Ticker

10/recent/ticker-posts

चला पिकनिकला, चिंब भिजायला...

आपल्या महाराष्ट्रात अनेक पावसाळी पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. या पर्यटन स्थळांवर दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गर्दी उसळते. यात भंडारदरा, माळशेज घाट, खोपोली, ताम्हणी घाट या पर्यटन स्थळांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. निसर्गाच्या कुशीत असलेली ही पर्यटन स्थळे पर्यटकांना दिवसेंदिवस अधिकच आकर्षित करत आहेत. ही पावसाळी पर्यटन स्थळे पर्यटकांचा आनंद खुलवणारी आहेत.

-दादासाहेब येंधे


माळशेज घाट- उत्तुंग कड्यांवरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र फेसाळत येणारे धबधबे, ढगांची गर्दी त्यातून जाणारा घाट रस्ता अशा या माळशेज घाटाची सफर पावसाळ्यात न चुकवण्यासारखी आहे, अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटाच्या सुरुवातीला पठारावरील एमटीडीसी चे रिसॉर्ट अलीकडे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगाव धरणाचा सुंदर असा जलाशय आहे. मागे हरिश्चंद्रगडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे.

माळशेज घाटातील धबधबे

माळशेच्या समोर दरीच्या तळात घनदाट जंगलांमुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, माकड, बिबट्या अशा वन्यप्राण्यांचा वावर असतो. जुलै ते सप्टेंबर महिन्यात सैबेरीयातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांचे थवेच्या थवे घाटाच्या अलीकडे डोंगराच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये साचलेल्या पाण्यात दिसून येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगर रांग खूप उंचावरून कोसळणारा धबधबा मन मोहून टाकतो. या माळशेज घाटातील बोगदा मन मोहून घेतो. या बोगद्यातून आपली गाडी जातानाचा क्षण प्रत्येकाने अनुभवायला हवा.

माळशेज घाटातील धुके

खोपोली- मुंबई पुण्यातील मित्रांसोबत नक्की पर्यटनाचे नियोजन कुठे केआयचे  हे ठरत नसेल तर खोपोलीच्या रूपात सुवर्ण मध्य साधता येईल. खोपोलीस लहान मोठे शेकडो असे धबधबे आहेत. एखाद्या ठराविक ठिकाणी जायचे नसेल आणि स्वतःची गाडी असेल तर नुसते वाटेतही शेतातील, डोंगरावरील हिरवळ, धबधबे असे मोहक रूप पाहत पिकनिक साजरी करता येईल. खोपोलीत गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट देता येईल. येथे गेल्यावर मन:शांती मिळते. जर तुम्ही कुटुंबासोबत पिकनिकला जात असाल आणि फार गर्दी नसलेले ठिकाण शोधत असाल तर खोपोली जवळचा कोलते, ढेंगटाक, कापरी धबधबा हे उत्तम पर्याय आहेत. मात्र, पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह खूप वेगवान असतो. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.


भंडारदरा- कळसुबाई पर्वताच्या कुशीत वसलेले भंडारदरा पावसाळ्याची चाहूल लागताच भेट देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून गणलं जात आहे. पावसाळा सुरू होताच तरुणाईची पावले याकडे आपोआप वळू लागतात. भांडारदऱ्यातील विल्सन धरण, रंधा धबधबा हे पावसाच्या महिन्यात अगदी रौद्र रूप धारण करतात. 

रंधा धबधबा


विल्सन धरणावर छत्रीसारख्या आकाराचा एक मोठा गोलाकार धबधबा म्हणजेच अम्ब्रेला फॉल तसेच शेंडी या गावापासून दहा किलोमीटरवर रंधा धबधबा व जलविद्युत निर्मिती प्रकल्प पाहता येईल.

अम्ब्रेला फॉल


भांडारदऱ्याहून बोटिंग चा आनंद घेत रतनवाडी येथील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अमृतेश्वराच्या पुरातन हेमांडपंथी मंदिरापर्यंत जाता येते. या मंदिरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि मनमोहक असे आहे. मंदिरातील शिवलिंग पावसात पूर्णतः पाण्यात बुडालेले असते. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' विशेष लोकप्रिय असा आहे.


ताम्हिणी घाट- ताम्हिणी घाटातून पसरलेली हिरवळ, थंडगार वाहता वारा, डोंगरावरून उतरून आलेले पांढरे ढग व कोसळणारे शुभ्र धबधबे हा नजारा प्रत्येक थकलेल्या जीवाला शांती देऊन जातो. 

मुंबई गोवा महामार्गाने कोलाड पर्यंत जाताना कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की डाव्या बाजूला मुळशी धरण आहे कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. ताम्हिणी घाट हा मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर असून पुण्यापासून पौड रस्त्या मार्गे ९३ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. या घाटात ताम्हिणी वन्यजीवन अभयारण्य वसलेले आहे. ताम्हिणी अभयारण्यत सस्तन प्राण्यांच्या २८ प्रजाती तसेच स्थानिक पक्षांच्या १२ प्रजातींसह येथे दीडशे प्रकारचे पक्षी आपण पाहू शकतो. विशेष म्हणजे या अभयारण्यत ७२ प्रकारची फुलपाखरे, आठ प्रकारचे सरपटणारे प्राणी तसेच दुर्मिळ वनस्पती देखील आढळतात. वनस्पती, झाडांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी येथील सहल एक पर्वणीच ठरेल.



photo: google

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या