साथीचे आजार त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात. डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात किंवा आजरी झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेदेखील आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या वृद्ध आणि बालकांना त्याचा फैलाव जलदगतीने होतो.
-दादासाहेब येंधे
पहिल्याच पावसात भिजणे हा अवर्णनीय आनंद कोणीच रोखू शकत नाही. कडक उन्हाळ्याने अंगाची लाही-लाही होत असतानाच कधी एकदाचा पाऊस येतो आणि कधी मनसोक्त भिजायला मिळते याची आपण चातक पक्षाप्रमाणेच नेहमीच वाट बघत असतो. याचे कारण गेले दोन-तीन महिने कडक उन्हाळ्याचा त्रास सहन करीत आपण हैराण झालेलो असतानाच पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाने मन हलके होते. परंतु याच पावसात अति भिजणेदेखील धोकादायक असू शकते. पावसाळा सुरू झाला की, असंख्य आजार वाढतात. उकड्याच्या काहिलीने बेजार झाल्याने लागलीच थंडावा निर्माण झाला की, वातावरणात बदल होऊन आजारांना निमंत्रणच मिळते. तसेच पावसात सर्रास दूषित पाण्याने आजारांना निमंत्रण मिळते.
![]() |
पावसाचा फटका सर्वसामान्यांबरोबरच समाजातील सर्वच घटकांना होत असतो. कोणी पावसात भिजल्याने आजारी पडतो, तर कुणीतरी नाल्यामधील दूषित रस्त्यावर येऊन त्या पाण्यातून चालत आल्यामुळे आजारी पडतो. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डा कुठे आणि पाणी कुठे हेच कधी कधी कळत नाही. गुडघाभर पाणी आहे म्हणून जर कोणी पाण्यातून चालण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मॅनहोल आहे हे गृहीत धरून चालावेच लागणार. या सर्वांचा विचार करून आपल्या जीवाला प्रत्येकाने थोडे तरी जपले पाहिजे. आपल्याला कोणताही आजार होऊ नये म्हणून प्रथमतः स्वतःची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.

चिकणगुनिया - चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप विषाणूमुळे पसरतो. एडिस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे पसरतो. ताप येणे तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड प्रमाणात दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो. सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला तरीही लक्षणे कमी होण्यास आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधीवाताची लक्षणे देखील दिसून येतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही दिसतात. वेळीच उपाय केल्यास यातून रुग्ण बरा होतो.
डांग्या खोकला - डांग्या खोकला हा एक संसर्गजन्य रोग आहे. विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणाऱ्या थेंबावाटे हा विषाणू पसरतो. रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणाऱ्या पातळ पदार्थचा स्पर्श झाल्यानेदेखील हा रोग पसरतो. संसर्ग नंतर सात ते दहा दिवसात रोग लक्षणे दिसू लागतात. पहिल्या अवस्थेत सर्दी, पडसे, थोडा ताप येतो. पाच-सहा दिवसांनी दुसरी अवस्था सुरू होते. खोकला येऊ लागतो. प्रथम खोकला कोरडा असतो. पुढे खोकल्याच्या उबळी सुरू होतात. श्वास घेताना हुप आवाज येतो. आवाज येतो म्हणून याला माकडखोकला असेही म्हणतात. शेवटी चिकट कफ पडतो. कधीकधी कफ परत घशात जाऊन तो गिळला जातो. कधी कधी उलटी होते. नाकातून एखाद्या वेळी रक्तस्राव होतो. हा रोग मुख्यत्वे पावसाळ्यात उद्भवतो. डांग्या खोकल्याची लस, औषधे वेळच्या वेळी घेतल्यास या आजारापासून रुग्ण वाचतो. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डेंगू ताप - या तापाला हाडमोडी तापही संबोधले जाते. हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंगू विषाणूमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो पसरतो. हा एक तीव्र फ्ल्यूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंगू ताप आणि डेंगू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप येतो. सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याच्या पुढचा भाग अतिशय दुखणे. डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांचा हालचालीसोबत अधिक होते, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरसारखे सारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या, त्वचेवर व्रण उठणे हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून या तापाबरोबर बाह्य रक्तस्त्राव चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव अंतर्गत रक्तस्राव, आतड्यांमधून रक्तस्त्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते बाकी लक्षणे तापाप्रमाणेच असतात. हा ताप असेपर्यंत आराम करावा. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मलेरिया - मलेरिया हा ताप ऍनाफिलिस नावाच्या संक्रमित मादी डासाच्या चावण्यामुळे मनुष्याच्या रक्त प्रवाहामध्ये हा व्हायरस जातो आणि केवळ तोच डास व्यक्तीला मलेरिया पीडित बनवू शकतो. ज्याने आधी एखाद्या मलेरिया संक्रमित व्यक्तीला चावले असेल. हा विषाणू लिव्हर पर्यंत जाऊन त्याच्या काम करण्याच्या क्षमतेला बिघडवतो. हा ताप झाल्यास रुग्णाला खूप ताप येतो. शरीर थरथरते. डोकेदुखी, मळमळणे आणि उलट्या होतात.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.