Ticker

10/recent/ticker-posts

चंद्र आहे साक्षीला....

चांद्रयान-३ पाठवणार असलेल्या माहितीतून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे दरवाजे उघडतील. कारण  आपल्याकडे अनेक महत्त्वाची माहिती असेल, मग व्यवसायही आपल्याकडे येईल.

-दादासाहेब येंधे


इस्रोच्या चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर भारतातील १४० कोटी जनतेची छाती अभिमानाने फुलून गेली आहे. तीही चंद्राच्या साक्षीने...


या यशामुळे आधीच्या चंद्र मोहिमांच्या अपयशाची जळमटे क्षणाधांत झटकून टाकली गेली. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला. भारतासह जगातील अनेक देशांच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत होती. श्वास रोखले गेले होते, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली... चांद्रयान-३ मोहीम फत्ते झाली! या घटनेमुळे प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. या मोहिमेद्रारे संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथे जगातले कुणीच गेलेले नाही, अशा दक्षिण ध्रुवाला भारताने गवसणी घातली. चांद्रयान- २ मोहिमेत अपशय आल्यानंतरही भारताने हार मानली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर २०२० मध्ये चांद्रयान- ३ मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचे फळ आज घडीला २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी मिळाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता चांद्रयानाने यशस्वी उड्डाण केले होते आणि आता चांद्रयान-३ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-१ ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-३ चे प्रमुख उद्दिष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करून त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे..


चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मातीचा अभ्यास करणार आहे. पृथ्वी, सूर्यमाला, चंद्राच्या निर्मितीची अनेक स्हस्ये शोधली जाणार आहेत. चंद्रावर सिलिकॉन, लोह, टायटेनियमसारखी दुर्मीळ खनिजे सापडण्याची शक्यता आहे. त्याचा शोध ही मोहीम घेणार आहे. अब्जावधी वर्षांपासून अंधारात असलेल्या प्रचंड थंडीतल्या मातीत बफांचे रेणू शोधले जाणार आहेत. या संशोधन मोहिमेत बर्फ, पाण्याचा अंश सापडल्यास भविष्यातील मोहिमांना फायदा होणार आहे. पाणी सापडल्यास चंद्रावर ऑक्सिजन, हायड्रोजनची निर्मिती शक्य होणार आहे. ऑक्सिजन निर्मितीनंतर चंद्रावर मानवी वस्तीचे स्वप्न दृष्टिपथात येऊ शकते. जगातील सर्व देश चंद्रावर उतरण्यासाठी स्पर्धा करत आहेत. चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढत आहे. तिथे पोहोचण्यासाठी खूप स्पर्धा आहे आणि त्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लढत आहेत; पण चंद्रावर असे नेमके काय आहे, ज्यामुळे सर्व देशांना चंद्रावर पोहोचण्याची उत्सुकता आहे? चंद्रावर अनेक प्रकारची खनिजे असण्याची शक्यता समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान-१ ने चंद्रावर बर्फ असल्याचा शोध लावला होता. त्यानंतर तेथे पाणी असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चंद्रावर हायड्रोजन, ऑक्सिजन, सिलिकॉन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि टायटॅनियनसारखी खनिजे असण्याची शक्यता आहे. नॅशनल सायन्स सोसायटीच्या यटाच्या अहवालानुसार चंद्रावर बेरिलियम ही लिथियम, झिरकोनियम, निओबियम, टँटलम अशी अनेक दुर्मीळ खनिजेही सापडण्याची शक्यता आहे. भारताने चांद्रयान-३ चंद्रावर उतरवून मोठी कामगिरी केली आहे. चंद्रावरची छायाचित्रे, तेथील माहितीची विक्री करून पैसे कमावणे असे अनेक उद्देश त्यातून शक्य असले तरी अवकाश संशोधनात भारताने जगात चौथे स्थान पटकावले आहे, हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आणखी एक बाबही तितकीच महत्त्वाची आहे, ती म्हणजे विकासाचे नवे मार्ग उघडण्यासोबतच चांद्रयान-३चे यश सीमा सुरक्षेच्या आघाडीवरही खूप उपयुक्त ठरेल. लडाख आणि इतर भागात सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी चीनने ७२ लष्करी उपग्रह सोडले आहेत. 'चांद्रयान-३ मुळे ड्रॅगनच्या जुलुमाला आवर घालता येणार आहे. शत्रू राष्ट्राच्या कारवायावर नजर ठेवता येईल. धोक्याची सूचना मिळताच भारताला तातडीने हालचाली करता येतील आणि अशा कारवाया नियंत्रणात राहतील. चांद्रयानाच्या यशानंतर सीमेच्या काही भागात अगदी कमी अंतराने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या चीनच्या लष्करी हालचालीची मिनिट टू मिनिट माहिती मिळवता येईल. 


“चांद्रयान ३ भारत-चीन सीमेवर पाळत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. 'चांद्रयान ३  मोहिमेच्या यशामुळे स्पिन ऑफ म्हणजेच इतर अनेक तंत्रांचा विकास होईल. त्या वस्तू आणि तंत्रांचा उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नवीन साहित्य, युनिटस आणि सॉफ्टवेअर इत्यादी विकसित केले जातात. अशा यशस्वी प्रक्षेपणानंतर नासाने उद्योगांमध्ये विविध उपकरणे आणि तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. 'चांद्रयान-३मुळे प्रक्षेपण क्षमता, पेलोड साध्य आणि सुरक्षितता या आघाडीवर भारताची ताकद वाढेल. भारताच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात मोठी मदत होणार आहे. भारताची उपग्रह पाठवण्याची क्षमता वाढेल. हवामानाचा अचूक अंदाज बांधणे सोपे होईल. “चांद्रयान-३ पाठवणार असलेल्या माहितीतून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे दरवाजे उघडतील. कारण  आपल्याकडे अनेक महत्त्वाची माहिती असेल, मग व्यवसायही आपल्याकडे येईल. २०४० पर्यंत चंद्राशी संबंधित विविध क्रियाकलापांची अर्थव्यवस्था ४२ अब्ज डॉलर्स असेल. भारताकडे असणाऱ्या चंद्राच्या डेटावरूनही व्यापार करता येईल. असे अनेक देश आहेत, जे चंद्रावर यशस्वी लँडिंग करू शकत नाहीत. संशोधनासाठी ते भारताकडून कोट्यावधी डॉलर्सचा डेटा विकत घेऊ शकतात. याद्वारे ते चंद्रावर न जाता संशोधन करू शकतात. भविष्यात तेथे तळही तयार करता येतील. एका अंदाजानुसार २०३० पर्यंत चंद्रावर ४० अंतराळवीर आणि २०४० पर्यंत एक हजार अंतराळवीर राहणार आहेत. यासाठी चांद्रयान-३चे संशोधन खूप उपयुक्त ठरणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या