Ticker

10/recent/ticker-posts

पावसाळ्यात हे पदार्थ खाऊ नका...

पावसाळ्यामध्ये अनेक बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होतात तसेच त्यांची वाढही वेगाने होते. अशातच या वातावरणामध्ये स्ट्रीट फूड म्हणजेच रस्त्याच्या बाजूला असणारे पदार्थ खाणे टाळावे.  मग ते चाट असो किंवा पाणीपुरी नाहीतर ज्यूस. 

-दादासाहेब येंधे

पावसाळ्यात सर्वत्र दमट हवा असल्यामुळे आपली पचनशक्ती मंद होते. त्यामुळे आपण जड पदार्थ खाणे टाळावे हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाही आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. त्यासोबत सर्दी, पडसे, खोकला असे साथीचे आजार पसरण्याची भीती पावसाळ्यात वाढू लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत काही बंधने पाळणे गरजेचे आहे.

पावसाळा हा ऋतू आल्हाददायक वातावरणाचा आणि सगळीकडे पसरलेली हिरवळ हळुवार पावसाच्या सरी पडू लागल्या की, आपसूक चटकदार पदार्थ खाण्याची ओढ लागते. पाणीपुरी, भेळ, पॅटीस, गरमागरम भजी, पकोडे, मॅगी आणि असेच एकापेक्षा एक टेस्टी पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा होऊ लागते. त्यातही आणखी भर म्हणजे सगळे पदार्थ घरी केलेले नको असतात. असे चटकदार पदार्थ खायचे तेही बाहेर जाऊन. परिणामी, आपल्याला साथीचे आजार घेरतात. त्यामुळे स्वतःला आवर घाला आणि असे पदार्थ खाणे टाळा.

- पावसाळ्यात मांसाहारी आहार घेणे पूर्णपणे बंद करावे. तिखट, स्पायसी पदार्थ खाऊ नयेत.

- उन्हाळ्यात आपण कोशिंबीरच्या माध्यमातून भरपूर सलाड खातो. परंतु पावसाळ्यात मात्र कोणत्याही भाज्या कच्च्या खाणे पूर्णपणे टाळावे कारण पचनशक्ती मंद झाल्याने त्यांचे नीट पचन होत नाही.

- पावसाळा सुरू झाल्यावर आंबा देखील पचत नाही. त्यामुळे पाऊस पडताच आंबा खाण्याचा मोह प्रत्येकाने टाळला पाहिजे.

- पावसाळ्यात पालेभाज्या खाणे पूर्णपणे बंद करावी. याचे कारण म्हणजे या भाज्या जेव्हा शेतात असतात तेव्हा त्यांची लांबी लहान असल्याने मातीतील तसेच पावसाच्या पाण्यातील जीवजंतू भाज्यांमध्ये जातात आणि त्या माध्यमातून आपल्या घरात येतात. भाज्यांच्या पानांच्या खालच्या बाजूला असे बरेचसे कीटक चिटकलेले असतात.

- बेसन पिठापासून मैद्यापासून बनवलेले पदार्थ पावसाळ्यात पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे.


- बटाटा, वांगे, पावटा, उडदाचे पदार्थ, तळलेले पदार्थ या दिवसांमध्ये खाऊ नयेत.

- खारवलेले पदार्थ लोणचे, पापड हे देखील पावसाळ्यात खाल्ल्याने बऱ्याच जणांना त्रास होऊ शकतो.

- पावसाळ्यात थंड वातावरण असल्याने थंड पदार्थ देखील खाऊ नयेत.

- पावसाळ्यात मोड आलेली कडधान्य कच्ची न खाता शिजवून खाण्याला प्राधान्य द्यावे.

- उघड्यावरचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळलेलेच बरे.

पालेभाज्या, कोबीपासून दूर राहा- पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीटक आणि डासांच्या प्रजननाचा काळ असतो हे किडे फळांवर आणि भाज्यांवर खास करून हिरव्या पालेभाज्या जसे कोबीची भाजी, पालक इत्यादींवर आसरा घेतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. कारण बरेचसे कीटक या पालेभाज्यांच्या पानांखाली चिटकलेले असतात.


रस्त्यावरील, उघड्या पदार्थांपासून लांब राहा- पावसाळ्यामध्ये अनेक बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होतात तसेच त्यांची वाढही वेगाने होते. अशातच या वातावरणामध्ये स्ट्रीट फूड म्हणजेच रस्त्याच्या बाजूला असणारे पदार्थ खाणे टाळावे.  मग ते चाट असो किंवा पाणीपुरी नाहीतर ज्यूस. 

स्ट्रीट फूड रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे पावसाचे पाणी त्या पदार्थांमध्ये जाण्याची शक्यता असते तसेच इतर किटकही त्या पदार्थांवर बसू शकतात. परिणामी, अनेक हानिकारक बॅक्टेरियांचा या पदार्थांमध्ये समावेश होतो. तसेच हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी स्वच्छ असेलच असे नाही. त्यामुळे तुम्हाला फूड पॉयझनिंग, डायरीया यासारखा आजाराचा धोका होऊ शकतो.


तळलेले पदार्थ नकोच- पावसाळ्यामध्ये शक्य असेल तेवढ्या तळलेल्या पदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील वातावरणाचा आपल्या शरीराच्या पचनक्रियेवरही परिणाम होत असतो. त्यामुळे खूप तळलेले पदार्थ आपण पचवू शकत नाही. परिणामी, पोटाचे आरोग्य बिघडतं.

सी फूड खाणं टाळावे- बऱ्याच जणांना याबाबत माहिती नसते की, मान्सूनचा काळ हा मासे आणि प्रॉन्सच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे या वातावरणामध्ये मासे, प्रॉन्स यासारखे मासे अजिबात खाऊ नयेत. तसेच पावसाळ्यामध्ये हेवी नॉनव्हेज पदार्थांपासून दूर राहणं उत्तम ठरेल. परंतु जर तुम्हाला नॉनव्हेज खाणे आवडत असेल तर सी फूड पासून दूर राहा आणि चिकन मटन यांचं सेवन करा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.