-दादासाहेब येंधे, मुंबई
निसर्गप्रेमी कवी ना. धों. महानोर यांच्या सशक्त देखण्या लेखणीमधून उतरलेले हे सदाबहार गीत. या गाण्याचे ध्रुवपद वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आपण आबादानी होऊन जातो. निसर्ग आणि मानवी भावभावनांची एकत्रित गुंफण करण्यात महानोरांचा हातखंडा आहे. ह्या भावना तरलपणे अविष्कृत करण्यात ते माहीर आहेत. ह्या गाण्यातील प्रेम, शृंगार त्यांनी घरंदाज ग्रामीण बोलीतून फुलवलेला आहे. महानोरांच्या प्रत्येक गीत-कवितेत नवे शब्द सापडतात. जुन्या शब्दांना नवे अर्थ सापडत जातात. या गीतात सुद्धा 'आबादानी', 'कमळन', 'एकांताचा कोन', असे नादमधुर शब्द आपल्याला मोहवून टाकतात.
पावसाने रान आबादानी झालंय, हिरवेगार झालंय ह्या अर्थासोबतच पावसामुळे रान (शेती) समृद्ध झाली आहे. हा अर्थसुद्धा ध्वनित होतो. संपन्नता आली की, उत्साहसुद्धा येतो. मग प्रेमभावनासुद्धा अनावर होते. प्रेमाला नवे कंगोरे येत जातात. मनातले सगळेच्या सगळे सांगायला शब्द अपुरे पडतात. पाऊस स्पर्शातून आणि नेत्रबोलींतून मग शब्दावीन संवाद होऊ लागतो. सर्जा चितपटातील हे गीत ना धों. महानोर यांचे असून संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर व स्वर लता मंगेशकर तसेच सुरेश वाडकर यांनी दिले आहेत. ते गाणं पुढीलप्रमाणे...
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
रूपखणी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी
झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
झाकू नको कमळनबाई, चांदणं गोंदणी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी
गाणे ऐका...👇
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.