Ticker

नवीन वर्षात व्हा फिट अँड तंदुरुस्त...

नव्या वर्षासाठी आपण काही संकल्प करतो. पण, पुढच्या काही दिवसात ते संकल्प हवेत विरून जातात. पण, असे यावेळी होऊ नये तसेच आपल्याला झेपतील असे संकल्प प्रत्येकाने करायला हवेत. संकल्प न करता थेट कृती केली तर आपल्यासाठी चांगलं आहे. पण, ठरवलेल्या गोष्टी नवीन वर्षात आवर्जून व्हायला हव्यातच. या गोष्टी नियमित केल्यास आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

-दादासाहेब येंधे

केशवसुतांनी म्हटले आहे, 

'जुने जाऊ द्या मरणालागुनी,  
जाळूनी किंवा पुरुनी टाका, 
सावध ऐका पुढल्या हाका...'

त्याच धर्तीवर ओशो रजनीश यांनी भूतकाळाबद्दल आपले विचार मांडले आहेत. नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण गत वर्षाचा आढावा घेतो. त्याचवेळी जाणवते आज मी तेच काम वेगळ्या पद्धतीने, वेगळ्याप्रकारे केले असते. वयाप्रमाणे ज्ञानात, अनुभवात, विचारात फरक पडतो. भूतकाळातून झालेल्या चुका सुधारा. पण, भूतकाळात अडकून बसल्यास, चिटकून राहिल्यास प्रगती खुंटते. तसेच आपण येत्या वर्षात काय करायचे याची आखणी करा. परंतु त्या भविष्याच्या दिवास्वप्नात फक्त रममाण झाल्यास हाती असलेला वर्तमान काळ निघून जाईल. तेव्हा तरुणांनो वर्तमान काळात जगा. स्वतःला फिट आणि तंदुरुस्त ठेवा. नववर्ष निमित्ताने स्वतःच्या जगण्याला आपण कोणती दिशा द्यायची, कोणत्या रस्त्यावरून चालायचे हे स्वतःच, स्वतःसाठी ठरविले पाहिजे. त्यासाठी स्वतःशीच संवाद साधला पाहिजे. प्रत्येक उगवणाऱ्या दिवसाला आजचा दिवस माझा आहे असे समजून तयारीला लागणे गरजेचे आहे.


नवीन वर्ष म्हणजे नवीन इच्छा, नव्या आकांक्षा आणि नवी स्वप्नं घेऊन येणारा काळ. नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आणि समाधानाचे जावो... अशा आपण एकमेकांना शुभेच्छा देतो खऱ्या. पण, हे वर्ष खऱ्या अर्थाने आरोग्यदायी सुंदर आणि आनंददायी व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर नवीन वर्षात ठरवून आपण काही गोष्टी स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. नव्या वर्षासाठी आपण काही संकल्प करतो. पण, पुढच्या काही दिवसात ते संकल्प हवेत विरून जातात. पण, असे यावेळी होऊ नये आणि आपल्याला झेपतील असे संकल्प प्रत्येकाने करायला हवे. संकल्प न करता थेट कृती केली तर आपल्यासाठी चांगलं आहे. पण, ठरवलेल्या गोष्टी नवीन वर्षात आवर्जून व्हायला हव्यातच. या गोष्टी नियमित केल्यास आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

नवीन वर्षाची सुरुवात झाली की, आपण व्यायाम करण्याचा संकल्प करतो. पण, आपल्याकडून हा संकल्प पुढचा एक महिनादेखील टिकत नाही. असे होऊ नये म्हणून आपण नियमित व्यायाम करावा आणि रोज ठरवून दिवसातल्या कोणत्याही वेळी १५ ते २० मिनिटे चालण्यास सुरुवात करावी. रोज हलका व्यायाम करावा. नवीन वर्षात आठवड्यातले काही तास आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवायला हवेत. यामुळे आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल.

टेन्शन, ताण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर येतोच येतो. यामध्ये सामान्यपणे व्यवहारीक गोष्टी, आर्थिक गोष्टी, आरोग्य, नातेसंबंध या गोष्टींचा ताण सर्वात जास्त असतो. पण, या ताणाचे, टेन्शनचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास आपण मानसिकरित्या सक्षम होऊ शकतो. त्यामुळे भावनिकदृष्ट्याही आपण स्वतःला सावरू शकतो. यासाठी ध्यान, प्राणायाम, अशा मनःशांतीशी संबंधित गोष्टींचा समावेश आपल्या जीवनात करावा.

फिट राहायचे म्हटले की जिम, अवास्तव व्यायाम, हे खाऊ की ते खाऊ, अशी जीवाची घालमेल, त्यात आणखी भर म्हणजे इतरांची सल्ले देण्याची घाई आणि मार्केटिंगचे फंडे अजमावणारे लोक. गोळी खा, वजन कमी करण्याच्या जाहिरातींचा भडिमार; पण, थांबा. उत्तम आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी कायमस्वरूपी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच रोज नित्यनियमाने केलेला व्यायाम आणि निरोगी खाण्याकडे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे. 

हल्ली धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही. स्वतःला वेळ देऊ शकत नाही. कामाच्या व्यापात खाण्याच्या वेळा पाळणे शक्य होत नाही. तसेच बाहेर फिरताना हल्ली आपण फास्ट फूड खाण्यास जास्त प्राधान्य देतो. रोज बऱ्याच जणांना कामावर पोहोचण्यासाठी बऱ्याच अंतरावरावरून प्रवास देखील करावा लागतो. त्यामुळे रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे ही तर आजच्या पिढीची जीवनशैली झाली आहे. पण, निसर्ग नियमाप्रमाणे सूर्योदय होता उठणे आणि सूर्यास्तापर्यंत शेवटचा आहार घेणे आरोग्यासाठी हितकारक मानले गेले आहे. सतत तणावाखाली राहिल्याने शरीरात चांगले नसलेले हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे शरीर स्थूल होते. व्यायाम केल्याने शरीरातील विषारी घटक शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत होते. शरीरास जास्त ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. फुफ्फुसाचे आरोग्य चांगले राहण्यास देखील मदत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या