Ticker

10/recent/ticker-posts

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

हा उत्सव म्हणजे आदिशक्ती, आद्यजननी, जगन्माता शक्तीरूपाची उपासना! या शक्तीरूपाची उपासना देवीच्या उपासनेतूनच केली जाते. जेव्हा मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती तेव्हापासून या शक्ती रूपाची पूजा होत आलेली आहे. 

-दादासाहेब येंधे

"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके," 

"शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते"

हा श्लोक ऐकला की मन कसं प्रफुल्लित होऊन जातं. सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम दिसून येत आहे. आपल्याकडे आजही आणि जुन्या परंपरा, प्रथा, सणवार अतिशय भक्तीभावाने आणि निष्ठेने साजरे केले जातात. त्यातलाच एक म्हणजे नवरात्र. या उत्सवाचे महत्व अनन्यसाधारण. भारतातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जाणारा सण आहे.

संस्कृतमध्ये नवरात्र या शब्दाचा अर्थ नवरात्री असा आहे. या नवरात्रीत वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. सर्वत्र शारदीय नवरात्र म्हणून हा उत्सव प्रसिद्ध आहे. अनेक भाविक आपापल्या कुळाचाराप्रमाणे नवरात्र उत्सवात घटस्थापना करतात. नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा केली जाते. या सर्व देवी ऊर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातात. नवरात्रात प्रत्येक दिवसाला दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यात कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पूजन महत्त्वाचे मानले गेले आहे.

हा उत्सव म्हणजे आदिशक्ती, आद्यजननी, जगन्माता शक्तीरूपाची उपासना! या शक्तीरूपाची उपासना देवीच्या उपासनेतूनच केली जाते. जेव्हा मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती तेव्हापासून या शक्ती रूपाची पूजा होत आलेली आहे. 


मातृपूजा, देवीपूजा हा आपल्या उज्ज्वल आणि समृद्ध परंपरेचा एक वारसा आहे. स्त्रीशक्तीच्या गौरवाचे आणि त्यांच्या प्रती असलेल्या श्रध्येचे हे महत्त्वाचे प्रतीक आहे. मातृरुपात या शक्तीला ओळखले जाते. तिचे भक्तवत्सल आणि दुष्टसंहारक ही दोन्ही रूपे मोठी विलोभनीय आहेत. सृष्टीचे रक्षण आणि दुष्टाचे निर्धारण करण्यासाठी या जगन्मातेने अनेक रूपे घेऊन दुष्ट प्रवृत्तीपासून या भूमीचे रक्षण केले म्हणून तिच्या या दुर्गारुपाचा नेहमीच उदोकार होत आला आहे. म्हणूनच तिचा हा अनादी अनंत महिमा अगाध आहे. तिच्या या तारक रूपामुळेच प्राचीन काळापासून या आदिशक्तीचे महिमान आणि तिची आराधना चालू आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनीही या शक्तीची उपासना केल्याचा आधुनिक संदर्भ आहे, तर रामायणामध्ये लंकापती रावणवधाच्या आधी प्रभू श्रीरामचंद्राने नऊ दिवस नवरात्र उपासना करून या शक्ती रूपाचा आशीर्वाद घेऊनच दहाव्या दिवशी रावण वध केला हा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध दशमी होय. या दिवसापासून हा दिन दसरा किंवा विजयादशमी म्हणून भारतभर साजरा केला जातो. नऊ दिवसांच्या व्रताची समाप्ती याच दिवशी होते. तसेच नऊ दिवस युद्ध करून याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. 


या आख्यायिकेबरोबरच महाभारतातही पांडवांविषयी या दिनाचा संदर्भ आढळून येतो. या दिवशी शस्त्र पूजा केली जाते. तसेच सीमोल्लंघन करून शमीपूजन आणि अपराजिता पूजनही केले जाते. हा सण विजयाचे प्रतीक असल्याने या उत्सवास पुराणकाळात आणि राजेशाहीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नवरात्र उत्सवात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडीलावर नऊ धान्यांची पेरणी करून दसऱ्याच्या दिवशी त्या धान्याचे अंकुर देवी देवतांना वाहतात. या सर्व घटना कृषी संस्कृतीच्या प्रतीक आहेत. अजूनही गावोगावी याच प्रकारची प्रथा पाळली जाते. या दिवशी ग्रामीण भागात बाजरीच्या कणसांचे तोरण मंदिरात बांधले जाते, तसेच शमी-आपट्याच्या पानाबरोबरच या काळातील धान्याची कणसेही देवांना अर्पण केली जातात.

गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये नवरात्र शरद ऋतूत साजरी केली जाते. नवरात्र साजरी करण्यासाठी गुजरात राज्यात गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. नवरात्रीच्या सणाला प्रामुख्याने गुजरात मध्ये आणि अनेक राज्यांमध्ये दांडिया उत्सव साजरा केला जातो. रात्र होताच मातीच्या पणत्यांनी वातावरण लखलखताना दिसून येते. हे पाहायला सुंदर आणि भव्य असे दिसते. स्त्रिया आणि पुरुष दोघे एकत्र अशा प्रकारच्या नृत्यात सामील होतात. हे नऊ दिवस उपवास करतात आणि अन्न म्हणून फळे सेवन करतात. 

तर बंगालमधील नवरात्रीच्या या शुभ सणाला दुर्गादेवी मातेची पूजा केली जाते. दुर्गा महोत्सव पश्चिम बंगालमध्ये भव्य पद्धतीने साजरा केला जातो. इतर राज्यांमध्ये क्वचितच असा सण साजरा केला जात असेल. 

नवरात्रीच्या या सणावर अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. एक कथा अशी आहे की, श्रीरामाने सीता मातेला रावणाच्या कायद्यातून मुक्त करण्यासाठी दुर्गा देवीची पूजा केली होती. त्यांनी नऊ दिवस १०८ कमलांची पूजा केली होती. त्यानंतर दुर्गादेवी रामाच्या पूजेवर खुष झाल्या आणि रामाला विजय मिळवून दिला. त्यानंतर रामाने अहंकारी रावणाला ठार मारले. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची नवरात्र म्हणून पूजा करण्यात आली. त्यानंतर दहाव्या दिवशी रावणाच्या वधानंतर हा सण दसरा म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीचे शुभ सणाला देशाच्या उत्तर भारतात अनेक ठिकाणी कन्या पूजन केले जाते. या पूजेत नऊ लहान मुलींची पूजा केली जाते. 

या सर्व रूढी परंपरांचा आधीबंध स्त्रीतत्वाशी, सर्जनाशी आणि विजयाशी जोडलेला आहे. जेव्हा जेव्हा सृजनसृष्टीचा समतोल बिघडणाऱ्या घटना घडतात. मग, त्या नैसर्गिक असो कि मानवनिर्मित तेव्हा तेव्हा या आदिशक्तीला हाक दिली जाते. तिचा जयजयकार आणि उदोकार केला जातो. म्हणूनच संत एकनाथांनी या आईला 'नमो निर्गुण निराकार| आदि मुळमाया तू आकार | महालक्ष्मी तू साचार | करीशी दुष्टांचा संहार | आकार सारुनी निराकार काय बैसलीस बया | असे म्हणून दार उघड बया... दार उघड...' अशी साद घेतली आणि पुढे आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने अवघा महाराष्ट्र भयमुक्त झाला. सर्व असुरी शक्तींचे निर्दालन छत्रपती शिवबांच्या पराक्रमाने केले आणि संत एकनाथांची ही आकांक्षा शिवकाळात पूर्ण झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या