Ticker

10/recent/ticker-posts

फराळ दिवाळीचा...

दिवाळीच्या दिवसांत फराळाचे पदार्थ आपल्या मनावर आणि जिभेवर राज्य करतात, आणि त्यातही जर आजी आणि आईच्या हाताचा सुगंध मिसळला असेल तर सोने पे सुहागा... असेच म्हणावे लागेल. फराळाच्या चवीसोबत त्यांच्या मायेचा खमंगपणाही त्यात मिसळलेला असतो म्हणून दिवाळी संपली तरी ती चव जिभेवर रेंगाळतच राहते.

-दादासाहेब येंधे


वसुबारसेच्या दिवशी आई आणि आजी फराळ करायला सुरुवात करायची. पहिला मान असायचा करंजीचा. नैवेद्याच्या पाच करंज्या झाल्या की, करंजीचा पहिला घास गाईला देण्यात यायचा आणि मग मला. करंजीच्या उरलेल्या पिठाचे चिरोटे केले जायचे. मला चिरोटा म्हणजे अनेक साड्या एकावर एक नेसलेली एखादी ठमाकाकू असल्यासारखा वाटायचं. दुसऱ्या दिवशी मान असायचा तो बेसन आणि रव्याच्या लाडवाचा. आजी आणि आई मिळून लाडू बनवायचे. माझी आई दोन्ही हातात दोन लादून घेऊन ते वळायची. लाडूची एक मजा येथे सांगावीशी वाटते ती म्हणजे, रव्याचा लाडू जमला तर जमला नाही तर इतका कडक व्हायचा की, खलबत्त्यामध्ये फोडून खावा लागायचा. मग, मी तो माझ्या हक्काच्या मित्रांना, आमच्या चंद्री गाईच्या खोंडाला खायला घालायचो. माझ्या वाट्याचे अर्धे-अधिक लाडू त्यांनीच खाल्ले असतील.


त्या दिवसात वासुदेव, कुडमुडे जोशी, खंडोबाचा वाघ्या, नंदीबैलवाला असे सगळे घरी यायचे. त्यांना त्या खुळखुळ्यासारख्या वाजणाऱ्या करंज्या देताना मजा येत होती. डोक्यावर हात ठेवून हे लोक तोंडभरून कौतुक करत आशीर्वाद द्यायचे. तेव्हा तर जगात भारी आपणच असल्यासारखे वाटायचे. त्यांच्याकडच्या आशीर्वादाचे मोल आजही करता येणार नाहीत. कपाळभर टेकवलेला चिमूटभर गुलाल आणि भंडाऱ्याची सर आज जगातल्या कुठल्याच मेकअपला येणार नाही असे वाटते.


आमच्याकडे फराळाचे सगळे पदार्थ एका ताटात भरून ते ताट हाताने विणलेल्या रुमाललेले झाकायचे आणि तो खजिना गल्लीतल्या शेजारी-पाजारी नेऊन द्यायचा. तसा तो खजिना आमच्याही घरी यायचा आणि एकाच पदार्थाच्या चवी किती निरनिराळ्या असू शकतात याचा त्यावेळी उलगडा व्हायचा.  त्या फराळात पुडाची वडी आणि कोथिंबीरीची वडी हा खास फराळाचा पदार्थ असायचा आणि प्रत्येक घराबरोबर या पुडाच्या वडीची चव बदलत असे. चिवडा या चमत्काराबद्दल तर काही बोलायलाच नको. भाजक्या पोह्यांचा चिवडा, तळलेला पोह्यांचा चिवडा, पाटण पोह्यांचा चिवडा, दगडी पोह्यांचा चिवडा, भवानी पोह्यांचा चिवडा असे वेगवेगळे चिवड्याचे बकाने मारून खेळायला पळताना त्यावेळी मजा येत होती.


खरी धमाल येथे आवर्जून सांगायची वाटते ती म्हणजे जेव्हा चकलीच्या एकेका तुकड्यासाठी आमची भांडणे सुरू व्हायची किंवा लाडूच्या डब्याने तळ गाठलेला असायचा. चिवड्याच्या तळाशी फोडणीचा खमंगपणा उतरायचा, तेव्हा खरा फराळ हवाहवासा वाटू लागायचा. करंजी तर केव्हाच संपलेल्या असायच्या आणि मग उगाच भोंडल्यातले करंजीच्या सपिठीचे गाणे आठवायचे. आता दरवर्षी दिवाळीचा फराळ करताना या साऱ्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. असे म्हटले जाते की, जसजसा पदार्थ मुरत जातो, शिळा होत जातो तसतशी त्याची चव किंवा खमंगपणा अजूनच वाढत जातो. आपल्या आठवणींचेदेखील तसेच आहे त्या आठवणी अजूनच खुमासदार बनत जातात. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या