-दादासाहेब येंधे
आजही मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा फक्त ग्रामीण भागापूरती मर्यादित नाही तर शहरी भागांतही तितक्याच मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव दिसून येतो.
मासिक पाळीविषयी आजही एवढ्या गैरसमजुती आणि घातक रूढी, परंपरा समाजात आढळून येत आहेत की, असे वाटते केव्हा बदलणार आपला समाज..? दोन वर्षांपूर्वीची घटना आठवा! नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक देवगाव आश्रम शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता. दहा मुलींकडून वृक्षारोपण केले जाणार होते. एक सर अचानक आले, म्हणाले 'ज्या मुलींची पाळी सुरू असेल त्यांनी झाडे लावायला येऊ नका. कारण त्यांनी झाडे लावली तर ती झाडे जळून जातात. झाडांना हात सुद्धा त्यांनी लावू नये आणि इकडे फिरकू सुद्धा नका. मागच्या वर्षी देखील लावलेली झाडं जगली नाहीत, ती वाळून गेली कारण मासिक पाळी सुरू असलेल्या मुलीने ती झाडे लावली होती.' दहा मुलींपैकी एका मुलीची मासिक पाळी सुरू होती आणि ती मुलगी बारावीत होती. बारावीतील मुलगी चांगली सज्ञान असते. तिने त्या सरांना प्रतिप्रश्न केला, 'सर, मला झाड का लावू देत नाही?' मासिक पाळीचा आणि झाडे लावण्याचा काय संबंध आहे? यावर तू जास्त बोलू नकोस असं म्हणून तिचा प्रश्न दाबून टाकण्यात आला. खरंतर स्वतंत्र विचार करण्याची क्षमता तिच्यात आहे. त्या मुलीला तिच्या सरांनी वृक्षरोपणापासून दूर करावे ही गोष्ट खरोखरच लाजिरवाणी आहे.
शिकल्या सवरलेल्या या महाराष्ट्रात मागासलेल्या चालीरीती आणि अंधश्रद्धा अजूनही कशा घट्ट पाय रोवून उभ्या आहेत हे पुन्हा एकदा यावरून सिद्ध होते. ज्या दिवशी भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला बसली, त्याच्या दुसऱ्या दिवशीच आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना मासिक पाळीवरून वृक्षारोपण नाकारले जाते. यासारखे दुर्दैव कोणते? जे शिक्षक अशा प्रकारचा संस्कार मुलांवर रुजवतात ते वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवणार..? ज्या मासिक पाळीमुळे मानवीची वंशवृद्धी होते तर वृक्षाचे रोपण का होणार नाही.याचा थोडा तरी विचार स्वतःचं डोकं लावून शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. त्या मुलीने थेट आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार केल्याने मुलीच्या हिमतीला दादच द्यायला हवी. तिच्यामुळेच असे अंधश्रद्धेचे प्रकार उघड झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. असे प्रकार आजही आपल्या आजूबाजूला घडताहेत.
आजही स्त्रीच्या शरीर धर्माविषयी किती वेगवेगळ्या जाचक, घातक विचारप्रवाह आपल्यात ठाण मांडून बसले आहेत. खरंतर तिच्या शरीरावर तिचा हक्क हवा. पण, तिच्या मासिक पाळीबाबत समाजाने घालून दिलेले पायंडे, नियम, रुढी, चालीरीती अजूनही जोपासल्या जात आहेत. आदिवासी शाळेतील उदाहरण त्याचेच एक उदाहरण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणजेच अंधश्रद्धेचे झाड अजूनही लावले जात आहे आणि या रोपांना खतपाणी घालण्याचं काम जोमाने आजही सुरू आहे. पाळीबाबतच्या अंधश्रद्धा समाजात दृढ होत्या त्यामध्ये बदल मात्र निश्चित झाला आणि होत आहे. पाळीबाबत किती साऱ्या गैरसमजुती होत्या समाजात मासिक पाळीच्या अवस्थेतील स्त्रीला रजस्वला म्हटले जाई. या चार-पाच दिवसांच्या काळात स्त्रीच्या अंगावरून जाणाऱ्या रक्तामध्ये काही अलौकिक शक्ती आहे अशी समजूत होती. आज आपण स्त्री अपवित्र आहे असे समजून तिला पाळीच्या त्या चार दिवसांत वेगळं बसवतो. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात पाळी आलेल्या स्त्रीला येऊ दिले जात नाही. साधी तिची सावलीही तिथे पडू देत नाही.
एकदा कॉलेजमध्ये लीळाचरित्र ऐकत असताना चक्रधरांच्या एका लीळेत त्यांनी बाईच्या पाळीचा उल्लेख 'सर्दी-पडसं' होतं तसं बाईची पाळी येते. त्यात अपवित्र असे काहीच नाहीये. विश्वाचं निर्माण त्यातून आहे' असा केला होता. ती लीळा अभ्यासली आणि वाटलं अरे हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
तसेच महानुभाव पंथांमध्ये पाळीच्या काळात स्त्रियांना वेगळं बसवत नाही ही किती महत्त्वाची आणि स्त्रियांच्या शरीर धर्माचा आदर करणारी गोष्ट आहे हे समाज कधी समजून घेणार? जी गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्याला आणि चिकित्सा करण्याला कितीतरी वर्षांपूर्वी समजली ती आज आपण का समजू नये. सातशे वर्षांपूर्वी संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई लिहीत होती,
देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध
विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान
कोण देह निर्माण नाही जगी...
सोयराबाईंची ही कविता म्हणजे चिकित्सेचा वस्तुपाठ आहे. अरे बाईची मासिक पाळी येते ती अपवित्र कशी मांडली जाते? त्यातूनच सृष्टीचे निर्मिती आहे ना? असे ७०० वर्षांपूर्वी विचारणाऱ्या सोयराबाई आपण केव्हा समजून घेणार..?
एका बाजूला बाईला शक्तीचं रूप मानले जाते, तिच्या सृजनाचा सोहळा म्हणून गर्भाशयाचे प्रतीक असलेल्या घटाची स्थापना नवरात्रात होते आणि दुसरीकडे बाईचं मानसिक खच्चीकरण आणि पदोपदी तिचा अपमान! रजस्वला देवीची पूजा ही संस्कृती करते आणि मासिक पाळीमुळे बाईला अपवित्र ठरवून मंदिर प्रवेश नाकारण्याची पद्धतही याच देशात पाळण्यात येते. हा विरोधाभास नाही का..?
आपल्या आजीने एखादी रूढी, परंपरा, पद्धत पाळली म्हणून आई पाळते. आई पाळते म्हणून मुलगी पाळते. अंधश्रद्धा तेव्हाच निर्माण होतात जेव्हा मुली माना डोलवतात. कशासाठी शिकलोय आपण? याचा विचार व्हावा. महिलांचा सन्मान जर करायचा असेल तर तिच्या शरीर धर्माचा सुद्धा सन्मान करावाच लागेल. तिच्या शरीर धर्माला, गलिच्छ, विटाळ मानून चालणार नाही.
खरंतर मासिक पाळीच्या गैरसमजुतींनी स्त्रियांच्या आरोग्याची अन मनस्थितीची किती हेळसांड केली आहे हे सुशिक्षित असलेल्या समाजाने एकदा तपासून पहावे अन बुरसटलेल्या विचारांना तिलांजली द्यावी.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.