लव्ह, सेक्स, धोका याचा शेवट निर्घृण हत्येत
-दादासाहेब येंधे
आजच्या मॉडर्न अशा समजल्या जाणाऱ्या जीवनशैलीमध्ये लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शहरी लोकांमध्ये डेटिंगच्या तुलनेतली लिव्ह इन रिलेशनशिप तशी अपारंपारिक मानली जाते. सध्या जोडप्यांना मोकळेपणाने जगायचे आहे आणि त्यांना खांद्यावर जबाबदारीचे कोणतेही ओझं नको आहे, या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये दोन व्यक्ती अविवाहित मार्गाने दीर्घकाळ विवाह सदृश्य पद्धतीने परंतु विवाहाच्या कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. या प्रकारच्या नात्यांमुळे जोडपे लग्नाच्या जबाबदाऱ्या टाळतात.
आपल्याकडील पुरुषप्रधान संस्कृतीमुळे शिक्षण, आर्थिक सुरक्षितता, स्वतंत्र निर्णय क्षमता आणि समतावादी मानसिकता पारंपारिक विवाहापेक्षा लिव्ह इन संबंध निवडण्यात महिलांना अधिक प्रेरणादायी वाटते. पण, या गोष्टी पुढे पुरुषप्रधान संस्कृतीत तग धरून राहत नाहीत. ही वस्तुस्थिती महिलांनी स्वीकारणे गरजेचे आहे.
नुकतेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन अर्थात लग्नाशिवाय शारीरिक संबंधांमध्ये राहण्याच्या अलीकडील काळात वाढत चाललेल्या प्रकारांबद्दल अतिशय परखड शब्दांमध्ये टिप्पणी केली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप च्या मुद्द्यावर बोलताना न्यायालय म्हणाले की, भारतातील विवाह संस्था नष्ट करण्यासाठीचे हे चुकीचे पाऊल ठरत आहे. ही टिप्पणी बलात्काराच्या आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. विवाह संस्थेत असणारे स्थैर्य लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अपेक्षित करता येत नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे असेही म्हणणे आहे की, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलांना नंतरच्या काळात पती शोधणे फार कठीण होत आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ब्रेकअप नंतर पुरुष जोडीदारास दुसरा जोडीदार किंवा पत्नी मिळण्यास फारशी अडचण येत नसली तरी मुलींबाबत असे होत नाही. कारण, आपल्याकडील पुरुष प्रधान समाज त्याला मान्यता देत नाही. अशा नात्यांमधून मुलगी जन्माला आली तर या समस्येचे इतर पैलू समोर येतात. अशा केसेस न्यायालय रोज हाताळत असते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
लिव्ह इन रिलेशनशिप मधील काही उणिवा देखील न्यायालयाने यावेळी निदर्शनास आणून दिल्या आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप बाजूने असलेल्या जोडप्यांचे असे म्हणणे असते की, यात कोणत्याही अपेक्षांचा बोजा नसतो. जबाबदारीचे ओझे देखील नसते. आपल्याला पाहिजे तोपर्यंत हे नाते सांभाळायचे आणि नंतर रिलेशन मधून बाहेर पडता येते. त्यामुळेच अलीकडील काळातली लग्नाला पर्याय म्हणूनही पाहणारा वर्ग निर्माण झालाय. परंतु या संबंधाची व्याप्ती मुळात एवढी अस्पष्ट आहे की आपल्या अधिकारांची आणि कर्तव्यांची लक्ष्मणरेखा कोणती आहे हे खुद्द असे संबंध प्रस्थापित करणाऱ्या जोडप्यांना अखेरपर्यंत समजत नाही. परिणामी, अशा संबंधांमध्ये कालांतराने कटुता निर्माण होते. असे संबंध सामान्यतः अशा कराराच्या स्वरूपात प्रस्थापित केले जातात, ज्यात संबंधांच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिले जात आहे हे गृहीत धरले जाते. परंतु असे होऊच शकत नाही. कारण जिथे संबंध आहे तिथे अपेक्षा मूळ धरू लागतात आणि ते स्वाभाविकच आहेत. परिणामी, स्वतंत्र राहण्याच्या विचारांना इथे तडा जातो.
प्रेम कितीही खोल असले तरी समर्पण, त्याग आणि जबाबदारीच्या भावनेबाबत ठराविक कालमर्यादेनंतर ते कमी होऊ लागते. याचा विचार तरुण पिढीने करणे गरजेचे आहे. नात्यासोबतच सुरक्षिततेची भावना महत्त्वाची असते हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. लग्नविना सहजीवनात राहणाऱ्या जोडप्यांना नेहमीच या सुरक्षिततेच्या भावनेचा अभाव जाणवतो. मग, या ना त्या कारणाने नात्यात कटुता निर्माण झाल्यानंतर आपल्या अधिकारांसाठी या जोडप्यांमधील विशेषकरून महिला न्यायालयाची पायरी चढते. कारण नात्यात कटुता निर्माण झाल्यावर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारी स्त्री न्यायाच्या मागणीसाठी पुन्हा विवाहित स्त्रीच्याच रांगेत येऊन बसते. याच रांगेत बसण्याचे नाकारून तिने लग्नाऐवजी सहजीवनाचा मार्ग पत्करलेला असतो. त्यामुळे तरुणाईने नात्यांचे गांभीर्य समजणे गरजेचे आहे.
लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप बरे असे कित्येक जणांना वाटत असते. मात्र, या वाटेवरही अनेक काटे आहेत याची जाणीव बऱ्याच जणांना नसते. लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्याचा डोलारा विश्वासाच्या पायावर उभा आहे. हा पाया जर डळमळीत झाला तर नाते क्षणभंगुर ठरते. या नातेसंबंधात अनेक नाजूक कंगोरे आहेत. त्यामुळेच रिलेशनशिप प्रत्येक वेळी यशस्वी होत नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी कालांतराने प्रेम कमी झाल्यावर एकमेकांबद्दल आदर करणे सोडून देतात, आणि अशी नाती मग कोलमडतात. कारण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडीदाराकडून बेपर्वाही, विवाहबाह्य संबंध किंवा अनैतिकतेचा एकमेकांवर आरोप करण्यास वाव नाही. फक्त वैवाहिक जीवनातच हे होऊ शकते. ज्याला समाजाची मान्यता आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.