Ticker

10/recent/ticker-posts

स्नेह तिळाचा-गुळाचा, नात्यांना गुंफण्याचा...

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला...असे म्हणतानाच मागील सारे हेवेदावे विसरून नात्यांना नव्याने जोडणारा दुवा म्हणून तिळगुळाचे महत्त्व जपलं जातं. या दिवशी मोठ्या व्यक्तींनी आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना तिळगुळ देऊन एकमेकांविषयी प्रेम, आदर वाढवण्याची प्रथा आहे.

-दादासाहेब येंधे

नवीन वर्षाची सुरुवात होताच जो पहिला सण जानेवारी महिन्यात येतो तो म्हणजे मकर संक्रात. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रात असे म्हटले जाते. या सणाबद्दल पुराणात असंही म्हटलं जातं की, शंकासुर नावाचा एक राक्षस खूप मुजोरी करत होता. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप घेतलं. जिला नऊ हात होते व तिचं वाहन दरवर्षी बदलत होते. त्या देवीने अशा मुजोर राक्षसाचा वध केला. म्हणून त्या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाऊ लागले. पुराणात अशी ही एक कथा आहे की, सूर्याची उपासना करून गायत्री मंत्र विश्वमित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला. त्यांनीही तो मंत्र स्वतःकडे न ठेवता संपूर्ण मानव जातीला मित्रत्व आणि भारतीय संस्कृतीचा आदर्श जपण्यासाठी दिला. याच आदर्शातून मित्रत्वाची वाढ व्हावी म्हणून या दिवशी मोठ्या व्यक्तींनी आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना तिळगुळ देऊन एकमेकांविषयी प्रेम, आदर वाढवण्याची प्रथा आहे.



जानेवारी महिना म्हणजे थंडीचा महिना. अशा थंडीत आपल्या रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम होतो. तिळात स्निग्धतेचा गुण आहे व गुळ हा उष्ण मानला जातो. आरोग्यदायी नजरेने तिळगुळ हा ह्या ऋतूतील पौष्टिक आहार मानला गेला आहे. तीळ बाहेरून काळा व आतून पांढरा असतो. परंतु हाच तीळ आपल्याला हाच संदेश देतो की, आपण कितीही काळ्या व वाईट प्रसंगाला सामोरे गेलो तरी मन आतून नेहमी शुद्ध आणि निर्मळ ठेवले गेले पाहिजे. अगदी पांढऱ्या शुभ्र तिळासारखेच.

अत्तराचा सुगंध, तिळगुळाचा स्वाद हळदीकुंकू समारंभ, सौभाग्याचं वाण, महिलांची लगबग, त्यांचा उत्साह या साऱ्याचा मिलाप म्हणजे मकर संक्रात. संक्रातीचा सण नव्या नवरीसाठी विशेष असतो. तिचं घरात आगमन झाल्यानंतर पहिल्या मकर संक्रातीचा गोडवा हा आनंद उत्साहाने जपला जातो. संक्रातीच्या निमित्ताने नवविवाहितेने पहिल्या हळदीकुंकू समारंभला हळद आणि कुंकवाचं वाण द्यावं अशी प्रथा आहे.

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला...,  

असे म्हणतानाच मागील सारे हेवेदावे विसरून नात्यांना नव्याने जोडणारा दुवा म्हणून तिळगुळाचे महत्त्व जपलं जातं. सौभाग्याचं वाण देऊन वस्तूच्या रूपाने गृहपायोगी वस्तू पदार्थाच्या रूपाने संक्रांतींच महत्त्व टिकवून ठेवले जातं. दागिने, नवनवीन साड्या, तिळाचे लाडू तिळगुळाच्या मिश्रणाने तयार केला जाणारा प्रसाद, अत्तराचा सुगंध हा संक्रातीच्या निमित्ताने आनंद द्विगणित करणारा ठरतो. संक्रातीचा सण म्हणजे खास महिलांच्या हौसेचा आणि उत्साहाचा सण म्हणावा लागेल. कारण संक्रातीच्या निमित्तानेच सजले जाणारे हळदीकुंकू समारंभ महिलांना यानिमित्ताने एकत्र आणणारे ठरतात. गृहिणी, नोकरदार महिलांसाठी यानिमित्ताने एकत्र येता येतं. संवाद, नात्यांचा उगम, मैत्रीचे धागेदोरे, संस्कारांची जपणूक सणांचं महत्व जपताना संक्रात नव्या वर्षातील पहिला सण म्हणून वर्षभरासाठी गोडवा जपणारा ठरतो.

संक्रांत म्हणजे संक्रमण. मार्ग ओलांडून जाणे. नववधू एक घर सोडून दुसऱ्या घरात जाते तो तिचा प्रवास गोड व्हावा, सासर-माहेर मध्ये गोडवा राहावा हा उद्देश या सणामधून दिसून येतो. हलव्याचे दागिने साकारताना एक एक तिळगुळ-हलवा या धाग्यात गुंफला जातो. सर्वसमावेशक वृत्ती यातून समोर येते. चिकाटी आणि जिद्दीने पुढे जाऊन सर्वसमावेशक एका ओळीत गोडवा, नाती जपणे, सारी नाती बांधून ठेवणे हे प्रमुख सूत्र यातून दिसून येते.


सुगड पूजन - मकर संक्रांतीला सुगड पूजन केले जाते. सुगड मध्ये ऊस, हळदीकुंकू, बोरं, हरभरा टाकून सुगड पूजन केले जाते. नववधूसाठी हे सार नवं असतं. मात्र, ही संस्कृती ही परंपरा रीतीस नव्याने आरंभताना हा उत्साह नाविन्य आगळीकतेचा ठरतो. नात्यांचा गोडवा यावेळी येथे जपला जातो. सुगड पूजन करून या दिवशी पाच सुवासिनींना घरी आमंत्रित करून सौभाग्याचं वाण दिलं जाते आणि तिळगुळ, फुलं दिली जातात.


हलव्याचे दागिने - हलव्याचे दागिने हे मकर संक्रांतीचे विशेष रूप मानावं लागेल. संक्रातीच्या निमित्ताने नव्या नवरीला हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. यावेळी हलव्याच्या दागिन्यांचे विविध प्रकार पाहण्याजोगे असतात. दागिने म्हटलं की, स्त्रियांच्या आवडीचा विषय. मात्र, हे खरे सोने नव्हे तर तिळगुळाच्या रूपाने संक्रातीचं लेणं, संस्कृतीचं देणं मानलं जातं. ते परिधान केले जातं. संस्कृतीच्या रूपाने एका धाग्यात गुंफले जाणारे तिळगुळ हा विशेष लुभावणारा ठरतो. हलव्याची नथ, हलव्याचा हार, कमरपट्टा, बांगड्या, बाजूबंद, हलव्याचा मुकुट, केसातील फुलं विविध प्रकारच्या माळा असे विविध रूपांतील हलव्याचे दागिने लक्षवेधी ठरतात.

पतंग उडविणे - मकर संक्रांतीच्या दिवशी आकाश रंगेबिरंगी पतंगांनी भरलेले असते. लहान मुलांमध्ये पतंग उडवण्याचा प्रचंड उत्साह या दिवशी असतो. सर्व मुले या दिवसाची अगोदरपासून तयारी करत असतात आणि पतंग, मांजा इत्यादी खरेदी करून घरात ठेवतात आणि मकर संक्रांतीची वाट बघत असतात. अनेक ठिकाणी या दिवशी पतंग उडवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यानिमित्ताने दिवसभर आकाश पतंगाने भरलेले दिसून येते.

भारतातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो. दक्षिणेकडे तामिळनाडूत त्याला पोंगल या नावाने ओळखले जाते. तर कर्नाटक, केरळ तसेच आंध्र प्रदेश राज्यांमध्ये केवळ संक्राती या नावाने हा सण साजरा केला जातो. बिहार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या सणाला 'तिला संक्रांत' असे म्हटले जाते. तर काश्मीरमध्ये याला शिशुर संक्रांत म्हटले जाते. पौष संक्रांति असे नाव पश्चिम बंगालमध्ये असून हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब मध्ये माघी अथवा बैसाखी म्हणून हा सण साजरा केला जातो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या