Ticker

10/recent/ticker-posts

प्रसाधनगृहांचा विषय गंभीर नाही का ?

स्टेशनवरील प्रसाधनगृहे वापर करण्याजोगी नसल्यामुळे महिलांना घरातून निघाल्यानंतर कार्यालयापर्यंत आणि कार्यालयातून घरापर्यंत कुचंबनाच सहन करावी लागत आहे.

-दादासाहेब येंधे 

मुंबईतील महिलांचा प्रवास घरातून निघाल्यापासून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंत किमान एक पासून अडीच तासांपर्यंतचा असतो. स्टेशनवरील प्रसाधनगृहांची स्थिती चांगली असती तर ते महिलांच्या सोयीचे ठरले असते. मात्र, स्टेशनवरील प्रसाधनगृहे वापर करण्याजोगी नसल्यामुळे महिलांना घरातून निघाल्यानंतर कार्यालयापर्यंत आणि कार्यालयातून घरापर्यंत कुचंबनाच सहन करावी लागत आहे. कुचंबना टाळण्यासाठीचा उपाय म्हणून पाणी कमी पिणे किंवा न पिणे हा मार्ग महिलांकडून अवलंबला जातो आणि तो महिलांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरतो. या पातळीवर तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर ग्रामीण भागात शौचालयाच्या सुविधा नसल्यामुळे कुचंबना होऊन पोटाच्या विकाराच्या बळी ठरणाऱ्या स्त्रिया आणि नोकरीसाठी धावणाऱ्या महानगरातील स्त्रिया एकाच पातळीवर दिसून येतात. 

शहरे, उपनगर, महानगरांमधून कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या स्त्रियांची संख्या जवळपास पुरुषांनी इतकीच सध्या आहे. परंतु, महिलांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांकडे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. शहराचे सुशोभीकरण, चौकाचौकात स्तंभ, कारंजे, पदपथ सुशोभिकीकरण करण्याला प्राधान्य दिले जात आहे. परंतु स्त्रियांसाठी प्रसाधनगृहांचा विषय कधीच गंभीरपणे घेतला जात नाही. त्यामुळे मुंबईत स्त्रियांची कुचंबना होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

सार्वजनिक ठिकाणची अपुरी प्रसाधन व्यवस्था हे रेल्वेने विशेषतः उपनगरातून प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या मुत्र मार्गाच्या रोगांचे (युरिनर ट्रॅक्ट इन्फेक्शन) महत्त्वाचे कारण आहे. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत सहापट अधिक असते. स्वच्छ प्रसाधनगृहांची वाणवा असल्यामुळे स्त्रियांना प्रवासादरम्यान टॉयलेटला जाण्यापासून वंचित राहावे लागते. मुंबईत उपनगरी रेल्वे प्रवास करणाऱ्या महिला प्रवासादरम्यान लघवीस जाणे टाळण्यासाठी पाणी तसेच द्रव पदार्थ पिण्याचे टाळतात. ही वस्तुस्थिती आहे. अपुऱ्या प्रसाधन व्यवस्थेमुळे स्त्रियांना अन्य त्रासांना देखील सामोरे जावे लागते. वारंवार होणाऱ्या मूत्रनलिकेच्या आजारामुळे स्त्रियांच्यात पंडुरोग (ॲनिमिया) आणि मुतखडा अशा आजारांची शक्यता वाढते असे स्त्रीरोगतज्ञांचे म्हणणे आहे. 

मुंबईतील लोकलने अंदाजे तीन लाख महिला प्रवासी दररोज ये-जा करतात. अंधेरी, लोअर परेल, मरीन लाईन्स,चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, सीएसएमटी, चर्चगेट अशा महत्त्वाच्या स्टेशनवर देखील प्रसाधनगृह एका प्लॅटफॉर्मवर एका दिशेला आहेत. तसेच इतर उपनगरी स्टेशनवर महिलांसाठी जी काही प्रसाधनगृह आहेत त्यांच्या स्थितीबद्दल न बोललेलेच बरे. हे टाळण्यासाठी रेल्वेने प्रत्येक स्थानकांवर पे अँड यूज प्रसाधन सुरू केल्यास महिला तेथे जाण्याचे धाडस तरी करतील. अशा स्वच्छतागृहांमुळे थोडेफार पैसे मोजावे लागले तरी थोडीफार स्वच्छता तेथे असेल.


रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपनगरीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात कमीत कमी दोन शौचालये आणि चार मुताऱ्या असणे आवश्यक आहेत. पण, हे मुंबईतील आणि उपनगरातील किती रेल्वे स्थानकांवर दिसून येते हे पाहणे गरजेचे आहे. काही ठिकाणी तर अस्वच्छ प्रसाधनगृहांमुळे महिला तेथे जाण्याचे टाळतात.

पुरुषांच्या संदर्भात नैसर्गिक विधीचा मुद्दा आज सहजतेने घेतला जातो. परंतु, स्त्रियांच्या बाबतीत हा एवढा सहज मुद्दा कधीच नसतो. त्या आपणहून या गरजांचे प्रकटीकरण लवकर करत नाहीत. परंतु जेव्हा आपण एकविसावे शतक, स्मार्ट सिटी, शहरीकरण, स्त्री-पुरुष समानता या गोष्टींचा विचार करतो त्यावेळी स्त्रियांच्या बाबतीत या मुद्द्याकडे मात्र आपल्याला प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होते.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्त्रियांना आपल्या शौचाच्या संदर्भातील नैसर्गिक गरजांचे प्रकटीकरण करण्यासाठी स्वच्छ, सुसज्ज व सुरक्षित शौचालयांची उपलब्धता प्रत्येक स्टेशनवर, प्रवास मार्गावर आणि जिथे महिलांचा वावर जास्त असतो अशा ठिकाणी असणे आवश्यक ठरते. तरच स्त्रियांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर अधिक मोकळेपणाने वाढेल. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या