२०/११/१९

पाकिस्तानशी मैत्री नकोच

पाकिस्तानशी मैत्री नकोच
दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर आगाऊ आहे हे नव्याने सांगायला नको. भारताच्या सीमेवरील नियंत्रण रेषेचे उल्लंघन त्यांच्यासाठी नवे नाही. सतत सीमेवर त्यांच्या कुरापती सुरूच असतात. पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करणे म्हणजे महाचूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र भारत प्रत्येक वेळी ती चूक करतो. त्यामुळे यापुढे चर्चा किंवा मैत्रीचे बोलणे नकोच. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. तरच त्यांचा आगाऊपणा कमी होईल.
श्रीलंका, चीन, अफगाणिस्तान आणि बांगलादेशप्रमाणे पाकिस्तान हाही आपल्या शेजारील देश आहे. मात्र, एक सख्खा शेजारी अशी पाकिस्तानची भारतासोबत ओळख नाही. परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणूनच पाकिस्तानचा उल्लेख केला जातो. वास्तविक पाहता तशी ओळख होण्यास त्यांची वागणूक कारणीभूत आहे. आपल्या क्रूर आणि वाईट कारवायांमुळे पाकिस्तानने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. जगात कुठल्या देशांच्या सीमेवर, नियंत्रण रेषेवर तणाव नसेल तितका भारत-पाक सीमेवर नेहमी असतो.  याचेही कारण पाकिस्तान हाच आहे. भारताने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही.  भारत हा सोशिक देश आहे. पुरातन काळापासून भारताने कुणावर आपणहून हल्ला केल्याचे ऐकिवात नाही. याउलट भारतावर हल्ला झाल्याचा इतिहास सांगतो. भारताने असे आणि अनेक हल्ले पचवले आहेत. कारण आमच्यात सहिष्णुता आहे. आम्ही शांततेचे पाईक आहोत. मात्र, भारतात शांतता नांदावी असे पाकिस्तान कधीच वाटत नाही.
पाकिस्तानला बेचिराख करणे भारतासाठी मोठे आव्हान नाही. मात्र भारताला पाकिस्तान पेक्षा स्वतःच्या प्रतिमेची अधिक काळजी आहे. भारताला आंतरराष्ट्रीय संबंध जोपासायचे आहेत. पाकिस्तान वर हल्ला करून आशिया खंडातील शांतता भंग करायची नाही. म्हणून भारत प्रत्येक वेळी गप्प राहतो. मात्र याचा चुकीचा अर्थ पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर काढत आहेत.
आपले भारतीय जवान सीमेवर जे काही करतील त्याचे देशाच्या भूमीवरही समर्थन केले जाईल, असा एकत्रित आवाज आणि भावना आपल्याकडे निर्माण झाल्या पाहिजेत. हा देश भारताबरोबर सौजन्याने वागेल याची अजिबात शक्यता उरलेली नाही. मग भारताने सौजन्याने वागण्याचा ठेका घेतलेला नाही. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पाकिस्तानला उघडे पाडले पाहिजे. त्याचा निषेध केला पाहिजे. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगरीत पाकिस्तान खेळाडूंचे किंवा कलाकारांचे कार्यक्रम बंद पाडले गेले तरच त्याचा सगळ्या जगभर संदेश जाऊ शकतो.
 कोणतीच मान मर्यादा न पाळणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे खेळाडूंचे आणि कलाकारांची भारतात लाड करण्याचे काहीच कारण नाही सीमेवर पाकिस्तानचे जवानांचे प्राण द्यायचे आणि इथे येऊन पाक खेळाडूंनीही खेळाचा आनंद उपभोगायचा हादेखील एक क्रुरपणाच ठरतो. सगळ्या देशातील जनतेच्या भावना समान असल्या पाहिजेत. सीमेवर जवानांचे प्राण जात असतील तर त्याचा निषेध प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे. सीमेवरच्या जवानांच्या पाठीमागे सगळ्या जनतेच्या भावना उभ्या राहिल्या पाहिजेत. जवानांनी प्राणांची बाजी लावायची आणि इकडे कोट्यवधीचा लिलाव करून पाकिस्तानी खेळाडूंनी तिजोऱ्या भरायच्या. हा प्रकार अजिबात खपवून घेता कामा नये. पाकिस्तानची खोड मोडायची असेल तर त्या देशाला कायमचे धडे शिकवावे लागतील. पुढची काही वर्षे या देशासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवता कामा नये. सांस्कृतिक आर्थिक व्यवसाय किंवा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. कारण त्या देशातल्या राजकारण्यांना आणि लष्कराला सभयतेची, सौम्य किंवा मानवतेची भाषा समजत नाही. सातत्याने जिहाद आणि दहशतवाद एवढा एकच उद्योग तिथे चालतो. यासाठी पुढचे काही वर्षे मुंबईत किंवा भारताच्या भूमीवर कुठेही पाक खेळाडूंचा, कलाकारांचा कोणताच कार्यक्रम होता कामा नये. हा एकदा दणका दिला की,  तिथल्याच नागरिकांना आपल्या सरकारकडून कशाप्रकारे चुका होत आहेत हे लक्षात येईल. आणि यातून त्यांचे होणारे नुकसान, त्या देशाचेच नुकसान करणारे ठरेल. कदाचित भारताने घातलेला हा बहिष्कार पाकिस्तानला थोडाफार धडा देणारा ठरू शकेल.
पाकिस्तानने भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. तसेच भारतानेही अति संयम दाखवू नये. 'शहाण्याला शब्दांचा मार, मुर्खाला लाथेचा मार' या म्हणीप्रमाणे आगाऊ पाकिस्तानला इशारे आणि समज देण्यात अर्थ नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक वाईट कृतीचे उत्तर त्यांच्याच भाषेत द्यायला हवे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सायकल चालवा, आरोग्य मिळवा

  सायकल  चालती फिरती व्यायामशाळाच  -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com) सायकल हे एक पुरातन, सुपरिचित, सुलभ, स्वस्त, आरोग्यवर्धक व समाजोप...