लाईक आणि फॉलोअर्ससाठी आयुष्य पणाला...
-दादासाहेब येंधे
स्मार्टफोन सध्या वरदानरुपी ठरत आहे. कारण यात अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा शोध आपण घेऊ शकतो. संकटात सापडलेल्या व्यक्ती याच माध्यमातून इतरांशी संपर्क साधू शकतो. संपूर्ण जगातील माहितीचा स्मार्टफोन एक खजिना आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कितीतरी वाईट गुन्हेगारांचा शोध लावण्यास मोबाईल हा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण दुवा ठरलेला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणीपासून ते पेपरची तयारी करून घेणे पर्यंतचे सर्वच उपाय यात आहेत. पण, एक शोकांतिका अशी की या साधनांचा उपयोग चांगल्या कामासाठी कमीच केला जातो आणि वाईट कामांसाठीच जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्मार्टफोन युवकांसाठी वरदान नसून शाप ठरत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरवू नये. ड्रायव्हिंग करत असताना फोनवर बोलल्यामुळे होणारे अपघात, सेल्फी काढण्याच्या नादात गेलेले नाहक जीव यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
दोन वर्षांपूर्वी सेल्फी काढताना वांद्रे बँड स्टँडवर समुद्रात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईतील काही ठिकाणी नो सेल्फी घेऊन म्हणून मुंबई पोलिसाकडून घोषित करण्यात आले आहे. पोलिसांनी हा निर्णय त्या ठिकाणी सेल्फी काढणे धोकादायक असल्यामुळे घेतला आहे. मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, बांद्रे, बँड स्टँड, फोर्ट, वरळी, येथे होणारे अपघात टाळण्यासाठी पालिकेच्या स्थानिक प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. नाशिकमध्येही सेल्फी काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू झाला होता. याशिवाय सप्टेंबर महिन्यात आग्रा येथील ताजमहाल येथे सेल्फी काढताना पायऱ्यांवरून पडून एका जपानी पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईतील कांजूरमार्ग येथे एक चौदा वर्षीय शालेय विद्यार्थी सेल्फी काढण्यासाठी रेल्वे गाडीच्या टपावर चढला आणि त्याचा संपर्क २५ हजार व्हॉट्सच्या ओव्हरहेड वायरशी झाला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता.
सेल्फी हा सध्या तरुणांचा जीव की प्राण झाला आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकतर शाळेत शिकणाऱ्या मुलांना मोबाईल हवाच कशाला.? मोबाईल कंपनीही सध्या चांगले सेल्फी कॅमेऱ्याचे फोन बनवायला लागले असून पुढेही फ्लॅश लाईट सुविधा देण्यात आली आहे. सध्या तरी चित्र असे आहे की, भारतात काही अंदाजे ८० कोटी लोक आज स्मार्ट फोनचा वापर करत आहेत आणि याचा वापर दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. तंत्रज्ञान हे माणसाचा मित्र आहे की दुश्मन हेच कळत नाही. सेल्फीचा प्रसारही चित्रपटातून मोठ्या प्रमाणात केला जातो. महाविद्यालयात सेल्फी स्पर्धा भरवण्यात येते. काही ठिकाणी नुकतेच महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या मुलीने आम्ही मोबाईल घेतला आहे. तो फक्त सेल्फी फोटो काढण्यासाठी वापर करतो. आम्ही काही गुन्हा करतो का? असा एका पंधरा वर्षीय मुलींने मत व्यक्त केले होते. आजकाल सेल्फीचा वापर हा आरशासारखा करण्यात येत आहे. सकाळी उठले की सेल्फी रात्री झोपताना सेल्फी...? बरं दिवसातून एकदा दोनदा सेल्फी काढणं आपण समजू शकतो. पण, दिवसातले दहा-बारा तास..? असला मानसिक रोग जडलेले अनेकजण आहेत.
सध्या काही मुली सेल्फीचा वापर आरशासारखा करताना दिसून येत आहेत. कोणी जर चॅट करताना विचारलं की कुठे आहेस? तर या प्रश्नाचे उत्तर शब्दात न देता त्या चटकन फोटो पाठवतात आणि लिहितात ओळख पाहू. मी कुठे आहे? येवढी क्रेज या तरुण पिढीमध्ये सेल्फीची बनली आहे. मुली सेल्फी काढताना पाऊटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. म्हणजेच ओठ पुढे करत वाकडेतिकडे तोंड करत फोटो काढणे. जीभ बाहेर काढत सेल्फी काढणे. हे प्रकार प्रसिद्ध आहेत. मुलींमध्ये फोटो काढण्याचे प्रमाण येवढे आहे की, दिवसाला त्या कमीत कमी २० सेल्फी फोटो काढतात. तसेच सेल्फीचे समर्थन करणाऱ्या एक मुलींचा गट होता, त्यांच्या म्हणण्यानुसार सेल्फीमुळे आम्हाला चांगले फोटो साठवता येतात. त्यामुळे आम्हाला सेल्फी काढायला आवडते. आम्हाला आमचे सौंदर्य अधिक जवळून पाहता येते. काही जणांच्या चुकीमुळे आम्ही काय सेल्फी काढणे बंद करायचे का? असा सवाल त्यांनी केला होता.
सेल्फीमुळे दुसऱ्या कोणाला आपला फोटो काढ असे सांगायची गरज भासत नाही. कारण स्वतःचा फोटो आम्ही स्वतःच काढू शकतो. जर सेल्फी काढणार नाही तर एवढ्या महागड्या स्मार्टफोनचा उपयोग तरी आम्हाला काय असे तरुण पिढीचे मत आहे. तरुणांच्या मते सेल्फी काढण्याचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये कमी आहे. तरीपण काही मुली सेल्फी काढण्यासाठी नको ते धाडस करतात. त्यात आपला जीव गमावून बसतात. स्वतःच्या जीवापेक्षा काही मोठं नाही हे अजून नव्या पिढीला कळत नाही. असेच यावरून दिसून येते. काही सॉफ्टवेअरच्या मदतीने फोटो अजून गोरा किंवा त्यामध्ये वेगळे इफेक्ट्स करतात. त्यामुळे फोटो अजून उठावदार दिसतो आणि चेहऱ्याची चमक वाढल्यावर कोणाला सेल्फी काढण्याचा मोह आवरणार नाही असं मत एका उच्चशिक्षित तरुणाने व्यक्त केले होते.
फॅशनच्या दुनियेत जीवावर बेतणारी स्टंटबाजी सेल्फी आणि पाण्यात केलेली मौजमजा सर्वच तरुणाईला अंध:काराच्या जवळ घेऊन जाण्यास कारण ठरत आहे. उंच कडे, कपारी, धबधबा, पर्वत, उंचावरील गड, किल्ले, समुद्राच्या पर्यटन स्थळावर फिरायला गेले असताना अनेकांना सेल्फीचा मोह आवरत नाही. पण, ही आवड आपल्या जीवावर बेतणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. पण, ती काळजी न घेता अशी तरुणाई आपली स्फूर्ती आणि अविवेकाच्या भरात आपला जीव गमावण्यास कारणीभूत ठरत आहे. ही सत्य पस्थिती नाकारून चालणार नाही. म्हणूनच आज नैसर्गिक मृत्यूपेक्षा आपल्या हाताने ओढवून घेतलेल्या मृत्यूंचे प्रमाण भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सोशल मीडियाच्या आहारी जात सेल्फीचे हे विनाशकारी भूत अनेकांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत आहे. याला तरुणाईने वेळीच सावध होऊन आळा घातला पाहिजे.(लेखक क्राईम रिपोर्टर आहेत.)
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.