Ticker

10/recent/ticker-posts

रक्षाबंधन एक अनोखे नाते

रक्षाबंधन हे नाव संरक्षणाची प्रतिज्ञा दर्शवते. या शुभ दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात.

-दादासाहेब येंधे 

भाऊ आणि बहिणीला एका धाग्याने बांधणारा आणि एकमेकांचे प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. नात्यांना उजाळा देणारा आणि नाते परत घट्ट बांधून ठेवणारा असा हा दिवस. या दिवसाची सगळेजण वाट पाहत असतात. खास करून जे भाऊ-बहीण एकमेकांपासून दूर असतात त्यांना या निमित्ताने एकमेकांची भेट घेता येते. आपली सुखदुःखे एकमेकांना सांगता येतात आणि जुन्या बालपणीच्या स्मृतींनाही यामुळे उजाळा मिळतो. भावाला बहिण राखी बांधते आणि भाऊ त्या धाग्याला साक्षी ठेवून आपल्या बहिणीच्या संरक्षणाची हमी देतो किंवा जबाबदारी घेतो. 


रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण मानला जातो. रक्षाबंधन हे नाव संरक्षणाची प्रतिज्ञा दर्शवते. या शुभ दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात.


राखीचा धागा पवित्र मानला जातो कारण तो भाऊ आणि त्याच्या बहिणीला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देतो, की ती जिवंत आहे तोपर्यंत तो तिचे रक्षण करेल! कोळी बांधव समुद्रात नारळ अर्पण करून नंतर राखी पौर्णिमा साजरी करतात. 


या प्रसंगी बहिणी त्यांच्या भावांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि भावाला ओवाळून त्याचा हाताला राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतात. या सणाचे महत्त्व यावरून ओळखले जाऊ शकते की हा भाऊ आणि बहीण यांच्यातील बंध मजबूत करतो, हा सण भारतातील प्रमुख सणांपैकी आहे.


आज २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना महिला सुरक्षित नाहीत. अशावेळी भावाची जबाबदारी जास्त वाढते. पण, हा धागा फक्त भावाच्या जबाबदारीची जाणीव करून देतो का? तर नाही. आजच्या बहिणीलाही भावाला अनेक प्रकारे मदत करावी लागते. म्हणूनच राखीचा हा सण आनंद उत्साहाबरोबरच जबाबदारीची जाणीव करून देतो. 


रक्षाबंधन हा सण खूप जुना आहे. अगदी पुरातन काळापासून साजरा करण्यात येतो. इतिहासातही या राखीचे अनेक किस्से सांगितलेले आहेत. रक्षाबंधन याचा अर्थच रक्षा म्हणजे 'रक्षण' करणारा. 


या सणाविषयी कथा प्रचलित आहेत. पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपलं भाऊ केलं आणि नारायणाची सुटका केली. म्हणून या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते असे म्हटले जाते.


तर मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमणांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हा सण साजरा केला जात होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीला सुरुवात झाली असं म्हटले जाते. 


श्रावण महिना म्हणजे सण उत्सवांची रेलचेल. त्यात पौर्णिमेला येणारा रक्षाबंधनाचा सण म्हणजे मध्यवर्ती समतोल राखणारा सण. या दिवशी सासरी गेलेली बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येते. त्यामुळे तिच्या आनंदाला पारावर नसतो.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या