पहिल्यासारखे ओबडधोबड रस्ते आजकाल दिसून येत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरातील बहुतांश अंतर्गत रस्ते सिमेंट, काँक्रीटचे असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान झाला आहे. महामार्गावर गाड्या सुसाट धावत असतात. त्याचबरोबर अपघातांच्या घटनांनी देखील तितकाच वेग पकडल्याने या वाढत्या अपघातांतून धडा घेणे गरजेचे आहे.
चालकांच्या चुकीमुळे ८० ते ८५ टक्के अपघात होतात. इतके बेफाम होऊन गाडी चालवली जाते की, अपघात घडल्यानंतर कोणीच वाचले जात नाही. चालकाला डुलकी लागणे, दारू पिऊन गाडी चालवणे यामुळेही अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी जात असल्याचे कारण समोर येत आहे. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई लागलेली असते. कोणताही विचार न करता चालक गाडी ओव्हरटेक करतात. विशेषकरून, वळणावर समोरची गाडी दिसत नाही. सावकाश जाणे गरजेचे असते. वेगात चालवली जाते. परिणामी, अपघात घडतो.
रस्त्यावर धावणाऱ्या गाडीचा अचानक एखाद्या पार्ट तुटला जातो किंवा टायर पंचर होतो. या गोष्टीही अपघातांना आमंत्रण देतात. विशेष करून मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना रिमोट केलेले किंवा जुने टायर वापरले जातात. पैसे वाचवण्यासाठी गाडी मालक इतरांच्या जीव धोकात घालत असून टायरची झीज होऊनही वेळीच टायर बदलले जात नाहीत. त्यामुळे चालकांचा गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय रस्त्याच्या कडेला एखादा ट्रक उभा झाल्यास मागील लाल दिवे बंद किंवा खराब झालेले असतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाडीला अंदाज येत नाही आणि थेट या ट्रकवर जाऊन गाडी आदळते. जवळपास १०० ट्रकपैकी ८० ट्रकचे मागील दिवे बंद असल्याचे तज्ञांचे निरीक्षण आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे टायर रॉड तुटण्यामुळेही अपघात होतात. तातडीने ब्रेक मारल्यास गाडीची समोरची चाके लॉक होतात आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते त्यामुळे गाडी सुस्थितीत असणे खूप गरजेचे आहे.
६५ टक्के अपघात हे राष्ट्रीय महामार्गांवर होतात. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही दोन राज्ये अपघातांबद्दल आघाडीवर असली तरी महाराष्ट्रही याबाबत मागे नाही. अपघातांची अनेक कारणे देतात. मद्य प्राशन करून ड्रायव्हिंग करणे सर्वात मोठे कारण असल्याचे दिसते, शिवाय काही ठिकाणी असलेली रस्त्यांची वाईट अवस्था, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक नियमांच्या पालनाबाबतची उदासीनता, सार्वजनिक वाहतूक साधनांचा अभाव, वेगाने वाहन चालवण्याच्या सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष, गाडी चालवताना होणारा मोबाईलचा वापर, सलग आणि कित्येक तास गाडी चालवणे, सीटबेल्ट न बांधणे अशीही अनेक कारणे दिसून येतात. या गोष्टी आपल्या हातातल्या असल्यामुळे त्याचे भान ठेवून सर्वांनी काळजी घेतली तर अपघात बळीचे प्रमाण कमी करणे सहज शक्य आहे. रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरणाऱ्यांपेक्षा नुसते जखमी होणाऱ्यांचे प्रमाण पंधरा पट अधिक आहे. अपघातांमधून वाचलेल्या अशा व्यक्तींमध्ये काही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिणाम राहतात. प्रत्येक अपघातात होणाऱ्या शारीरिक इजा कमी अधिक प्रमाणात असू शकते. काही अपघात किरकोळ म्हणून प्रथमोपचार करण्यासारखे असतात. त्यामुळे अपघात झाल्यानंतर प्रथमोपचार व इतर आपात्कालीन उपायांची माहिती असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. रस्ते अपघातांमध्ये आपत्कालीन क्रमांकाबद्दल तसेच शासनाच्या १०८ या सेवेबद्दल आपण अवगत असणे गरजेचे आहे. वेळीच मिळालेला प्रथमोपचार लाख मोलाचा ठरू शकतो.
अवघड, आंधळी वळणे हेही अपघाताचे प्रमुख कारण आहे. वळण चुकीचे असणे किंवा वळणावर गार्डस्टोन लावलेले नसल्यानेही अपघात होतात. वाय जंक्शन हे अपघात प्रवण क्षेत्र आहे. रस्ते गुळगुळीत नसावेत, रस्त्याच्या कडेला पांढरे दगड लावावेत, दूरूनही वाचता येतील असे फलक असावेत. मार्गीकेबाबत रस्त्यावर मार्किंग करावी. याशिवाय अनेक उपाययोजना केल्यास अपघात बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतात. वाहन चालकांनी देखील आपले घरी कोणीतरी वाट पाहत आहे हे लक्षात ठेवून गाडी चालवताना काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण घटण्यास नक्कीच मदत होईल.
Photo: google

1 टिप्पण्या
खूप छान माहिती या लेखांमधून दिलेले आहे
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.