Ticker

10/recent/ticker-posts

भारतीय महिला क्रिकेट बदलत आहे

 भारतीय मुलींनी बाजी मारली...

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)


दक्षिण आफ्रिकेतील जे बी मार्क्स ओव्हल मैदानावर भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी भीमपराक्रम गाजवला. १९ वर्षाखालील 'महिला विश्वचषक' जिंकून मैदान गाजवले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंचीच पकड होती. कोणत्याही प्रकारच्या महिला क्रिकेट स्पर्धांमधील भारताचा हा पहिला विश्वचषक आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण तर आहेच; पण विशेषतः महिला खेळाडूंनी मिळवलेल्या विजयाचे महत्त्व तेवढ्यापुरते मर्यादित नसते. असे विजय खेळण्याचे स्वप्न बघणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील मुलींचे खेळाडू म्हणून मार्ग यामुळे प्रशस्त होतात. या विजयानंतर शाब्बास मुलींनो अशा शब्दांत देशभरातील क्रीडा रसिकांनी या महिला खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.



गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषांच्या क्रिकेट प्रमाणेच भारतीय महिलांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मिताली राज, अंजुम चोप्रा, झुलन गोस्वामी यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करून अनेक विक्रम नोंदविले आहेत. त्यानंतरच्या पिढीमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दिप्ती शर्मा यासारख्या खेळाडूंनीही आपले नाव कोरले आहे. महिला क्रिकेटपटूंच्या नियमित भारतीय संघामध्ये त्यांच्यासारखे गुणवान खेळाडू असल्याने गेल्या काही कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा जिंकल्या होत्या.पण, याच कालावधीमध्ये झालेला विश्वचषक स्पर्धेमध्ये मात्र या संघाला सातत्याने पराभव स्वीकाराला लागला होता. त्यामुळे पुरुषांच्या नावावर विश्वचषक जमा असले तरी भारतीय महिलांच्या नावावर मात्र कोणताही विश्वचषक नव्हता. पण, आता १९ वर्षाखाली या युवा खेळाडूंनी अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड सारख्या बलाढ्य संघाचा पराभव करून महिला विश्वचषक जिंकून एका पराक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हापासून या १९ वर्षाखाली क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासून या स्पर्धांकडे आगामी कालावधीतील खेळाडूंची तरुण पिढी म्हणूनच पाहिले जाते आहे.


मुळात महिला क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधील रँकिंगचा विचार करता भारतीय महिलांचे स्थान वरचे आहे. कसोटी असो व एक दिवसीय क्रिकेट असो किंवा टी-२० क्रिकेट असो हरमनप्रीत, स्मृति मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा या खेळाडूंनी जगातील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. 




आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या पुरुषांच्या संघाने ज्याप्रकारे आपली आघाडी कायम ठेवली आहे त्याच प्रकारचा दबदबा आता महिला क्रिकेट सुद्धा निर्माण करत आहेत असे संकेत या विजयाने दिले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा विचार करता या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंना ज्या प्रकारे मुख्य संघात संधी देण्यात आली तशाच प्रकारचा विचार आता या विश्वचषक विजेत्या संघातील महिला खेळाडूंचाही होण्याची गरज आहे. भारतीय संघातील राखीव खेळाडूंची फळी जबरदस्त आहे. महिला क्रिकेटची राखीव खेळाडूंची फळीसुद्धा तशीच जबरदस्त होण्याचे संकेत या विजयाने दिले आहेत. महिलांच्या आयपीएल संघाच्या लिलाव प्रक्रियेत ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणात उलाढाल होते ती पाहता आगामी कालावधीमध्ये महिला क्रिकेटला अजूनच प्रोत्साहन मिळण्याचे संकेतही यामुळे मिळत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा महिलांचे आयपीएलचे सामने खेळवले जातील तेव्हा त्या सामन्यांमधून सुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यात दडून बसलेल्या महिला खेळाडूंमधली गुणवत्ता समोर येणार आहे.




Photo: google


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या