Ticker

10/recent/ticker-posts

थंडीमध्ये घ्या केसांची काळजी...

-दादासाहेब येंधे

थंडीमध्ये आपल्या त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणे गरजेचे असते. थंडीत केस रुक्ष, कोरडे आणि निस्तेज झालेले आपल्याला दिसून येतात. डोक्याची त्वचा कोरडी होते. केस गळणे, कोंडा होणे अशादेखील समस्या थंडीमध्ये दिसून येतात. ज्यांचे केस लांब आहेत अशा महिलांना तर केसांची जास्त काळजी घ्यावी. बाहेर जाताना कोरड्या हवेचा परिणाम केसांवर होतो. जर लग्नसमारंभामध्ये केस जर असे निस्तेज दिसले तर मूडच खराब होतो. थंडीमध्ये महिला केसांच्या त्रासामुळे अगदी हैराण होतात. अनेकदा त्यांच्यासाठी महागड्या हेअर केअर ट्रीटमेंट देखील घेतल्या जातात. पण, थंडीत केसांसाठी अगदी घरच्या घरी करण्यासारखे काही उपाय आपण करू शकतो.


१) तेलाने मालिश करा - थंडीमुळे केस कोरडे पडतात. त्यातच डोक्याची त्वचा कोरडी होऊ न देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तेलाने डोक्याची मालिश करणे गरजेचे आहे. यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते. थंडीत तेलाने मालिश केल्यामुळे केस तुटणे, गळणे किंवा कोरडे होण्याचा त्रास कमी होतो. खोबऱ्याचे तेल किंवा तुम्हाला जे तेल सूट होईल ते मालिश करण्यासाठी वापरू शकता.


२) जास्त गरम पाणी नकोच - थंडीमध्ये आपल्याला गरम पाण्याने आंघोळ करायला जरा बरं वाटतं. पण, केसांसाठी मात्र जास्त गरम पाणी खूप धोकादायक आहे. केस अगदी गरम पाण्याने धुतले तर टाळूवरील ओलसरपणा कमी होतो आणि त्यामुळे केस कोरडे होतात. गरम पाण्याचे तापमान आपल्या नेहमीच्या पाण्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला खाज सुटणे, टाळूची आग होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरणे योग्य असते.

३) शाम्पूने केस धुणे - थंडीच्या दिवसात केस धुण्यासाठी योग्य प्रकारचा शाम्पू वापरा. म्हणजेच खूप जास्त केमिकल्स असलेला शाम्पू वापरू नका. हार्ड शाम्पू वापरल्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं.

४) कंडिशनिंग - थंडीमध्ये शाम्पू लावून केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग करायला विसरू नका. केसांना कंडिशनर लावणं महत्त्वाच आहे. त्यामुळे तुमचे केस कोरडे आणि रुक्ष होणार नाहीत. त्यातील ओलसरपणा तसाच टिकून राहील. थंडीत केस लवकर कोरडे पडतात. त्यामुळे केसांना कंडिशनर लावल्यानंतर ते रुक्ष होत नाहीत. थोड्या वेळाने कंडिशनर धुवून टाकावे. नेहमी चांगल्या प्रतिचाच कंडिशनर वापरावा. 

५) भरपूर पाणी प्या - आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाला माहीत आहेच की, केसांच्या पोषणासाठीही पाणी पिणे गरजेचे आहे. व्यवस्थित आणि भरपूर पाणी पिल्याने केसांना योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळतं. 

६) केस कधीही ओले ठेवू नका - केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित पुसून कोरडे करा. त्यासाठी अगदी हेअर ड्रायरचा वापर करायलाच हवा असं काही नाही. पण, केस अजिबात ओले राहू देऊ नयेत. केस ओले राहिले तर ते लवकर तुटतात. पण, अगदी जोरजोरात चोळूनही केस पुसू नका. नाहीतर केस खूप रुक्ष होऊ शकतात. त्यातही केसांना कलर केला असेल आणि ते ओलसर राहिले तर त्यांचा रंग जाण्याचीही शक्यता असते. ओले केस असताना ते विंचरू नका किंवा त्यातला गुंता काढण्याचा प्रयत्न करू नका. 

७) योग्य आहार महत्त्वाचा - थंडीमध्ये योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. थंडीमध्ये भूक जास्त लागते. चमचमीत, तिखट खावंसं देखील वाटतं. पण, अति तेलकट खाल्ल्याने केसांवर परिणाम होतो. थंडीत भरपूर भाज्या, फळे सहज उपलब्ध असतात. त्यांचे सेवन करावे. ताज्या भाज्या, फळांचा आपल्या रोजच्या आहारात न चुकता समावेश करावा. ड्रायफूट्स खावेत. योग्य आणि समतोल आहार घेतल्यास केस निरोगी आणि चमकदार होतील.



Photo: Viral

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.