Ticker

10/recent/ticker-posts

मनमोहक श्रावण

 मनमोहक श्रावण 
 - दादासाहेब येंधे

श्रावण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने पुजला जातो. ही सारी माहिती लक्षात घेतली तर श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट होतं. मुख्यत्वे, श्रावण हा 'माहेरवाशिणींचा सखा असतो. या काळातील धुंद वातावरण आणि निसर्गाच्या रूपाने अनेक लेखक, कवींना त्याने मोहिनी घातली आहे. 
    
आषाढाचा निरोप घेत श्रावण दारात आलाय. श्रावण मोहक रूप, अनेक सणावारांची परडी हातात घेऊन तो येतो आणि चराचर व्यापून टाकतो. मंगलमयी क्षणांनी श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा असे कितीतरी सण साजरे करताना गृहिणी दंग होऊन जातात. खरंच आल्हाददायक आहे हा श्रावण.... 


सावन का महिना पवन करे शोर...  
हे गीत ऐकताना मन कसं मोरासारखं थुई थुई नाचतं. एखाद्या अंगणात सख्या मंगळागौर साजरी करताना फुलांची आरास सजवत 'सावन आला गं सई, श्रावण आला' म्हणत माहेरपणाचे सुख मनामनात भरून घेतात


रक्षाबंधन तर भाऊ-बहिणीला भारावून टाकणारा सण. तोही श्रावणाचाच सखा बरं का. समुद्राला आलेलं उधाण बघताना कोळी सागराला नारळ अर्पण करतात. सागराच्या एकेका लाटेबरोबर त्यांच्या आनंदालाही भरतं आलेलं असतं. म्हणून श्रावण सर्वांनाच आवडतो.


श्रावणाचा माहिना
कवी, गीतकारही श्रावणवेडे होऊन जातात. बालकवींनी श्रावणाचं काव्य अजरामर करून टाकलंय. म्हणूनच श्रावण आला की, “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे हे कडवं अलगद ओठावर येऊन गुणगुणायला होतं.


श्रावण हा श्रवणाचा महिना. या दिवसांत मंदिरात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम रंगतात. पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ भक्तिसार, काशीखंड आदी ग्रंथांचं पठण होतं. श्रावणात उत्तर भारतात झुले झुलतात. माहेरवाशिणींना माहेरी आणलं जातं. तीजेला तीजमालेची पूजा करून मुली झोपाळ्यावर झुलतात. मध्य प्रदेशात हरियाली तीज साजरी होते. या प्रसंगी वेगवेगळे मेवे घालून बर्फी बनवली जाते. स्त्रिया हातावर मेंदी रेखून, सोळा शृंगार करून तीजमाता पुजतात. राजस्थानमध्ये छोटी तीज साजरी होते. या दिवशी मंदिरात लक्ष्मी-नारायण चांदीच्या झुल्यात बसतात. राखी पौर्णिमेनंतरच्या तीजेला बडी तीज, कजरा तीज किंवा सातुडी तीज असं म्हणतात. या तीजेला महिला गुंजा नावाचा खेळ खेळतात. झोके झुलतात. त्यास सिंजरा म्हणतात.

मधुश्रावणी
बिहारमध्ये श्रावणाचं नावच मोठं मोहक आहे. तिथे या मासाला मधुश्रावणी असं म्हटलं जातं. यानिमित्ताने घर
सजवतात. दारात तांदळाच्या पिठाची रांगोळी रेखाटतात. श्रावणात बंगालमध्ये तर शिवाभिषेकाचं मोठं महत्त्व आहे. लोक कावडींनी पिंडीवर अभिषेक करतात. या कावडी आणणाऱ्यांची मोठी व्यवस्था पाहायला मिळते. आपल्याकडच्या वारकऱ्यांसारखं त्यांचं रस्तोरस्ती स्वागत होतं आणि त्यांना उपवासाचे पदार्थ दिले जातात.


महत्त्वाचा शुक्रवार
आंध्र प्रदेशात श्रावणातला दुसरा शुक्रवार अतिशय महत्त्वाचा. 'तिकडे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. घरात वरदलक्ष्मीचं ब्रत घेतलं जातं. तामिळनाडूत या दिवसात कामाक्षीदेवी माहेरवाशीण म्हणून घरी येते, अशी भावना आ स्वागत केलं जातं. एका शुक्रवारी हळदीने, दुसऱ्या शुक्रवारी कुंकवाने, तिसऱ्या शुक्रवारी फुलांनी आणि चौथ्या शुक्रवारी फळांनी पूजा सजवतात. 


असा हा श्रावण वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने पुजला जातो. ही सारी माहिती लक्षात घेतली तर श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट होतं. मुख्यत्वे, श्रावण हा माहेरवाशिणींचा सखा असतो. या काळातील धुंद वातावरण आणि निसर्गाच्या रूपाने अनेक लेखक, कर्वींना मोहिनी घातली आहे. अनेक लेखक, कवींच्या लेखणीतून श्रावणातील सौंदर्य उलगडत गेलं आहे. ते वाचताना, ऐकताना श्रोत्यांनाही या. मनमोहक जगताची सैर घडते.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.