-दादासाहेब येंधे
'आई' हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला 'आई' सर्वांत जास्त आवडते आणि आवडायलाच हवी, कारण तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकलो. आई या विषयावर अनेक पुस्तकं, कविता लिहिल्या गेल्या. एवढंच काय तर 'आई', 'माँ' असे कितीतरी सिनेमेसुद्धा तयार झाले आहेत व आपण ते आवडीने बघतो आहोत.

आपण आईचे गुणगान गात असताना एक गोष्ट नेहमी दुर्लक्षित राहते, ती म्हणजे घरातील वडील. आपल्या आयुष्यात बापाचे योगदानही काही कमी नाही. बापाबद्दल कुठेही बोलले जात नाही, कधीही लिहिले जात नाही. काही जणांनी बाप रेखाटला; पण तोही रागीट, मारझोड करणारा आणि 'व्यसनी'. समाजात दहा टक्के असे असतीलही; पण चांगल्या बापांबद्दल काय? बाप हा जरी कुटुंबातील महत्त्वाचा घटक असला, त्याचे घरात कितीही योगदान असले, तरी तो एक दुर्लक्षित घटक असतो. आता हेच पाहा ना! कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते. कारण ती आपल्याला गोंजारते, जवळ घेते; कौतुक करते; पण कामावरून घरी येताना गुपचूप पेढ्यांचा बॉक्स आणणारा बाप किती जणांच्या लक्षात राहतो.
वडील त्यांच्या जीवनात खूप कष्ट करतात. काटकसर करून मुलांना पॉकेटमनी देतात. स्वत: छिद्र पडलेली बनियन घालतील; परंतु मुलीला ब्युटी पार्लरला, नवी साडी घ्यायला पैसे देतील. बाहेर जास्त पैसे जातात म्हणून घरीच बिनसाबणाची दाढी वडील आटोपत असतात. एखाद्या गरोदर आईला रुग्णालयात दाखल केल्यावर तिचे खूप कौतुक होते; पण रुग्णालयाच्या आवारात फेऱ्या मारणाऱ्या त्या बाळाच्या बापाची दखल कोण घेतो? ठेच लागली तर “आई गं' शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो; पण हायवेवर एखादा ट्रक जवळ येऊन अचानक ब्रेक लावतो, तेव्हा आपण “बाप रे' हा शब्द उच्चारतो... कारण छोट्या-छोट्या संकटांसाठी आई चालते; पण मोठी-मोठी संकटे पेलताना बापच आठवतो आम्हाला!
आईच्या बोलण्यातून व अश्रूंतून आपल्याला तिचे प्रेम समजते, जाणवत असते; परंतु बापाचा धीरगंभीर स्वभाव, वेळप्रसंगी कठोरता धरतो त्यामुळे त्यांच्या प्रेमाची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. फणसाप्रमाणे ते बाहेरून काटेरी व आतून गोड असतात. कोणतीही गोष्ट आपल्याजवळ असली की तिची किंमत आपल्याला समजत नाही; परंतु तीच गोष्ट जवळ नसली की त्याची किंमत कळते.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.