घर चालवण्यासाठी तिने घेतलं हाती स्टेरिंग
-दादासाहेब येंधे
महिलांना ऑटो रिक्षा, स्कुटी किंवा बस चालवताना तुम्ही प्रत्येकाने पाहिले असेलच. या महिलांबद्दल तुमच्या मनात सन्मानाची भावना देखील आली असेल. पण, असे काही लोक आहेत जे या महिलांना त्यांच्या कामावरून त्यांची पारख करतात. कारण आजही हे काम केवळ पुरुषांचं समजलं जातं. पण, या विचाराला छेद देणाऱ्या कितीतरी महिला आपल्याला समाजात दिसून येतील. कधी काळी चूल आणि मूल एवढ्याच परिघात बंदिस्त झालेल्या महिला आता पुरुषांप्रमाणे सर्व क्षेत्रात धडाडीने काम करीत असल्याचे दिसत आहे. काही महिला स्वेच्छेने काही कामाची, नोकरीची जबाबदारी स्वीकारतात तर काहींना प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत संसाराचा गाडा पुढे चालवण्यासाठी आश्चर्यकारक वाटणारी कामे स्विकारावी लागतात. अशीच एक महिला आहे सारिका रणदिवे...

सारिका या मुंबईत टॅक्सी चालवतात. मानखुर्द येथे राहणाऱ्या सारिका टॅक्सी चालवून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सकाळी घरातली सगळी कामं उरकून त्या आठ वाजता टॅक्सी चालवायला निघतात. टॅक्सी चालवण्याचा निर्णय सारिका यांच्यासाठी सोपा नव्हता. सोबत त्यांच्या परिवारासाठीही सोपा नव्हता. पण, आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सारिकाने हा निर्णय घेतल्याचे त्या सांगतात.
सारिका यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना काही अनुभव आल्याचं त्या सांगतात. पण, त्याचबरोबर काही चांगली माणसंही भेटल्याचं त्या सांगायला विसरत नाहीत.

सारिका म्हणतात, "सुरुवातीस मी जेव्हा रस्त्यावरून टॅक्सी चालवायला लागले तेव्हा काहीजण आश्चर्याने माझ्याकडे बघायचे. एकदा तर मला एक टॅक्सीवाला पटकन म्हणाला, बाई.., अहो. कुठेतरी जागा ठेवा शिल्लक. की सगळीकडे महिला वर्गच येणार..?
एवढ्यावरच न थांबता सारिका या सांगतात की, 'गेटवे ऑफ इंडिया येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पॅसेंजर घेऊन येत होते, तेव्हा उतरताना ते मला म्हणाले प्लीज काहीही झाले तरी हे क्षेत्र सोडू नको तुझ्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळेल त्यादेखील या क्षेत्राकडे वळतील.
ज्या महिलांना या क्षेत्राकडे यायचे असेल त्यांनी जरूर यावे. कारण या व्यवसायात जरी स्पर्धा असली तरी चांगला नफासुद्धा आहे. हातात चार पैसे आल्यामुळे एक महिलादेखील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते हे मी ठामपणे सांगू शकते असे त्या सांगतात.'
जेव्हा टॅक्सीतील महिला प्रवासी, कॉलेजच्या मुली माझ्यासोबत सेल्फी काढतात यातून मला आपण काहीतरी चांगलं करीत आहोत याची जाणीव होते. असं सारिका रणदिवे सांगतात. एकवेळ अशी होती की, माझ्याकडे नाष्टा करण्यासाठी की चहा पिण्यासाठी पैसे नव्हते. पण, आज मी स्वतःच्या पायावर उभी असून मी माझी स्वतःची टॅक्सी चालवत आहे. याचा मला अभिमान वाटतो असे त्या सांगतात.

आज २१ व्या शतकात स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसून येतात. कष्ट करण्याची वृत्ती, सहनशीलता, प्रामाणिकपणा, सामंजस्य, झटून काम करण्याची वृत्ती हे गुण स्त्रियांमध्ये उपजतच आढळून येतात. कुटुंबाचा पाठींबा मिळाल्यास महिलांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यास कोणीही रोखू शकत नाहीत. यासोबतच त्यांना सरकारने विविध बँकांकडून कमी दरात कर्ज अथवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिली तर महिलांना व्यवसायाकडे वळण्यास मोठा हातभार लागेल व त्याही अर्थपूर्ण होतील.


0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.