गणांचा अधिपती म्हणजे गणराय या गणेशाला देवाधिदेवाचं रूप का मिळालं असेल तर त्याचं कारण एकच गणपती हा दशदिशांचा अधिपती आहे.
-दादासाहेब येंधे, मुंबई
हिंदू धर्म संस्कृतीत विविध सणावारांना एक वेगळच महत्त्व आहे. त्यातला गणेशोत्सव हा उत्सव आज संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लहानग्यांपासून पासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ठाऊक असलेल्या गणपतीला देवतांमध्ये 'आद्य' का मानलं गेलं हा प्रश्न कधी ना कधी आपल्या मनात घर करून गेला असेलच. गणांचा अधिपती म्हणजे गणराय या गणेशाला देवाधिदेवाचं रूप का मिळालं असेल तर त्याचं कारण एकच गणपती हा दशदिशांचा अधिपती आहे.

कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी सर्वात आधी गणेशाला प्रसन्न करावं लागतं असं हिंदू धर्मात मानलं गेलं आहे. गणेश जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी एका ऋषीच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी एक युक्ती लढवली. त्या ऋषीला आपल्या ज्ञानाचा फार गर्व होता. मग, गणेशानेही ठरवलं की याचं गर्वहरण करायचं. मग काय गणराज जिंकले आणि ऋषी त्यांची क्षमा मागू लागले. तेव्हा त्या ऋषींनी गणेशाची चौकशी केली तेव्हा गणेश म्हणजे प्रत्यक्ष शिव-पार्वतीचा पुत्र आहे हे त्यांनी जाणलं आणि यामुळे गणरायांना ज्ञानाची देवता म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

आद्य दैवत बनण्यासाठी देव देवतांची स्पर्धा सुरू असताना शंकरांनी त्यांना गणांचा अधिपती बनवलं पण त्यानंतर इंद्रदेवांनी मला आद्यदेव व्हायचं आहे असं सांगितलं. तेव्हा जो गणांवर अधिपत्य करतो, तोच आद्य देव बनणार असे शंकरांनी सांगितलं, त्यानुसार गणराय आद्य दैवत बनले.

हरितालिका - गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भाद्रपद शुद्ध तृतीयेला "हरितालिका" असे म्हणतात.
हरितालिका म्हणजे काय त्याची पौराणिक पार्श्वभूमी कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया...
हरितालिका हे व्रत कुमारिकांनी करायचं असतं. विवाहित महिलाही हे व्रत करतात. हरितालिका या शब्दाचा अर्थ 'हरित' म्हणजे 'हरण' आणि 'आलिका' म्हणजे 'आली' नामक मैत्रिणीच्या सहाय्याने शिव तत्वांचं केलेलं हरण म्हणजे 'हरितालिका' होय. हिंदू स्त्रिया व कुमारीका हे व्रत अगदी मनोभावे करतात. हे व्रत केल्याने कुमारीकेला तिच्या मनाजोगता पती मिळावा तर सौभाग्यवती आपलं सौभाग्य अखंड राहो यासाठी हे व्रत करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हा उपास करतात. सृष्टीचे निर्माता शंकर भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं जातं असा समाज आहे. श्री शंकरावरील निस्सिम भक्तीमुळे हिंदू स्त्रिया हे व्रत अगदी काटेकोरपणे पाळतात. काही स्त्रिया दिवसभर पाण्याचा थेंबही प्राशन करत नाहीत तर काही स्त्रिया आपल्या इच्छेप्रमाणे फराळ खाऊन हा उपवास करतात.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं गणरायाचं वर्णन :
सर्व कार्याला प्रथम गणेशाला वंदन केलं जातं. ग्रंथ, पुस्तक किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम यांच्या सुरुवातीला 'श्री गणेशाय नमः' असं लिहिलं जातं. पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीची रचना करताना त्यांनी किती आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणेशाचे वर्णन केलं आहे आणि गणेशाच्या मूर्ती मधील प्रत्येक अवयवाचा, आयुधाचा, सौंदर्याचा शास्त्र आणि मनुष्य यांच्याशी कसा संबंध लावला आहे याचं काव्यात्मक वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
|ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या |
| जय जय स्वयंवैद्या आत्मरुपा |
| देवा तूच गणेश |सकलार्थमतीप्रकाशु |
| म्हणे निवृत्ती दासू अवधारीजो जी |
या ओवींमध्ये माऊली म्हणतात ॐ या शब्दाचं प्रतिपादन केवळ वेदच करू शकतो. अशा आद्यतत्वाला नमस्कार असो! जे स्वतःच स्वतःच्या रूपाला पूर्णपणे योग्य रीतीने जाणतात, अशा चित्ततत्त्वाचा जयजयकार असो. हे भगवंता सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देतोस तुझा जय जयकार असो... असे मी निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणतो.
| नाना प्रमेयाची परी | निपुणपणे पाहता कुसरी |
| दिसती, उचित पदे माझारी | रत्ने भली |
| तेथ व्यासदिकाच्या मती| तेची मेखळा मिरवती|
| चोखळपणे मिरवती | पल्लवसडका|
माऊली या ठिकाणी म्हणतात की, गणरायाच्या रत्नांमुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचे सौंदर्य लाभलं आहे, पण या सौंदर्यात भर म्हणजे कमरेभोवती असलेला शेला या शेलाचा पदर अगदी ऋषीमुनींच्या प्रज्ञेप्रमाणे झळकतो.
| देखा षडदर्शने म्हणिपती| तेचि भुजांची आकृती|
| म्हणोनी विसंवादे धरती | आयुधे हाती |
पुराणात सहा दर्शन म्हटले आहेत, या सहा दर्शनाचं प्रतीक म्हणजे गणेशाचे सहा हात आणि त्यातले आयुत मनुष्य देहात षड्रिपुंचा आहे त्या षड्रिपुंचा नाश करण्यासाठी गणेशांनी ही आयुध घेतली असावीत असा समज आहे.
|देखा, विवेकवंतु सुविमिळु| तोची शुंडादंडु सरळु|
|जेथे परमानंद केवळु|महासुखाचा|
जिथे समाधी सुखाचा परमानंद विशुद्ध स्वरूपात अनुभवायास येतो अशा सारासार विवेकाने भरलेले विशुद्ध ज्ञान म्हणजे गणरायाची लांब सरळ सोंड होय.

सदर लेख मासिकात प्रसिद्ध झाला आहे.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.