पुरुषांचे मुंडण करणाऱ्या वैशालीची जिद्द
-दादासाहेब येंधे
सलून म्हटलं की महिला तिथं जात नाहीत. जुन्या पारंपरिक वळणाच्या सलूनची जागा आता यूनिसेक्स सलून म्हणत मोठ्या शहरात उभे राहू लागले आहेत. त्यात महिलाही दिसून येतात. पण, छोट्या शहरात गावखेड्यात ही गोष्ट अशक्यच. त्यातही एखाद्या महिलेकडे पुरुष केस कापून घ्यायला, टक्कल करायला येत असतील तर यावर विश्वास ठेवणं म्हणजे जरा जडच... मात्र, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मात्र एका वेगळ्या वाटेने, हिमतीने चालणारी महिला आहे. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंड परिसरात दिसून येतात त्या वैशाली मोरे. धार्मिक विधीसाठी तीर्थक्षेत्री आलेले अनेक पुरुष तिच्याकडून मुंडन करून घेतात आणि तीदेखील आपलं काम अत्यंत आत्मविश्वासाने आणि हिमतीने पार पाडते. जुन्या रूढी आणि परंपरांना वैशालीने मोडून काढलंय. तिच्याकडून दररोज ५० ते ७० जण मुंडण करून घेतात.
वैशाली सकाळीच आपल्या दुकानात हजर होते. तिथे मुंडण करून घेण्यासाठी पुरुष थांबलेले असतात. कुठेही वस्तरा न लागता, न खरचटता अगदी सफाईदारपणे ती तिचे काम करते. गुळगुळीत डोक्यावर हात फिरवत, अंगावर पडलेले केस झटकून टाकत एक एक जण पैसे देऊन निघुन जातो. गरज असेल तसे कधी कधी दिवसभर तर कधी सकाळ, दुपारच्या वेळेत हे तिचे काम चालते. पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र, धार्मिक क्षेत्र असलेल्या छोट्या गावात शांततेने पण तितकेच कणखरपणे आपले काम वैशाली चोख बजावत आहे.
पण, पुरुष जे काम करतात ते तू कसं करू सुरू केलं असं विचारलं तर वैशाली तिची गोष्ट सांगते.
त्यानंतर एक दिवस सकाळी ती दुकानात गेली आणि तेव्हाच काशीचे ब्राह्मण आजोबा मुंडन करून घेण्यासाठी आले होते. भावाने त्यांना, 'ही माझी बहिण असून तिने तुमचे मुंडन केले तर चालेल का?' असा प्रश्न केला. आजोबांनी हसतमुखाने होकार दिला. त्यांना नमस्कार करून वैशालीने मुंडण करण्यास सुरुवात केली. अगदी सफाईदारपणे तिने त्या आजोबांचे मुंडण केले. आजोबांनी वैशालीला भरभरून आशीर्वाद दिले. त्यानंतर वैशाली आजपर्यंत कधीच थांबली नाही. तिचं काम सुरु झाले तेव्हा भाविक, पर्यटक, गावकरी तिचे काम बघायला जमत होते. मात्र, कोणालाही न घाबरता, न लाजता तिने आपले काम चालू ठेवले.
वैशालीच्या मुलीने एलएलबी पूर्ण केले असून लवकरच आपली मुलगी वकील होणार आहे त्याचा वैशालीला आनंद आहे. वैशाली उत्तम पोहते. त्र्यंबकला झालेल्या मागील दोन्ही कुंभमेळ्यावेळी तिने कुशावार्तावर जीवरक्षक म्हणून सेवादेखील बजावली आहे. अनेकांचे जीव वाचवले आहेत. पोलीस मित्र म्हणून देखील तिने काम केले आहे. महिला दक्षता समिती सदस्य म्हणून देखील ती काम करते. वैशालीला आजवर अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी वैशालीनं वस्तरा हाती घेतला असला तरी वैशालीने अनेक जुन्या रुढी, परंपरांनादेखील वस्तरा लावला आहे असे यानिमित्ताने म्हटल्यास वावगे ठरू नये.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.