Ticker

10/recent/ticker-posts

सौभाग्याचा सण म्हणजे वटपौर्णिमा

पतीच्या प्रगतीसाठी फक्त पत्नीनेच सहकार्य करावे असे नाही तर पतीनेही पत्नीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मनाचा मोठेपणा दाखवणे आवश्यक आहे. फक्त वड पुजल्याने आयुष्य वाढत नाही तर एकमेकांशी वाद न घालणे,  भांडण न करणे, एकमेकांना समजून न घेणे, अमुक व अवास्तव मागण्या करणे हे सगळे टाळल्याने एकमेकांचं आरोग्य चांगलं राहून आपोआपच आयुष्य वाढेल. 

-दादासाहेब येंधे

दरवर्षी विवाहित महिला या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी ज्येष्ठ महिन्यात वटसावित्रीचा उपवास करतात. वटसावित्रीचे व्रत करणाऱ्या स्त्रियांचे वैवाहिक जीवन हे सुखद राहते. या दिवशी अमरत्वाचे प्रतीक असलेल्या वटवृक्षाची मनोभावे पूजा केली जाते.

वटपौर्णिमेमध्ये एक गूढ असा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया स्वतःच्या प्रदीर्घ सौभाग्यासाठी हे व्रत करतात. भारतात बऱ्याच ठिकाणी जसे महाराष्ट्र, गुजरात, बिहार, दिल्ली, उत्तरांचल, ओरिसा तसेच दक्षिणेकडील काही राज्यांत हे व्रत यथासांग पार पाडले जाते.

अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपति नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा धृमतसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. 

भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण, सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात जाऊन ती नवऱ्याबरोबर सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली.

सत्यवानाच्या मृत्यूच्या चार दिवस अगोदर सावित्रीने एक व्रत आरंभले. तो जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला असता तीही त्याच्यासोबत गेली. ती त्याच्यावर लक्ष ठेवून होती. रानात लाकडे तोडत असताना अचानक त्याचे डोकं दुखू लागले. तेव्हा सावध सावित्रीने त्याला एका वृक्षखाली झोपवले व त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. इतक्यात तिला एक दिव्य दिसते. ते सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी त्याच्यावर फास टाकत होते. धीर खचून न देता स्वतःला आणखी खंबीर बनवत सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेने जाणाऱ्या यम राजाच्या मागोमाग तीही चालू लागली. तेव्हा यम राजाने तिला मागे फिरून पतीचे अंत्यसंस्कार उरकावे असे सांगितले. जिथे पती तिथे पत्नी या सनातन धर्मतत्त्वाचा आधार घेत तिने सांगितले की, तिचे पती त्यांच्याबरोबर आहेत म्हणून ती त्यांच्या मागोमाग येत आहे. चालताना ती यम राजाची विनम्र वाणीने चतुर्यपूर्ण संवाद साधू लागली. धर्मशास्त्रातील तत्त्वानुसार दोघांमध्ये शास्त्रशुद्ध चर्चा होत होती. वेळोवेळी यम राजाला सज्जन, धर्मराज, मित्र असे संबोधन करत त्याचा ती विश्वास मिळवत होती. तिची मधुर वाणी व विद्वत्तापूर्ण बोलणे ऐकून यमराज खूष झाले व तिला चार वर दिले. पहिल्या वरानुसार सासऱ्यांना दृष्टी, दुसऱ्या वरानुसार सासऱ्यांना राज्य आणि तिसऱ्या वरानुसार तिच्या वडिलांना शंभर पुत्र व चौथ्या वराच्या पूर्ततेसाठी यम राजाला सत्यवाणाला जिवंत करणे क्रमप्राप्त ठरले. सावित्रीच्या बोलण्यातले धर्मयुक्त तत्त्वज्ञान आणि यम राजाची तिच्यावर भक्ती जडली. हे त्याने कबूल करीत तिला आशीर्वाद दिले की, तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल. तिला पुत्र होतील. ते सर्व सुखाने संसार करतील. परिणामी, पुत्र प्राप्तीसाठी यमाला सत्यवानाला पुन्हा जिवंत करणे क्रमप्राप्त  ठरले. अशी पौराणिक कथा आहे.

ही घटना वडाच्या झाडाखाली घडली म्हणून वडाला महत्त्व. गीतेच्या पंधराव्या अध्यायातही वडाला संसाराची उपमा दिली आहे. तसेच 'वड' हा दीर्घायुष्य वृक्ष आहे. वडाची पूजा करणे, सूत गुंडाळणे त्याला फळ अर्पण करणे त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालणे म्हणजेच परमात्मा सर्व चराचरांचं भरण पोषण करीत असतो याची जाणीव ठेवणे होय. तसेच वटवृक्षाची विशालता लक्षात घेता आपलं मन व आपली कुणाकडेही बघण्याची दृष्टी विशाल असायला हवी हेच सुचित होत असतं.

सावित्रीच्या कथेचा आढावा घेताना हे लक्षात घ्यायला हवे की, पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणे एवढंच महत्त्वाचं नाही तर तिच्या चरित्रातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तिने वर मागताना सासर आणि माहेर या दोन्ही कडचा उद्धार कसा होईल याचा विचार केला. राजकन्या असूनही सासरच्या सर्वसामान्य परिस्थितीचा तिने आनंदाने स्वीकार केला.

या व्रतामागची संकल्पना खूपच बोधप्रद आहे. आजच्या काळातल्या तरुण पिढीने याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. माझी आजी, आई, सासू, घरातल्या इतर ज्येष्ठ स्त्रिया हे व्रत करतात म्हणून मी करते असे न म्हणता नवीन काळानुसार व्रत पार पाडायला हवे. पूजेच्या जोडीला घरातील आजारी सासू-सासरे, आई-वडिलांच्यासोबत जमेल तेवढा वेळ घालवण्यात त्यांची सेवा करणे. पतीच्या प्रगतीसाठी फक्त पत्नीनेच सहकार्य करावे असे नाही तर पतीनेही पत्नीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मनाचा मोठेपणा दाखवणे आवश्यक आहे. फक्त वड पुजल्याने आयुष्य वाढत नाही तर एकमेकांशी वाद न घालणे,  भांडण न करणे, एकमेकांना समजून न घेणे, अमुक व अवास्तव मागण्या करणे हे सगळे टाळल्याने एकमेकांचं आरोग्य चांगलं राहून आपोआपच आयुष्य वाढेल. सावित्रीचे वेगळेपण कशात आहे तर तिची जबरदस्त इच्छाशक्ती. माणसाचं मन आशावादी असतं. हाच आशावाद नवऱ्यावरील अनन्यसाधारण प्रेम, विश्वास यामुळेच ती यमराजाला निरुत्तर करू शकली. म्हणूनच या सणाला सौभाग्याचा सण असे म्हटले जाते.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. खूप सुंदर लेख आणि त्यातून चांगलं समाज प्रबोधन होईल अशी उपयुक्त माहिती.

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.