दिवाळीचा उत्साह आणि उत्सवरंग ग्रामीण भागाने आजही जपून ठेवला आहे.
-दादासाहेब येंधे
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
काही म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या...
लक्ष्मण कुणाचा... आई बापाचा...
दे माई खोबऱ्याची वाटी...
वाघाच्या पाठीत घाली काठी..!
हे बालगीत आठवलं की आठवण येते ती दिवाळीची. दिवाळी हा एक आगळा आनंद देणार सण. ज्याची आतुरता महिनाभर अगोदर पासूनच प्रत्येकाला लागलेली असते. त्याकाळी दिवाळीत पाऊस नसायचा. पहिल्या आंघोळीला घरातले जेष्ठ मंडळी लवकर उठून आंघोळ करून कारेट फोडायची. मग, आम्हा मुलांना उठवायचे. त्याकाळी पहाटे खूप थंडी पडायची. ओल्या अंगाने कारेट फोडावं लागायचं.
पहिल्या दिवशी घर शेणाने सारवून सर्वत्र रांगोळी काढली जायची. एवढ्या थंडीत उठून आंघोळ करायची जीवावर यायचे. पाणी कडकडीत तापलेलं असायचे. सुकी लाकडं जळत असताना जसजशी आंघोळ असायची तशी घरातली माणसं मडक्यात पाणी आणून ओतायची. कारेट फोडून "गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा" असे बोलले जात होते. गावाकडची माणसं सकाळी हा उत्साह घेऊन शेतात गहू-भात कापणीसाठी निघायची. बांबूंच्या काट्यांचा आकाश कंदील बनवला जायचा. दहा-पंधरा दिवस कंदील बनवायला लागायचे. खळ्यात दांडीला अडकून त्यात निरंजन ठेवली की रात्री सुंदर असा आकाश कंदील दिसायचा.
ग्रामीण भाग म्हटले की, गावातील सगळे लोक शेतकरी कुटुंबातीलच असतात. प्रत्येकाच्या घरी जनावरांचा गोठा हमखास असतो. त्यातले सर्जा-राजाची जोडी खिल्लारी, गावरान गाय नक्कीच असतात. मग या वसुबारसच्या दिवशी गावातील प्रत्येक माय माऊली गोठा मातीने सारवून घ्यायच्या. मग संध्याकाळी या माऊली म्हणजेच गाय वासराची पूजा करून गोठ्यात दिवे लावले जायचे. त्यांच्यासाठी बाजरीच्या भाकरीचा गुळाचा मलिदा केला जायचा. गोठ्यात पणत्या लावल्यावर गोठा कसा उजळून निघत होता. हे सारे दृश्य पाहून वाटायचे नक्कीच लक्ष्मीचं आगमन होईल. आता आपण या साऱ्या आनंदाला मुकलो आहोत.
त्याकाळी आई पाच सहा दिवसात सगळा फराळ तयार करत असायची. आई स्वतः जेव्हा दिवाळीचा गोडधोड घरात स्वतःच्या हाताने बनवते ती मजा काही वेगळीच असते इकडून तिकडे जाता येता आईने करंज्यासाठी किसलेल्या खोबऱ्यामध्ये हात घालून ते खोबरं चोरून खाण्याची मजा वेगळी असायची. त्यातल्या त्यात आईने पाहिलं आणि पाठीत धपाटा घातला तरी त्यामध्ये आनंद वाटायचा आई स्वतः जेव्हा तिच्या हाताने गोडधोड बनवते तेव्हा त्या पदार्थांमध्ये साखरेपेक्षाही गोड माया तिचं प्रेम ओतत असते. कारण तिच्या मुलांना तिने बनवलेले गोडधोड पदार्थ खाऊ घालायचे असतात.

0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.