Ticker

10/recent/ticker-posts

मुलांना खेळायला पाठवाच

नियमितपणे खेळायला जाणाऱ्या मुलांचा मेंदू उत्तमरित्या काम करत असतो असे एका संशोधनात दिसून आले आहे... 

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)


"का रे खेळतो का, असं म्हणत मुलांवर डाफरणारे आणि आपल्या मुलाला, मुलीला सचिन तेंडुलकर, सायना बनवण्याच्या ध्यासाने झपाटलेले असे परस्परविरोधी स्वभावाचे पालक आपल्या समाजात आढळतात. खेळामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहते. त्यांच्या आयुष्याला वळण लागू शकेल अशा अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळतात. मात्र, या गोष्टी आपणच विसरत चाललो आहोत. पालक मंडळी आपल्या मुलांना जीवनातील अनेक धडे सहजपणे शिकवू शकतात. मुलांमध्ये खेळाडू वृत्ती तयार करणे, पराभव पचवण्याची तयारी ठेवणे, सहकाऱ्यांच्या मताचा भावनांचा आदर करणे, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणे असे जीवनात उपयुक्त ठरू शकणारे अनेक धडे आपण मुलांना खेळांमधून शिकवू शकतो.


"गधड्या, बास झालं खेळणं, आता अभ्यासाला बस" अशा शब्दात आपल्या मुलांना रागवणारे पालक घरोघरी दिसून येतात. मुलगा किंवा मुलगी खेळायला गेले म्हणजे वाया गेले अशी अनेक पालकांची समजूत असते अशी समजूत तयार होण्यामागे पालकांचे अज्ञान असते. खेळामुळे मुलाला किती फायदे होऊ शकतात याची कल्पना पालकांना नसते. नियमितपणे खेळायला जाणाऱ्या मुलांचा मेंदू उत्तमरित्या काम करत असतो असे एका संशोधनात दिसून आले आहे. खेळल्यामुळे त्या मुलाच्या मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात लक्षणीय वाढ होते, असे अभ्यासकांचे मत आहे. मुळात शरीराच्या तंदुरुस्तीसाठी नियमित खेळणे आवश्यक असते, हेच पालक मंडळी लक्षात घेत नाहीत.


पूर्वीचा म्हणजेच ५० ते १०० वर्षांपूर्वी सकाळ लक्षात घेतला तर मानवी जीवनात सर्वात जास्त फिटनेसला महत्व होते. प्रत्येक गल्लीत व्यायामशाळा होत्या. या व्यायामशाळेत आपल्या पाल्याला मुलाला पाठवून त्यांना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त कशा प्रकारे करता येईल याकडे पालकांचा ओढा होता. व्यायामासोबतच मुलांचा आहार हेदेखील त्यांच्या तंदुरुस्तीचेच एक महत्त्वाचे कारण होते. मुबलक प्रमाणात फळे, दूध, अंडी मांसाहार, पालेभाज्यांचे समप्रमाणात सेवन केल्याने मुले आजारी पडण्याचे प्रमाण फार कमी होते. त्यानंतर हळूहळू काळ बदलला. झपाट्याने शहरांचा विकास होत गेला. मोकळ्या जागांमध्ये उंच उंच इमारती बांधल्या गेल्या. व्यायामशाळांच्या ऐवजी फिटनेस सेंटर उभे राहिलेत. त्यामुळे मुले व्यवस्थित व्यायाम करत आहेत किंवा नाही याकडे जवळपास दुर्लक्षच होत गेले.


मोकळ्या घरांची जागा फ्लॅट्स घेतली. त्यामुळे मुलांना खेळायला जागाच उरल्या नाहीत. त्यातूनच विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय झाल्याने मुलांना शारीरिक तंदुरुस्तीचे शिक्षण देणारे आजी-आजोबा मुलांपासून दूर गेले. मग काय आई-वडिलांनीच मुलांना वाढदिवसाचे भेट म्हणून व्हिडिओ गेम, कॉम्प्युटर आणून दिले आणि मुलांची व्यायाम करण्याची उरली सोडली अशा देखील संपली. घरातील आई-वडील हे नोकरीवर जाणारे असल्याने मुलांच्या खाण्यापिण्याकडे देखील दुर्लक्ष झाले. भाजी चपातीच्या ऐवजी मुलांच्या हातात कॅडबरी, बर्गर, पिझ्झा देण्यात आले. एकंदरीतच काही वर्षात सर्वच बदलत गेले. शाळेत मुलांसाठी व्यायामाचा तास असतो. पण, या आठवड्यात एक तास मुले किती असा व्यायाम करणार? मुळात लहान मुलांचे वय हे वाढते असते. त्यांना दररोज उठल्यानंतर सूर्यनमस्कार करायला सांगणे, सकाळी बाहेर मोकळ्या व स्वच्छ हवेत फिरायला नेणे हे पालकांचे कर्तव्य. मात्र नोकरीच्या धावपळीत पालकांना ते शक्यच होत नाही. त्यातूनच विद्यार्थ्यांवर लादलेला अभ्यासाच्या बोजा हेदेखील विद्यार्थ्यांचा फिटनेस नसण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. फार कमी पालक असे असतात की ज्यांना आपल्या मुलांना उत्कृष्ट खेळाडू बनवायचे आहे. अलीकडे खेळाकडेदेखील पैसा कमावण्याचे एक साधन म्हणून बघितले जाते. हा मुद्दा खूप वेगळा आहे. मात्र, आजकाल फुटबॉल, कबड्डी, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस असे खेळ मुलांनी खेळलेच पाहिजेत. जेणेकरून, त्यांची हालचाल होईल. शरीराचा व्यायाम होईल.


हल्ली जरासे हवामान बदलले की, मुले आजारी पडतात त्याला कारण काय याचा विचार पालकांनी केला आहे का..? तर उत्तर नाहीच मिळेल. मुलांना लावलेल्या चुकीच्या सवयी या मुलांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. 'लवकर निजे लवकर उठे, हे थोरा मोठ्यांनी सांगून ठेवलेले वाक्य आजकाल किती जणांच्या लक्षात आहे हा प्रश्नच राहतो. रात्री टीव्ही पाहत बसल्याने झोपायला उशीर होतो, त्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो आणि सर्व दिनचर्या बिघडून जाते. मुलांचा फिटनेस बिघडण्याची ही सर्व कारणे आहेत आधुनिक काळातली.


पालकांनी मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना धावणे स्विमिंग, सायकलिंग, सूर्यनमस्कार घालायला लावले तर त्यांचे आरोग्य हे सुदृढच राहील. त्यासोबतच मुलांना सर्व भाज्या फळे खाण्याची सक्ती केल्यास त्यांना योग्य ती विटामिन्स मिळतील त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती सुधारण्यास देखील मदत होईल.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.