Ticker

10/recent/ticker-posts

सकारात्मक विचारसरणी गरजेची

जगताना ताणतणाव असणारच, पण त्याला आपले शरीर पोखरू देऊ नये...


-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)


अलीकडे लोक तणावाचे शिकार होत आहेत. व्यस्त जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे. तणावाची अनेक कारणे असू शकतात, कामाचा ताण, अभ्यासाचा ताण, आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, प्रेम किंवा मैत्रीत फसवणूक. आपण याबद्दल जितका जास्त विचार करू, तितका ताण वाढत जातो. कारण, जास्त विचार केल्याने ताण वाढतो. तणावामुळे आपल्या शरीरातील अनेक हार्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. 


वाढते ताणतणाव व त्याच्या दुष्परिणाम हा आपल्या वेगवान आणि अनंत अडचणींनी भरलेल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसेंदिवस हा ताणतणाव वाढतच आहे. बहुसंख्य माणसांना मग ते गरीब असो की श्रीमंत असोत, उच्च शिक्षित असोत की अशिक्षित, बंगल्यात राहणारे असोत की झोपडीत राहणारे असो त्यांना या ताणतणावांना कसे तोंड द्यावे हे कळत नाही. परिणामी, या तणावांच्या दुष्परिणामांना बहुतेक लोक बळी पडतात. या तणावांचा माणसावर मानसिक परिणाम तर घडतच असतात. पण, या मानसिक तणावातून रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, निद्रानाश यासारखे आजारही जडतात. माणसाला होणाऱ्या अनेक रोगांचे मूळ त्याच्या मनोविकारांत असते. म्हणजे बहुतसंख्य विकार हे मनोकायिक असतात हे सिद्ध झाले आहे. अशा या ताणतणावांनी निर्माण होणाऱ्या विविध विकारांना तर लोक बळी पडतातच. पण, या ताणतणावांमुळे अनेक लोकांचा मृत्यू ओढवतो हे धक्कादायक वास्तव आहे. 




उच्च पदस्थ जबाबदारीचे काम हाताळणारी मंडळी तणावाची जास्त प्रमाणात शिकार ठरत आहेत. धावता-धावता उर फुटायची वेळ आली तरी आपण थांबत नाही. आजार विकार आपल्या पाठीशी लागले आहेत. दररोज चार, पाच गोळ्या घेऊन आपली फरपट सुरू आहे हे माहिती असूनही आपण क्षणभर उसंत घेत नाही. गोळी विसरली घ्यायची राहिली तरी आपण स्वतःला खेचत राहतो. इतकी आपल्याला घाई घरातून निघायची. आपल्या पतीकडे, पतीला पत्नीकडे, मुलांकडे प्रेमाने पाहायलाही आपण दोन मिनिट थपकत नाही. रस्त्याने चालताना घाई, फलटावर जिना उतरायची घाई, गाडी पकडायची घाई, बस पकडायची घाई, मग आपली मुलं काही सांगत असतात, पत्नी प्रेमाने पाहत असते. नवरा पत्नीला काही सांगत असतो तो आपल्याकडे प्रेमाने पाहत असतो. याकडे बघायलाही आपल्याकडे वेळ नसतो. ऑफिसकडे व इतरत्र पोहोचण्याची घाईच घाई लागलेली असते. रस्त्यात एखादं छान फुललेले फुल पाहण्याची देखील आपल्याला सवड मिळत नाही नव्हे आपण ती काढत नाही हे सत्य नाकारून चालणार नाही.


सध्या प्रत्येकावर ताण आहे आणि कोणालाच थांबायचे नसल्यामुळे हा ताण अतिताणात रूपांतरित होत आहे. अनेक पुस्तक यशस्वी व्हायचे मंत्र, गुरुकिल्ली सांगतात, आत्मविश्वासाचे पंधराशे साठ उपाय सांगतात, व्यक्तिमत्व विकासाचे सोपान दाखवतात. पण, तणावमुक्त जीवन जगण्याची वाट एखादेच पुस्तक दाखवते. बाबा बुवांचे दुकाने चालतात ती या अतिताणग्रस्त व्यक्तींच्या धावपळीमुळेच. ताण आपल्यामुळेच निर्माण होतोय हे न कळणारी ही मंडळी इकडेतिकडे उपायांसाठी धावत असतात. बाबांची दुकाने चालतात. पण, स्वतःला वेळ दिला, कुटुंबाला वेळ दिला, आपल्या आवडीनिवडीसाठी वेळ काढला, गाणी ऐकली, पुस्तक वाचली, आवडता सिनेमा पाहिला, आपल्याच फोटोंचा अल्बम निरखून पाहिला, अगदी थोडेसे शांतपणे बसले मुलांना जवळ घेतले त्यांच्याजवळ गप्पा गोष्टी ऐकण्यासाठी वेळ दिला, बायकोने आपल्या नवऱ्याबरोबर शांतपणे बोलले, नवऱ्याने बायकोबरोबर संवाद साधला तर ताण नक्कीच सुसह्य होऊ शकतो. तणावमुक्त मुक्त जगण्याचे हे सोपे उपाय आहेत जे आपल्या अवतीभोवतीच उपलब्ध आहे आणि आपण इकडे-तिकडे धावत सुटलो आहोत.


योगासनांनी देखील आपल्याला तणावमुक्त जीवन जगता येते. जगताना ताणतणाव असणारच पण त्याला आपले शरीर पोखरू देऊ नये. अति पुढचा आणि अगदी पाठीमागचा विचार करून स्वतःला कुरतडण्याचा प्रकार थांबवला गेला पाहिजे. त्यासाठी वास्तववादी सकारात्मक विचारसरणी गरजेची आहे.





Photo:google
Photo : google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या