कानठळ्या बसवणाऱ्या फटकांमुळे कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते...
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
दसरा संपला रे संपला की, घरोघरी दिवाळीच्या तयारीचे नियोजन सुरू होते. दिवाळी म्हणजे हिंदूंचा सर्वा ंचा आवडणारा सण. लहान थोर सर्वजण त्यात भाग घेतात. घरातील कामे साफसफाई, रंगरंगोटी झाली की, खरेदीचे वेध लागतात. घरातील सर्वजण आपापल्या मागण्या आई-वडिलांपुढे ठेवत असतात. त्यातल्यात्यात प्राधान्य फटाक्यांना दिले जाते. त्यात भाग घेणारे अबालवृद्ध यांचा आकर्षणाचा आणि कुतूहलाच्या विषयासोबत मनोरंजनही आहेच. दिवाळी आणि फटाके हे समीकरण चांगलेच रूढ झाले आहे. तरीसुद्धा फटाके फोडण्यास हिंदू धर्मशास्त्रात कुठेही आधार नाही. आनंदाच्या क्षणी फटाके वाजवणे ही परदेशातील प्रथा असून आता ती हिंदुस्थानची राष्ट्रीय समस्या बनली आहे. या ध्वनीप्रदूषणामुळे व वायू प्रदूषणामुळे समाजाला कसे वाचवायचे हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे.
फटाक्यांचे दुष्परिणाम दिल्लीत केलेल्या एका पाहणीत आढळून आले. फटाक्यांमुळे केवळ त्या शहरात ४४२ जण दुखापत ग्रस्त झाल्याचे आढळून आले होते. दिवाळीमध्ये अशा प्रकारच्या घटना अनेकदा वाचण्यात येतात. चार वर्षांपूर्वी फारुखाबादमधील एक घटना वाचण्यात आली. फटाकाच्या एका अवैध कारखान्यात झालेल्या स्फोटात सात जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. त्यात बालकामगारही होते. फटाक्यांमुळे आगी लागून अपघात तर होतातच; पण याच कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचे याहूनही आणखी दुष्परिणाम आहेत. कानठळ्या बसवणाऱ्या फटाकांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. कानठळ्या बसवणाऱ्या फटकांमुळे कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. फटाक्यांमुळे कान बधिर होतात. श्रवणयंत्रणातील पेशी एकदम मृत झाल्या की पुन्हा निर्माण होत नाहीत. फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणामुळे डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकारांसारखे विकार बळावतात. गर्भवती महिलांना फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाचा अपाय होतो. दरवर्षी फटाक्यांमुळे अपाय होणाऱ्या प्रकरणात ६०% प्रमाण १२ वर्षाखालील बालकांचे असते.
फटाक्यांमुळे केवळ पैशांचा अपव्यय होतो असे नाही, तर पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ आणि धूर या अनिष्टकारक गोष्टी विनाकारण निर्माण होतात. खरी दिवाळी फटाके विकणाऱ्यांची असते. कारण ५ रुपयाचा फटका विक्रेता २५ रुपयांना विकतो. तरीही पाच-दहा हजार रुपयांचे फटाके उडवणारे लोकही आपल्याकडे कमी नाहीत. पाश्चिमात्यांचे अनुकरण करणारे फटाक्यांच्या बाबतीत त्यांच्या स्तुत्य धोरणाचे अनुकरण का बरे करत नाहीत..? अमेरिकेसारख्या सुधारलेल्या विकसित देशात आवाज करणाऱ्या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तेथे केवळ शोभेची उदाहरणार्थ आवाज न करता केवळ प्रकाश देणारे फटाके उडवण्यास अनुमती आहे. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. न्युझीलंड, इटली, फ्रान्स, बेल्जियम या देशात केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास अनुमती आहे. या धर्तीवर भारतातही असे दंडविधान होणे आवश्यक आहे.
आपल्या पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी बालकामगार रात्रंदिवस फटाकांच्या कारखान्यात काम करतात व तेच फटाके आपल्यापर्यंत येतात.एवढेच नव्हे तर परदेशातही जातात आणि अतिश्रमाने हीच मुले पुढे आजारामुळे दवाखान्यात आपल्या पदरी पडलेल्या आजारांचा सामना करत असतात. त्यांच्यासाठी कारखान्याचे मालक कोणत्याही प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. अशा बालमजुरांनी त्यांच्या हाताने बनवलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद आपण घरात बसून घेत असतो. फटाक्यांच्या या स्पर्धेमुळे कोणाला त्रास होतो आहे? रस्ताभर जळालेल्या कागदांचे तुकडे इतरत्र पडलेले असतात. विषयुक्त वायूमुळे वायू प्रदूषण होते. मोठ्या फटाक्यांच्या आवाजाने वृद्ध, आजारी माणसे, लहान लहान मुले यांना बहिरेपणा येण्याची शक्यता असते याचा कोणीही विचार करीत नाही ही सुद्धा चिंतेची गोष्ट आहे. आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, शुद्ध हवा या आहेत. निसर्ग आहे तोपर्यंत आपण आहोत. वरील मूलभूत गरजा निसर्गच पूर्ण करत असतो. तेव्हा निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कोणतीही कृती करू नये.
म्हणून दिवाळीत फटाके फोडणे टाळा. दरवर्षी येणाऱ्या दिवाळीचे पावित्र्य राखा. भजने, आरती, चांगली गाणी, भावगीते ऐका. त्यामुळे मन प्रसन्न होईल. मात्र, फटाक्यांचा ध्वनी आणि धूर यांच्यामुळे त्या वातावरणाकडे असुरी शक्ती आकर्षिल्या जातात त्यांच्यातील तम गुणांच्या परिणामामुळे मानवाची वृत्ती तामसिक बनते. फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. रॉकेटसारख्या उंच उडून खाली पडणाऱ्या फटाक्यांमुळे पेटलेले बाण गवताच्या गंजीवर पडून आग लागणे, झोपड्या जळणे असे प्रकार घडू शकतात. देश दिवाळखोरीत असताना प्रतिवर्ष कोट्यावधी रुपये फटाक्यांमध्ये जळून खाक होतात. फटाके बंद उडविण्यास बंदी आणावी. पण, तसे होत नाही. फटाक्यांच्या माध्यमातून होणाऱ्या पैशांचा चुराडा थांबला पाहिजे. म्हणून लोकहो! स्वतः फटाके न वाजवता दुसऱ्यांनाही त्या कृती करण्यापासून परावृत्त करा!
Photo:google
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.