नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट' गुन्हयापासून वाचविण्यात मुंबई पोलिसांना यश
WhatsApp किंवा इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातुन पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र किंवा संबधित विभागाच्या नोटीसा पाठवुन नागरिकांना अटक करण्याचे भय दाखवुन तसेच व्हिडीओ कॉल द्वारे त्यांचे हालचालींवर नियंत्रण ठेवत अटक टाळण्यासाठी पीडितांना पैसे पाठविण्यास भाग पाडतात. यामध्ये मुख्यत्वेकरुन महिला व जेष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जाते.
सध्या विविध क्षेत्रांमध्ये वेगाने होणारे डिजिटलायझेशन व पर्यायाने सायबर गुन्हयांमध्ये होणारी वाढ मोठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन तांत्रिक प्रगती आणि सामाजिक गरजांना मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद तसेच नागरिकांमार्फत सोशल मिडीया, बँकींग, ऑनलाईन शॉपींग, गेमिंग इत्यादी करीता मोबाईल व इतर माध्यमाद्वारे इंटरनेटच्या वापरात होणारी वाढ लक्षात घेऊन सायबर गुन्हेगार देखील आपले जाळे टाकत आहेत. तसेच गुन्हयांकरीता नवनवीन पद्धती अवलंबत आहेत.

नजिकच्या काळात डिजिटल अटक (Digital Arrest) फसवणूक या गुन्हयांच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार हे नागरिकांना संपर्क साधून पोलीस, आयकर विभाग, कस्टम अधिकारी, सी.बी.आय, ई.डी. इत्यादी शासकीय विभागाचे अधिकारी असल्याचे बतावणी करतात.
तसेच पीडितांच्या नावे अंतराष्ट्रीय कुरियर/पार्सल बुक केले असुन त्यामध्ये ड्रग्ज, हत्यारे, बनावट पासपोर्ट, अवैध सिम कार्ड, हवालाचे पैसे किंवा इतर अनाधिकृत गोष्टी घडल्याबाबत सांगतात किंवा आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते इ. एखादया प्रचलित केस मध्ये वापरले गेले आहे असे कळवितात व WhatsApp किंवा इतर सोशल मिडीयाचे माध्यमातुन तत्सम अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र किंवा संबधित विभागाच्या नोटीसा पाठवुन नागरिकांना अटक करण्याची भय दाखवुन तसेच व्हिडीओ कॉल द्वारे त्यांचे हालचालींवर नियंत्रण प्राप्त करुन अटक टाळण्यासाठी बळीतांना पैसे पाठविण्यास भाग पाडतात. यामध्ये मुख्यत्वेकरुन महिला व जेष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जाते.
डिजीटल अरेस्ट सारखी कोणतीही तरतूद कायदयांमध्ये अस्तित्वात नसून अशा प्रकारच्या गुन्हयांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या फसवणूर्वीपासून वाचण्याकरीता तात्काळ मुंबई पोलीस 'डिजीटल रक्षक' हेल्पलाईन मोबाईल क्रमांक ७७१५००४४४४ व ७४०००८६६६६ यावर संपर्क करावा.
सदर फसवणूक प्रकारात नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातुन प्राप्त होणाऱ्या विविध विभागाच्या नोटीसांची पोलीसांमार्फत तात्काळ पडताळणी होण्याकरिता तसेच नागरिकांनी वेळीच सावध करणे व अशा प्रकारच्या सायबर गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी मुंबई पोलीसांतर्फे 'डिजिटल रक्षक' ही हेल्पलाईन सुविधा दि. १६/०४/२०२५ रोजीपासून सुरु करण्यात आली असून याअंतर्गत नागरिकांना ७७१५००४४४४ व ७४०००८६६६६ हे मोबाईल क्रमांक मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. याद्वारे नागरिक कॉलद्वारे किंवा व्हॉटस्अपचे माध्यमातुन मुंबई पोलीसांना संपर्क साधत असतात.
चेंबुर मुंबई येथे राहणारे जेष्ठ नागरिक यांना व्हॉटस्अपद्वारे व्हिडीओ कॉल करून समोरून बोलणा-या इसमाने तो सी.बी.आय. अधिकारी असल्याचे सांगीतले तसेच आपल्या बँक खात्यांवरून मोठया प्रमाणावर बेकायदेशीर ट्रान्झेक्शन झाल्याचे सांगून त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड हवाला व्यवहारामध्ये आढळल्याचे कळविले. सदरचा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षिततेशी सबंधित असून याबाबत कोणाला काहीही सांगू नका असे धमकावून आपल्याला कधीही अटक होवू शकते असे सांगुन भीती निर्माण केली. अधिक पुरावा म्हणून सी.बी.आय. व ई.डी. कार्यालयामार्फत त्यांनी त्यांच्या नावाने नोटीसा जारी केल्या. सदरच्या नोटीसा त्यांना व्हाटस्अपद्वारे पाठविल्या व त्यांना व्हिडीओ कॉल बंद न करण्याची धमकी देवून आपल्याला डिजीटल अरेस्ट करण्यात येत असून सिक्युरीटी डिपॉझीट म्हणून काही रक्कम ट्रान्सफर करावी लागेल असे धमकी देवून पुढील आदेशाप्रमाणे काम करण्यास सांगितले. सदरचा प्रकार सुरू असतांना तक्रारदार यांची मुलगी घरात आली असता तिला वडील घाबरलेल्या व भेदरलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना विचारणा करून तात्काळ मुंबई पोलीस डिजीटल रक्षक हेल्पलाईन ७४०००८६६६६ वर कॉल करून माहिती दिली. तसेच सी.बी.आय. व ई.डी. कडून त्यांना प्राप्त झालेल्या नोटीसा ख-या आहेत किंवा कसे या बाबत विचारणा केली असता पोलीसांनी तात्काळ सदरच्या नोटीसा व्हाट्सअप द्वारे डिजीटल रक्षक क्रमांकावर मागवून त्यांची शहानिशा करून त्या बनावट असल्याचे सांगून तक्रारदार यांचे समुपदेशन केले.
तक्रारदार यांनी डिजीटल रक्षक हेल्पलाईनवर वेळीच संपर्क साधल्यामुळे तसेच पोलीसांच्या कायदेशीर समुपदेशामुळे आतापर्यंत एकुण ०५ तक्रारदारांची कथीत 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणी होणारी संभाव्य आर्थिक फसवणूक रोखण्यात मुंबई सायबर पोलीसांना यश आले आहे.
याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, डिजीटल अरेस्ट सारखी कोणतीही तरतूद कायदयांमध्ये अस्तित्वात नसून अशा प्रकारच्या गुन्हयांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या फसवणूर्वीपासून वाचण्याकरीता तात्काळ मुंबई पोलीस 'डिजीटल रक्षक' हेल्पलाईन मोबाईल क्रमांक ७७१५००४४४४ व ७४०००८६६६६ यावर संपर्क करावा.
Photo:google
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.