Ticker

10/recent/ticker-posts

भेटी लागी जीवा...

कोणतीही औपचारिक किंवा कायदेशीर व्यवस्था नसताना स्वयंशिस्तीने भक्‍तीचं हे विद्यापीठ शेकडो वर्षं आपलं काम करत आहे


महाराष्ट्राचा अपूर्व भक्‍ती सोहळा म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपुरात भरणारी पांडुरंगाची यात्रा, असं म्हणावं लागेल. हल्ली केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशविदेशांतूनही अनेक भक्‍त आषाढीच्या निमित्ताने पंढरीच्या वारीमध्ये, वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये हरिनामाचा गजर करण्यासाठी सहभागी होतात. मन आणि शरीराचा सगळा शीण घालवून समाधानाचं वरदान प्राप्त करून घेतात. आषाढी एकादशीला श्रद्धा, भक्‍ती हीच माणसाच्या किंवा एकूण विश्वाच्या जीवनाचा सिद्धांत आहे, हे सांगणारा महोत्सव पुन्हा एकदा भरेल. लाखो विठ्ठलभक्तांची मांदियाळी चंद्रभागेच्या तीरावर मनोमन पांडुरंगाचं दर्शन घेईल. प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायला मिळालं नाही, तरी मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन रोमारोमांत विठुठलमय झालेला वारकरी खऱ्याखुऱ्या आनंदाचा वाटेकरी होईल.


डोक्यावर पितळी, तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या बायका, दिवे घाटात फुगडी खेळणारे वारकरी, भारूड  म्हणणारी मंडळी, रस्त्याच्या कडेने बसलेले विक्रेते आणि ज्या जनसमुदायाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही नजरेच्या टप्प्यात येत नाही, अशी गर्दी! शिवाय जोडीला टाळ-मृदंगाच्या नादात ज्ञानोबा माऊली, तुकाराम'चा  जयघोष! सासवडच्या सोपानदेवाचं दर्शन, जेजुरीचा खंडेराया, वेल्ह्याचं वाल्मिकी मंदिर आणि तेथील ग्रामस्थांनी घरोघरी उभारलेल्या गुढ्या... सारंच विलक्षण आनंददायी! पुढे लोणंद- तरडगाव मार्गावरचा चांदोबाचा लिंब अन्‌ तेथील उभं रिंगण तर केवळ अनुपम! यामध्ये माऊलींच्या रथापुढे दिंड्या! या दिंड्यांचे दोन भाग करून मधल्या  जागेतून माऊलींचे अश्व वेगाने धावत रथापुढे येतात. माऊलींना नमस्कार करून यू-टर्न घेऊन पुन्हा आपल्या जागेवर धावत जातात. त्या घोड्यांची पायधूळ  भक्तिभावाने कपाळी लावण्यासाठीही झुंबड असते.


आपुलकीचे भाव

वारीमध्ये चालताना आपल्यासोबतच्या सवंगड्यांच्या बरोबर आपुलकीचे भाव निर्माण होतात. कारण आपण सतत आपल्या सद्गुरूंबरोबर चालत असतो. त्यांनी आपले हात त्यांच्या हातात घेतलेले अंसतात. आपण सतत त्या भगवंताचं नाम घेत, भजन करत चालत, नाचत राहिलो तर कसलंही दुखणं आपणास स्पर्शही करत नाही. माझाच गेल्या वर्षीचा अनुभव असा की, आपण जर वारी सोडून पुढे किंवा मागे राहून घरगुती गप्पा मारत चाललो, तर त्रास झाल्यासारखं वाटतं आणि तेच विठ्ठलाचं नाम घेत भजन करत चाललो तर 'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटवाची” हा अनुभव मिळतो. वारीत घडणाऱ्या संत संगतीमुळे, त्यांच्या अभंगांमुळे संत विचारांचं अनुकरण वारकरी जीवनात करत असतात. तुमच्या गळ्यात माळ असो किंवा नसो, वारीत माणसं तुमच्या पाया पडतात. तुम्हाला “माऊली” म्हणतात. तुमच्या वयाचा विचार करत नाहीत. हा सर्व संतांच्या संगतीचा परिणाम आहे. संत संगतीमुळे आपलं जीवन घडतं. वारकरी वारीत कसल्याही गैरसोयीची तमा बाळगत नाही. कारण त्याचा तो नसतो, तो सर्वस्वी त्या माऊलीचा होऊन जातो. अंधश्रद्धेला थारा नसलेला हा वारकरी सांप्रदाय खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे. जातीपातीला नसलेला थारा, हेच याचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र हे उत्सवप्रिय राज्य आहे. दर महिन्याला एक तरी सोहळा महाराष्ट्रात साजरा केला जातो. यामागचं कारण म्हणजे, या निमित्ताने “समाजाने संघटित व्हावं, हाच खरा उद्देश यामागचा आहे. विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेला वारकरी नुसताच देव देव करणारा नसतो, तर तो खऱ्या अर्थाने कष्टकरी आणि श्रमजीवी असतो. म्हणून तर इतर देवस्थानांच्या पायाशी कोट्यावधी रुपयांचे दान देणारा भक्‍त आणि पंढरपुरातील वारकरी, यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विठू माऊलीकडे लीन होणारा भक्‍त हा कधीही आपल्या संपत्तीचं वाजवीपेक्षा दर्शन करत नसतो. पंढरपुरात जाणारा प्रत्येक वारकरी मोहमायेपासून शेकडो मैल दूर असतो. त्याला कोणतीही लालसा नसते. त्याला आस असते, ती फक्त विठू माऊलीच्या दर्शनाची. गळ्यात तुळशीची माळ आणि तोंडाने विठू नामाचा जप, हीच त्याच्यासाठी संपत्ती असते. 


भक्‍तीचं विद्यापीठ

आज कलियुगाचा महिमा सांगितला जातो. जिकडे तिकडे अविश्‍वास आणि भौतिक सुखाची लागलेली भयंकर आस जागोजागी पाहायला मिळते. याचं प्रमुख कारण म्हणजे, जगण्याचं खरं समाधान कशात आहे, याचीच ओळख होत नाही. पैसा मिळाला, सुख मिळालं की, आपल्याच मौजमस्तीमध्ये रमणारा माणूस मनामधून अनेक कारणांनी मात्र दुःखी राहत असतो. श्रद्धेचा पायाच ढासळल्यामुळे भौतिक सुखाची ही इमारत केव्हा मोडकळीला येईल, याचा भरवसा राहतं नाही. हा सगळा अनुभव घेऊनच आपल्या भारतीय संस्कृतीच्या ऋषीमुनींनी आणि संतांनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भक्‍ती सोहळ्यांची व्यवस्था केली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. संसार, प्रपंच करताना अनेक समस्या येतात; परंतु त्यातून पळून न जाता, विरक्ती न घेता त्यांनी त्याला भक्तीची जोड दिली आणि कृतीचं महत्त्व पटवून दिलं. महिना-दीड महिना वारीमध्ये सहभागी झालेला व्यापारी वर्ग असो किंवा शेतकरी असो, तो पुन्हा आपापल्या गावाला जाऊन कामाला लागेल. केवळ आषाढीला पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतलेला वारकरीसुद्धा श्रद्धेची ही साठवण मनामध्ये ठेवत असतो. स्वत:बरोबर आपल्या घरात प्रपंचामध्ये भक्तीचा दिवा तेवत ठेवत असतो. कोणतीही औपचारिक किंवा कायदेशीर व्यवस्था नसताना स्वयंशिस्तीने भक्‍तीचं हे विद्यापीठ शेकडो वर्षं आपलं काम करत आहे. अनेकांना जीवनाच्या खऱ्या समाधानाचं शिक्षण देत आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर, अनेकांचं भविष्य घडवण्यासाठी जो आत्मविश्वास आणि जी जीवनमूल्यं लागतात, ती देण्याचं काम अशा प्रकारच्या भक्‍तीतून केलं जातं.


यासाठीच पंढरीचा महिमा वर्णावा किती, अशा प्रकारचं वर्णन पांडुरंगाबाबत केलं गेलं आहे. कारण तसा अनुभव आत्तापर्यंत लाखो भक्तांनी घेतला आहे. सगळा भार देवावर न टाकता आपल्यावरच्या जबाबदारीचं भान त्या देवाच्याच कृपेने बाळगण्याचं आवाहन त्या निमित्ताने केलं जातं. तेच पंढरपुरात जमलेल्या वैष्णवांच्या मांदियाळीचं वैशिष्ट्य ठरतं.


आयुष्याच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना काही काळासाठी का असेना, जीवन मुक्‍ततेची ही अनुभूती देणारी ही भक्‍ती म्हणूनच मोलाची ठरते आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या