात. ज्याच्यासोबत तिला विवाह करायचा असतो त्यासाठी तिच्या कुटुंबीयांची मान्यता नसते. त्यामुळे त्या घर सोडून निघून जातात. काही महिला, मुलींना महानगरीय जीवनशैलीचे आमिष दाखवून फुस लावली जाते. शहरी समृद्धी सोबत ऑनलाईन घडामोडींचा सोशल मीडिया हेही मुली, महिला गायब होण्याचे एक कारण बनले आहे. काही कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात. जग बदलत असताना मुली व महिला इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर करत असताना कुटुंब बदललेली नाहीत. बऱ्याच मुलींना अधिक स्वातंत्र्य हवे असते. त्यामुळे त्या घरातून पळून जातात. कधी कधी तर प्रियकर अशा मुलींना कुंटणखण्यात देखील विकून टाकतात.

बेपत्ता महिला किंवा मुली पसंतीच्या पुरुष, मुलांसोबत रेल्वे स्थानक, बस स्टँड सह सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी सापडून येतात. काही वेळा वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकवल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. अशा प्रकरणांमध्ये तरुण मुली आणि महिलांचे लैंगिक हेतूसाठी शोषण आणि मानवी तस्करी या सर्वात मोठया धोकादायक समस्या आहेत. 

हा प्रश्न अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. हा प्रश्न हाताळण्यासाठी अनेक घटकांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे. महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हे जाणून घेत त्यातील शक्य ती नेस्तनाबूत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी केली जाणे गरजेचे आहे. महिला आणि मुली बेपत्ता होण्यामध्ये वेगवेगळी कारणे असतात. काही वैयक्तिक असतात, तर काही कौटुंबिक. काही घटनांमध्ये गुन्हेगारांचे रॅकेट देखील असते. बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतात आणि त्यात काही गुन्हेगारी रॅकेटचा संबंध असेल तर त्या दृष्टीने कारवाई करतात. बेपत्ता झाल्यावर महिलांचा शोध घेण्या साठी धावपळ करण्याऐवजी तसे घडणारच नाही यासाठी काय करता येईल याचा विचार आणि तात्काळ कृती होणे गरजेचे आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या