२६/९/१९

'फिट इंडिया' ही एक चळवळ व्हावी

'फिट इंडिया' ही एक चळवळ व्हावी
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये केंद्र सरकारच्या 'स्वस्थ भारत' (फिट इंडिया) मोहिमेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. 'स्वस्त भारत' ही केवळ एक मोहीम नाही तर चळवळ आहे. देशाला तंदुरुस्त व निरोगी बनविण्यासाठी सर्वांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. सध्या डायट हे 'फॅशन' बनत असतानाच तंत्रज्ञान आणि विकास यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपली शारीरिक कामे कमी झाली असल्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या आजारात मोठी वाढ झाली आहे. आता अशी परिस्थिती अशी आहे की आपण चालतो कमी आणि आपण किती पावले चाललो हे तंत्रज्ञान आपल्याला सांगते. अस्वस्थ जीवनशैलीमुळे विकार फैलावत असल्याचे मोदींनी सांगितले. 
खरे तर मोबाईल इंटरनेटच्या महाजालात गुरफटलेल्या तरुणांसाठी अशी मोहीम गरजेचीच आहे. समतोल नसलेला आहार, अभ्यासाचा वा कामाचा ताण हा त्रिकोण तंदुरुस्तीचे सर्व कोण बिघडवत चालला आहे. त्यासाठी व्यायाम हा रामबाण उपाय आहे. हलका व्यायामही शरीर तंदुरुस्त राखू शकतो. उत्साह आणि आनंद हे आयुष्यात ऊर्जेचे काम करत असतात. ते तसेच राहावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने काही नियम स्वतःसाठी ठरून घ्यायला हवेत. त्यामुळे आपण नेहमी उत्साही आणि निरोगी राहू शकतो.
संतुलित आहार निरोगी जीवनासाठी गरजेचा आहे. सारखे जंकफूड आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे आपले जीवन धोक्यात येते. ताजी फळे, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. बाहेरचे अन्न खाण्यापेक्षा घरच्या जेवणाचीच चव चाखणे केव्हाही चांगले. 
निरोगी व फिट राहण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करण्याची सवय लावायला हवी. कारण व्यायामामुळे शरीर निरोगी आणि फ्रेश होतं. दिवसभर कामाचा कितीही व्याप असला तरी कमीतकमी पंधरा मिनिटे स्वतः च्या निरोगी जीवनासाठी काढणे गरजेचे आहे. निरोगी जीवनासाठी चालणे, जॉगिंग असे व्यायाम देखील करणे गरजेचे आहे. त्यासोबतच योगासने आणि प्राणायामदेखील करणे फार महत्त्वाचे आहे. योगासने केल्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. प्राणायामामुळे श्वासावरील नियंत्रण वाढते. शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. योग तज्ञांच्या मदतीने योगासने करावीत. रोज अर्धा तास ध्यानधारणा, कपालभाती व अनुलोमविलोम केल्याने प्रत्येकाला चांगला फायदा होऊ शकतो.
'स्वस्थ भारत' ही मोहीम केवळ तरुण वर्ग पुरतीच मर्यादित नाहीतर ती सर्वांसाठी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा आजारांवर औषधाची मात्रा सुरू करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर ही चळवळ प्रत्येकाच्या जीवनाची अविभाज्य घटक व्हायला हवी.


४ टिप्पण्या:

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...