कोणाचाही विश्वास बसू नये एवढ्या वेगाने कोरोना संसर्ग २०१९ साली होत होता. श्वसन यंत्रणा, फुफ्फुसं निकामी करत आणि माणूस कुणाला न सांगता, बोलता अचानक जगाचा निरोप घेत होता. ना शेवटचे बोलणं, ना जिवलगांना अखेरचं डोळं भरून पाहणे, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कितीतरी माय बहिणींचे कुंकू काळाने पुसले. कितीतरी मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हिरावले गेले.
-दादासाहेब येंधे
आजपर्यंत देशात शेतकऱ्यांच्या विधवा, सैनिकांच्या विधवा तसेच एड्समुळे विधवा झालेल्या महिलांचे अनुभव त्यांचे मानवी हक्क यावर काम होत आहे. विधवा स्त्रियांच्या संदर्भात राज्यनिहाय वापरल्या जाणाऱ्या संदर्भानुसार जर मांडणी केली तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विधवा, उत्तर प्रदेश वृंदावन मधील विधवा, पश्चिम बंगाल वाघ विधवा, काश्मीरमधील हाफ विडो आणि आता यात कोविडमुळे नवरा मरण पावला म्हणून कोविड विधवा या वर्गाची देखील भर पडली आहे.

पत्रकारिता करीत असताना मुंबईतील आझाद मैदान येथे जाणे झाले. तेथे काही कोविड विधवा महिला आंदोलन करण्यासाठी आल्या होत्या. त्यात त्यांनी जोडीदार गमावल्यानंतर अनुभवलेल्या वेदना व्यक्त केल्या. मी प्रातिनिधिक स्वरूपात ज्या कोविड विधवा महिलांना भेटलो त्यामध्ये २५ ते ४५ वयोगटातील जास्त तर ४५ वयोगटाच्या पुढच्या कमी स्त्रिया होत्या. या सगळ्या स्त्रियांचे शिक्षण जेमतेम झालेले होते. केवळ दोघीजणीच बारावीपर्यंत शिकलेल्या होत्या. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी घरचे काम, शेतमजुरी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या या महिला होत्या. तिथे अनेक कोरोना विधवा महिला म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या डोळ्यातील चमक लोप पावली होती. गळ्यातील दाटलेला कंठ आणि डोळ्यातील आसवं यासह तरुण विधवा सरकारी योजनांविषयी अनेक शंका-प्रश्न मला विचारत होत्या. शक्य तितके निरसन मी करत होतो. भकास चेहऱ्याने ओसाड आयुष्य कसे काढावे? हा प्रश्न इथे प्रत्येकीला होता. काहींच्या पदरी लहान लेकरं होती. त्यांच्या भविष्याचा प्रश्न अधिकच काळजीत टाकणारा होता. या महिलांमधील एका कोविड विधवा महिलेसोबत बोलताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहत होता. ती म्हणत होती, ' तो आला, फुफ्फुसं निकामी केली, अन माझ्या धण्यानं कुणाला न सांगता, न बोलता या जगाचा निरोप घेतला. ना शेवटचं बोलणं, ना त्यांना डोळं भरून मला पाहता आलं.., हॉस्पिटल मधूनच नेलं त्यांना.''हसत खेळतं, घर उजाडलं माझं दादा!.' 'आता विधवा म्हणून जगणं लय अवघड हाय',लोकांच्या नजरा अन नातेवाईक लय खराब हायेत.' कुणी बी येत न्हाई मदतीला.'
कोणाचाही विश्वास बसू नये एवढ्या वेगाने कोरोना संसर्ग २०१९ साली होत होता. श्वसन यंत्रणा, फुफ्फुसं निकामी करत आणि माणूस कुणाला न सांगता, बोलता अचानक जगाचा निरोप घेत होता. ना शेवटचे बोलणं, ना जिवलगांना अखेरचं डोळं भरून पाहणे, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कितीतरी माय बहिणींचे कुंकू काळाने पुसले. कितीतरी मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हिरावले गेले. आपले मायबाप गेले. सासू-सासरे गेले आणि हसती खेळती, रुसणारी, रडणारी घरं अचानक मुकी झाली. घराचं अंगण शांत झाले. रोज दिवस उगवायचा तो कितीतरी लोकांच्या जाण्यानं, बातमी घेऊनच सकाळी फोनवरून कळायचे. आज अमुक-अमुक जण रुग्णालयात दाखल झाले आणि कोण हे जग सोडून गेले. उपचाराअभावी लोक मरत होते. प्रत्येकाचं दुःख वेगळं होतं. कुणाची काय तर जुनाची काय कहाणी! दुखरे दुःख पण प्रत्येकाचा रंग वेगळा. हरवलेला माणूस वेगळा, नाते वेगळे. कोविड आपल्यापासून लांब आहे असं म्हणता म्हणता म्हणता तो कधी आपल्या घरात शिरला हे कुणालाही कळलंच नाही.
कोविडमुळे देशात तीस हजारापेक्षा अधिक बालके अनाथ झाल्याचे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने म्हटले आहे. एचआयव्ही, एड्स, इबोला व्हायरस सारख्या महामारीचा अंदाज घेतला तर महामारीने स्त्रिया-मुली, लहान मुलांना अक्षरशः संकटाच्या खाईत लोटले.
जोडीदार गमावणाऱ्या स्त्रियांकडे कुटुंब-समाज पूर्वग्रह दूषित नजरेने बघतो. २०१४ मध्ये आफ्रिका खंडातील देशात इबोला व्हायरसने धुडगूस घातला होता. यात अनेक स्त्रिया विधवा झाल्या. या स्त्रियांना 'इबोला विधवा' असे तिथे म्हटले गेले. आता 'कोविड विधवा' हा शब्द प्रयोग केला जात आहे.
कोविड मुळे विधवा झालेल्या महिलांकरिता रोजगार, अन्नसुरक्षा योजनेचा लाभ, मुलांचे संगोपन करण्यासाठी सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे. तसेच स्त्रियांच्या माहेर आणि सासरचा जो काही संपत्तीचा अधिकार आहे तोही त्यांना निर्विवादपणे मिळणे अनिवार्य आहे. कोविड विधवा म्हणून स्त्रियांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी संपूर्ण देशात केंद्र आणि राज्य सरकारने ठोस निर्णय आणि कृती कार्यक्रम आखणे गरजेचे बनले आहे. तसेच या स्त्रियांसाठी रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणे गरजेचे आहे.
.jpg)
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.