Ticker

10/recent/ticker-posts

पावसाच्या आठवणींची साठवण

 पहिला पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो

-दादासाहेब येंधे

हवाहवासा वाटणारा मनात दाटणाऱ्या पावसाची अनेक रूपे आपल्याला आता पहावयास मिळू लागली आहेत. आपल्या स्वभावाप्रमाणेच पावसाच्याही स्वभावाची ही रूपंच म्हणावी लागतील. कधी हलक्या सरींचा, कधी अंतरंगात शिडकावा करणारा, कधी उग्र रूप धारण करून घाबरवणारा, तर कधी भर उन्हात बरसणारा श्रावणातील पाऊस... अशी पावसाची अनेक रूपं पाहतानाच वादळी वाऱ्यासोबत बरंस, बरंस बरसणाऱ्या पावसाचे रुद्र रूप म्हणजे काळजात धस्सं करणारेच..! 'आला आला रे'... म्हणावे अशी स्थिती असताना अचानक ढग स्वच्छ होऊन पांगापांग करतात. मग 'येरे येरे पावसा'.. ची मनधारणी करायला लागते. खरेतर पाऊस आपल्याला त्याच्या मर्जीप्रमाणे भाग पाडतो. पावसाची प्रतिक्षा फक्त चातकच करीत नाही तर, जमिनीवरच्या प्रत्येक सजीवाला त्याची आस असते. मग, तो हाडामासाचा माणूस असो की एखादा वृक्ष. त्यामुळेच इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा प्रचंड उत्सुकता वाटायला लावणारी असते. 



मानवापेक्षा पशुपक्ष्यांना मात्र पावसाचा अंदाज बरोबर करता येतो. अगदी मुंगीलाही कळते पाऊस कधी येणार.. काळ्या मुंग्या तर बाहेर पडून पावसाचे तजवीज करण्यात मग्न असतात. झाडांवर कावळ्यांची काव काव सुरू असते. ते आपली घरटी बांधण्यासाठी वेगवेगळ्या झाडांवर जागा शोधत असतात. तर चिमण्या घराच्या वळचणीला भिंतीत कुठे जागा आहे का? याचा शोध घेत असतात. गुरांनाही पावसाचा अंदाज आलेला असल्याने ते पाऊस येण्याच्याआधी आपल्या वासराला चाटत हंबरत असतात. तर चातक पक्षी मोठमोठ्याने ओरडत पावसाला विनवणी करत असतो.


पहिल्या पावसात भिजण्याचा जो आनंद असतो, चेहऱ्यावर जे समाधान असतं ते शब्दांत मांडणं खरंतर अवघड आहे. पहिल्या पावसात झाडांच्या पानांवर पाणी पडल्यावर झाडं जशी बहरतात, पानं चमकतात तसंच मन आणि शरीर प्रफुल्लित होऊन जातं.


खरंतर पाऊस कविमन जागविणारा. पावसाळ्यावर आतापर्यंत अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत. पावसाच्या अनेक कविता आजही नकळत ओठांवर येतात. पावसाचे मेसेज, पावसाची गाणी, आदींतून नव्या संकल्पनांना घेऊन पावसाचं रूपक साहित्यातूनही अनेकदा उलगडलेलं आपणास पहावयास मिळालं आहे. 


पहिला पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो. मात्र, याच पावसाने जर कहर केला तर उन्हाळा बरं होता असं म्हणायची पाळी येते. पहिल्या पावसातील मातीचा सुगंध मनाला मोहून टाकतो. गरमागरम भजीचा सुगंध जिभेवर रेंगाळतो. कविमनाला जाग येते. तरुणाईला पावसाळी पिकनिकचे वेध तरुणाईला लागतात.


पावसाच्या अनेक आठवणींची साठवण प्रत्येकाच्या मनात रेंगाळलेली असते. अंगणातल्या पावसाची रिमझिम.., कधी सरींवर सरी बरसणारा पाऊस.., कौलारू घरातून येणारे थेंबांचे तुषार उडविणारा पाऊस.. तर घराच्या पत्रांवर तडतड ताशाच्या आवाजात नाचणारा पाऊस.. झऱ्यांमध्ये खळाळणाऱ्या पावसाचे ते रूपही नकळतच मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपून बंदिस्त होणारंच असतं.. 


पाऊस जरा कमी झाला की, समुद्रकिनारी वाळूवरती लहान-लहान खेकड्यांची धावपळ पहावयास मिळते. ही धावपळ असते वाळूमध्ये खोल घर बनवण्यासाठी. हे घर बनवताना तोंडातून वाळूचा एक गोळा वर आणून किनाऱ्यावर ते मनमोहक रांगोळी साकारल्याचा भास हे लहानसे खेकडे आपणास देतात. छोटे छोटे लाडू वळावेत त्याप्रमाणेच हे खेकडे वाळूचे लाडू किनाऱ्यावर रांगोळीचे दर्शन घडवतात व इकडून तिकडे सैरावैरा पळापळही करत असतात.




पावसाळ्यात भूक लागली की, गरमागरम भजीवर ताव मारण्याची संधी कोणी सोडत नाही. किंवा गरमागरम बाजरीची भाकरीही गोड लागते. एवढेच नव्हे तर भाजलेले मक्याचे कणीस त्यावर मीठ, मिरची लावून वरून लिंबाचे दोन तीन थेंब टाकून खाण्याची मजाही वेगळीच, बरं का..! 


पावसाळ्यात तर गावाला घराच्या आजूबाजूला पसरलेली हिरवळ नकळतच मनाला गारवा देऊन जाते. मखमली हिरवी शाल पांघरल्याप्रमाणे दिसणारी हिरवळ घराला घरपण देऊन जाते आणि पहिल्या पावसाचे अस्तित्व मनात सहज साठवून जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या