Ticker

10/recent/ticker-posts

साज हलव्यांच्या दागिन्यांचा...

-दादासाहेब येंधे

मकर संक्रात हा कॅलेंडर नववर्षात येणारा हिंदूंचा पहिलाच सण. या सणाला नवविवाहित जोडप्याला आणि लहान मुलांना पारंपारिक हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. दरवर्षी संक्रांतीला घरातील मंडळी विशेष करून सासूबाई आपल्या जावयासाठी आकर्षक दिसणारे हलव्याचे दागिने आणतात. ही प्रथा जरी पारंपारिक असली तरी यात दरवर्षी नवनवीन आधुनिकतेची भरच पडत असते. संक्रांतीला खास काळी साडी परिधान केल्याशिवाय आणि पांढऱ्या शुभ्र हलव्याचे दागिने अंगावर मिरवल्याशिवाय संक्रातीचा सण साजराच होत नाही.

इतर वेळेस महागातल्या महाग दागिन्यांचा हट्ट करणाऱ्या महिलांना संक्रातीला मात्र, हलव्याचेच दागिने हवे असतात. मकर संक्रात हा नववधूचा पहिलाच सण मानला जातो. नवविवाहितांसाठी तर हल्ली हलव्याचे खास दागिने बनवून घेतले जातात. नवविवाहितांसाठी हलव्याच्या दागिन्यांचा सेट, लहान मुलांसाठी श्रीकृष्ण सेट, आणि जावयासाठी आकर्षक दागिने बाजारात रेडिमेड मिळतात. श्रीकृष्ण सेटमध्ये मोरपिसाचा मुकुट, बासरी, हलव्याचा हार, बोरन्हाणाचे साहित्य मिळते. जावयाला द्यायच्या हत्तीच्या अंबाड्यातील वाटीत काजू, खडीसाखर, वेलदोडा, बडीशेप, शेंगदाणा, हलव्याचे मंगळसूत्र,हार, झुमके, नथ, बांगड्या असे पारंपारिक अलंकार उपलब्ध असतात.

त्या पारंपारिक दागिन्यांमध्ये कंबरपट्टा, कानातले, पाटली, बिंदी, वेणी, गजरा, शाहीहार तोडे, जोडवे आणि पैंजण अशा विविध दागिन्यांचा यात समावेश असतो. तसेच महालक्ष्मी सेट, गीता सेट, गौरी सेट, रेणुका सेट अशा दागिन्यांना संक्रातीमध्ये मोठी पसंती असते. सूर्याचे मकर राशीतील संक्रमण किंवा सूर्याचे उत्तरायण यासाठी मकर संक्रांतीचे महत्त्व मानले जाते. लग्नानंतरच्या पहिल्या सणाला नवविवाहित जोडप्याला हलव्याच्या दागिने घालण्याची प्रथा आहे तसेच लहान मुलांनाही हलव्याच्या दागिने घातले जातात. आजकाल तर हे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच बनवले जातात. आजही ऑर्डर घेऊन हलव्याचे दागिने पारंपारिक पद्धतीने बनवले जातात.

पहिल्या संक्रातीच्या निमित्ताने शिशु संस्कार म्हणून लहान मुलांचे बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे दिसून येते. संक्रातीपासून रथसप्तमी पर्यंतच्या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण केले जाते. त्या दिवशी बाळाला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात. या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान मुलांच्या मध्ये बसून बाळाचा औक्षण केलं जातं. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, हलवा, बोर, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुटे पैसे, चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातले जाते. हे बोरन्हाण केल्यास मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज आहे.

संक्रातीला महिला नव्या साड्या, दागिने घालतात तसेच संक्रातीला वाण वाटण्याची देखील पद्धत आहे. संक्रातीच्या दिवशी हळदीकुंकू आणि सुगड्याच्या वाणास जास्त महत्त्व असतं. या वाणामध्ये बोरं, वाटाण्याच्या शेंगा, ऊस, गहू आणि एखादी गरजेची वस्तू असते याला सौभाग्याचं देणं म्हटलं जातं.

संक्रातीला तिळगुळ, तिळाच्या वड्या, गुळाची पोळी, अशा अनेक गोड पदार्थांची रेलचेल असते. शिवाय तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.. असे म्हणत, एकमेकांना तिळगुळाचे वाटप करताना लहान थोरांपासून मोठ्यांना तीळ आणि गुळाच्या गोड बंधनात अडकून ठेवण्याचा मकरसंक्रात असा हा सण आहे.

महाराष्ट्रात विवाहित स्त्रिया मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच या दिवसापासून हळदीकुंकू समारंभ करतात. रथसप्तमीला हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी महिला संक्रातीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. संक्रातीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण करण्यासाठी तीळ भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, पावटे, गाजर अशा इतर शक्तीवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो. मकर संक्रातीच्या दिवशी दिवसभर नवे कपडे परिधान करून लहान मोठे व्यक्ती पतंग उडवतात. पतंग उडून आनंद व्यक्त करत एकमेकांचे पतंग कापण्याची मजा काही औरच असते.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.