Ticker

10/recent/ticker-posts

सणांचा राजा म्हणजे दिवाळी

नातेवाईकांना शुभेच्छा देत फराळ व मिठाई वाटून जल्लोषात पाच दिवस साजरा होणारा हा सण. म्हणूनच दिवाळी या सणाला सणांचा राजा असे म्हटले जाते.

-दादासाहेब येंधे


पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतुच्या मध्यंतरात अश्विन व कार्तिक महिन्यांच्या संधिकालात येणारा सण म्हणजे दिवाळी. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा जवळजवळ आठवडाभर चालणाऱ्या आणि हजारो वर्षे जुना इतिहास असणाऱ्या दिवाळी या सणास सणांचा राजा असं म्हटलं जातं. इतर कोणत्याही सणाला कुटुंब एकत्र एका ठिकाणी नसलं तरी चालेल, परंतु दिवाळीतील आनंदोत्सवाला मात्र सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. शेतकरी, दुकानदार, कारखानदार, कंपन्या इतकेच नव्हे तर सरकारसुद्धा आपापल्या अखत्यारीतील सगळ्या कर्मचाऱ्यांना, नोकरचाकरांना दिवाळी आनंद साजरी करता यावी यासाठी खास तरतूद करतात. दीपावलीच्या या प्रकाशपर्वातील प्रत्येक दिवसाचे वेगळेपण आहे.  


अश्विन व ते द्वादशी म्हणजे गोवत्स द्वादशीला वसुबारस देखील म्हणतात. वसु म्हणजे द्रव्य त्यासाठीची ही बारस. कृषीप्रधान भारतीय संस्कृतीत गाईची पाडसासह पूजा करण्यामागे घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे हाच हेतू आहे. दिवसभर उपवास करून तो बाजरीची भाकरी खाऊन सोडणाऱ्या महिला आपल्या मुळाबाळांचं उत्तम आरोग्य व सुख लाभो अशी प्रार्थना करतात. 


देवदानवांच्या समुद्रमंथनातून अमृतकुंभ घेऊन निघालेल्या वैद्यनाथ धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. 'आरोग्यम् धनसंपदा' या अर्थाने धन्वंतरीची म्हणजेच पर्यायाने धनाची पूजा चालते. नरक चतुर्दशीचा संबंध नरकासुरासी लावतात ब्रह्मदेवाकडून अवध्यत्वाचा वर प्राप्त करून निरंकुश बनलेल्या नरकासुराने बऱ्याच राजांचा पराभव करीत कित्येक महिलांना बंदीवासात टाकले होते या नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने स्त्रियांना बंदीवासातून मुक्त केले तो हाच दिवस आधुनिक संदर्भात आपल्या प्रत्येकातील नरकरुपी पापवासनांचा नायनाट करून अहंकाराचे उच्चाटन करण्याचा हा दिवस होय.


दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन व्यापारांचे नवीन वर्ष सुरू होण्याच्या या दिवशी वही खात्यासह सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम यांची प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी पूजा केली जाते. लक्ष्मीचा संबंध स्वच्छतेची जोडला असल्याने कोणी नवीन केरसुणी, झाडू विकत घेऊन तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून हळद-कुंकू वाहून या दिवशी घरात वापरण्यास घेतात. लक्ष्मीच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्य रुजवण्याचा हा दिवस मानला गेला आहे.


कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी उत्तरेत गोवर्धन पर्वताची पूजा करतात. विविध प्रकारची पक्वान्ने, खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णाच्या मूर्ती पुढे मांडणे व त्याचा नैवेद्य दाखवण्याला अन्नकुट म्हणतात. आपल्याकडे दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला औक्षण करून तिला हवी असलेली भेटवस्तू ती पदरात पाडून घेते. 


कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात भाऊबीजेला यमद्वितीय असेही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता. द्वितीयेचा चंद्र आकर्षक, वर्धमानता दाखवत असतो. आधी चंद्राला नंतर भावाला लागक्षण करण्याच्या या दिवशी औक्षणकर्त्या भगिनींची 'बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहो' हीच भावना असते. बंधुभाव जोपासणाऱ्या या दिवसाचे महत्त्व आधुनिक संदर्भात केवळ बहिण-भावापूरते न उरता व्यक्ती-व्यक्तीत संवादाचे, सौहार्दाचे वातावरण कसे निर्माण करता येईल या अर्थाने घेतले पाहिजे.  


दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. घराबाहेर पणत्या लावून, रंगबेरंगी रांगोळ्या काढून आकाश कंदील लावून अंध:काराला लांब सारून प्रकाश आणि चैतन्याला आमंत्रित करत, उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी... घरात फराळाचे पदार्थ बनवून एकत्र फराळ करणे, शेजारी व नातेवाईकांना शुभेच्छा देत फराळ व मिठाई वाटून जल्लोषात पाच दिवस साजरा होणारा हा सण. म्हणूनच दिवाळी या सणाला सणांचा राजा असे म्हटले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या