Ticker

10/recent/ticker-posts

मी आणि माझा संघर्ष एक सत्य घटना

 आयुष्याचा थक्क करणारा प्रवास, आईची मोलाची साथ

-दादासाहेब येंधे 

पोलीस म्हटले की, एक प्रकारचा दरारा... रुबाब... पोलिसांच्या याच प्रतिमेमुळे गुन्हेगार त्यांना वचकून असतो. मुंबई पोलीस कामात सदैव तत्पर असतो. पण, खाकी वर्दीच्या आतही संघर्ष दडलेला असतो. पोलीस दलातील ताडदेव (एलए) येथील विजय अर्जुन पाटील यांना पोलीस दलात येईपर्यंत मोठा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाचा उलगडा करताना ते सांगतात... 

    


माझा जन्म १९८१ साली जि. कोल्हापूर, ता. चंदगडच्या ताम्रपर्णी नदीच्या कुशीत वसलेल्या कालकुंद्री या गावी एकदम गरीब आशा कुटुंबात झाला. 

      

माझे आई-वडील शेतमजुरी व भाजी पाला विकून तिन्ही भावंडे व आपलं पोट भरत असत. वडिलांनी सुरुवातीला गारेगार विकले त्यानंतर भाजीपाला असे विविध व्यवसाय करून जगण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही तिघे भावंडे आम्हाला बहिण नसल्याकारणाने लहानपणापासून घरची सर्व कामे आईला हातभार लावण्यासाठी करावी लागत  होती. आम्ही तिघे भावंडे सर्व काम वाटून घेऊन करायचे, आमचे घर दोन खोल्याचे काळ्याकौलारूचे(८×१२ अशा दोन खोल्या) एका  मध्ये स्वयंपाक खोली, भाताचा तट्टा, व देवघर, आणि दुसऱ्या खोलीमध्ये न्हाणी(बाथरूम) व दोन जनावरांचा गोठा. घरामध्ये सहा महिने दळ (ओल) असायची अस आमचं घर होत.

       

आई-वडील रोज दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीसाठी जायचे. आम्ही संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर एकाने जळणासाठी लाकड शोधून आणायच व जनावरंचे दूध काढायचे, दुसऱ्याने शेण काढायचं व जनावरांची पाणी व चाऱ्याची वेवस्था करायची, आणि माझा नंबर घरची झाडलोट करून चहा व भात बनवणे ही नेमलेली काम असायची. आणि संध्याकाळी दाटीवाटीने त्याच घरी झोपायचे.

      

थोडे मोठे झाल्यानंतर आम्ही दुसऱ्याच्या शेतातील काजवा चोरणे, करंज्या च्या शेंगा आणू त्याच्यातील बिया विकणे, झाडांचे डिंक काढून विकणे असे शाळा शिकण्यासाठी विविध पराक्रम केले. हे करत असताना "लोकांचे मार पण भरपूर खाल्ले" सुट्टीच्या दिवशी व उन्हाळा मध्ये आपली व दुसऱ्यांची जनावरे चाऱ्यला घेऊन जायची. त्याच बरोबर बामणाच्या चिंचेखाली (गावातील सर्व कचरा फेकण्याची जागा) दिवाळी, दसरा व सप्ता यावेळी गावातील लोक घरे झाडलोट करून नको असलेल्या वस्तू व कचरा त्या झाडा खाली फेकून जात असत. तोच कचरा आम्ही वेचून त्यातील शालेय उपयोगी (खराब पेन, खराब वह्या त्याची कोरी पान,फुटकी पाटी,पेन्सिल) हे शोधून आणून त्याचाच वापर शाळेसाठी करत होतो. 

       

सकाळी पाच वाजता उठून बियाणाचे उस सोलायला जायचे (हाताच्या नखांनी सोलने) शंभर उस सोलल्यानंतर एक रुपया भेटायचा असे सकाळी दहा वाजेपर्यंत दीडशे ते दोनशे उस सोलायचो. सोल्याच्या शेंगा ( पावट्याच्या शेंगा ) आल्या की बुटका ची आज्जी ( पार्वती कोकितकर ) यांच्या घरी आमचा मोर्चा असायचा एक शेर सोल्याच्या शेंगा ( पावट्याच्या शेंगा ) सोडल्यानंतर आजी आम्हाला पाच पैसे द्यायची. आम्ही रात्री दहा वाजेपर्यंत तीन ते चार शेर सेंगा सोलायचो,असे नाना विविध जीवन जगण्यासाठी कामे केली. 

       

शाळेला जात होतो पण.. आमच्या डोक्यात काहीच राहायचे नाही. सर्व लक्ष हे सकाळी व संध्याकाळी करायच्या कामांमध्ये लागून असायचं त्यामुळे शाळेत फक्त शरीराने होतो, पण मनाने आम्ही पूर्ण शेती व इतर उद्योग यामध्ये असायचो. गरिबी जणुकाही आमच्याच नशिबात मारलेली आहे असे काही ते दिवस होते. आई-वडिलांनी आम्हाला शाळा शिक असं कधीच सांगितलं नाही उलट आई वडिलांना कामात मदत केली की ते खूप खुश व्हायचे त्यामुळे शाळेचे महत्त्व आमच्या घरच्यांना व आम्हालाही माहीतच नव्हते. मी अंदाजे तिसरी किंवा चौथीमध्ये असताना माझ्या वडिलांना गावातील एका व्यक्तीने शुल्लक कारणावरून मारले त्या वेळी वडिलांच्या बर्गडी व कंबरेला जबर मार लागला होतो.त्यांचे ऑपरेशन करणे खूपच गरजेचे होते.आमच्याकडे तर फुटी कवडी पण नव्हती तेव्हा, आईनं गावातील एका दयाळू वेक्तिकडे मंगळसूत्र गहाण ठेऊन  वडिलांसाठी तीनशे रुपय आणले व बाकीचे दोनशे रुपये इंत्राज मस्करेंज सर यांच्याकडून आणले व वडिलांना मुंबई येथील "सर जे. जे. रुग्णालयामध्ये" उपचारा साठी गावच्या लोकांच्या सोबतीने पाठविले. तेंव्हा गावची रूम डीलई रोड (करिरोड) इथे राहून गावकऱ्यांच्या सहकार्याने वडिलांनी उपचार करून घेतले. 

       

त्या नंतर अजून आमच्या घरी खूपच बेकारी, चारी दिशा दारिद्र्या आलं. मग आम्ही सर्वांनीच जे मिळेल ते काम करायला सुरुवात केली. वडिलांना कोणतेच काम करता येत नव्हते. त्यांना लागणारी औषध आणायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते, आशात ही आम्ही शाळा शिकत होतो, पण.... गावातील काही लोकांनी आईला सल्ला दिला की ”मुलांना भीक मागायला लाव म्हणजे तुझे घर चालेल व तुमचं पोट भरेल" पण आईनं व आम्ही हार मानली नव्हती. कालांतराने वडिलांनी गारेगार (बर्फाचा गोळा) विकायला सुरुवात केली एक केविलवाणा प्रयत्न!!, त्याच बरोबर आमचे शेजारी अंतोन क्रूझ (तात्या) यांनी वडिलांना भाजी विकण्याचा सल्ला दिला. वडिलांनी त्यांच्या सोबतीने भाजी विकायला सुरुवात केली. सकाळी पाच वाजता उठून वडील व अंतोन क्रूज (तात्या) हे कागणी गावी चालत जायचे व पहिली गाडी पकडून बेळगावला भाजी मार्केट गाठायचे, तिथून सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान खेडेगाव कोवाड येथे गुरुवारी बाजार भरायचा तेथे आई व वडिलांनी भाजी विकायला सुरुवात केली. त्या काळी वडील पन्नास ते साठ रुपयाची भाजी भरत त्या मध्ये पाच ते सहा रुपये नफा व्हायचा. उरलेली भाजी शुक्रवारी सकाळी सहा ते साडेसहा वाजता आई व मी डोकीवर बुट्टी (पाटी) घेऊन गावात उरलेली भाजी दहा वाजेपर्यंत विकायचो. लहानपणीच डोकीवर प्रमाणापेक्षा जास्त ओझं घेऊन आईच्या पाठीमागे फिरायचा तेंव्हा गावातील आया-बहिणी व पुरुष माझ्याविषयी खूपच हळहळ व्यक्त करायचे. आईला आवर्जून सांगायचे की, "मुलगा किती लहान आणि त्याच्या डोक्यावर किती ओझ दिले तू", तेंव्हा आई त्यांना सांगायची "काय करणार आमची परिस्थितीच आशी हलाखीची..." त्यामुळे असे केल्याशिवाय माझ्याकडे पण पर्याय नाही. असे ते दिवस जगत नव्हतो!! तर ते दिवस काढत होतो, मी दिवस ढकलत होतो.

       

मी एके दिवशी कुदनुर या ठिकाणी दळण दळण्यासाठी विजय पवार यांच्या गिरणीला गेलो असता त्यांना विचारणा केली की, काही काम असेल तर मला सांगा मी तुमच्या गिरणीमध्ये काम करतो. तेव्हा त्यांनी 'कोंडा दळण्याचे काम आहे पण ते काम सर्व दळण संपल्यानंतर रात्री दहा वाजल्यापासून पुढे करायचे आहे तुला जमत असेल तर बघ' तेंव्हा मी त्यांना लगेच होकार दिला. आणि त्या क्षणापासूनच मी त्यांच्याकडे रात्री कोंडा दळण्यासाठी जायला सुरुवात केली. सौ.श्रीमंता पवार (मावशी) या मालकीण व त्यांच्या तीन मुली, एक मुलगा असा त्यांचा सुंदर आणि छान परिवार होता. त्या सर्वांनी मला आपल्याघरच्या सारखी वागणूक दिली. पाऊस असो किंवा थंडी मी रात्री एक ते दोन वाजेपर्यंत एक ते दीड पोत कोंडा दळायचा (एका पोत्याला तीन रुपये मिळायचे) झाडलोट करून जे काही पीठ आणि थोडे तांदूळ भेटायचे ते माझ्यासाठी बोनस म्हणून असायचे. सर्व काम आटोपून मी तिथेच झोपायचा आणि सकाळी त्या मावशी मला चहा देऊन पाठवायच्या. असा उपक्रम चालू झाला त्या नंतर मी त्याच गावचे सिद्धाप्पा कुट्रे यांच्या गिरणीमध्ये हेच काम केले. त्यांनी पण मला 'रात्रीचे जेवण व चहा द्याचे' तो परिवार खूप मोठा आणि प्रेमळ होता, आणि मी त्या मध्ये खपून जायचा. असेच दिवस जात होते दिवसा मिळेल ते काम करायचा आणि रात्री कोंडा दळायचा.

        

"गंमत म्हणून सांगतो" एके दिवशी आमच्याच गावचे पाटील "गुरुनाथ पाटील" (पाटील तात्या) यांच्या मळेभरम या शेतात पावसाच्या दिवसात भाताला कोळपणी करत होतो. खूप थकलो होतो त्रास तर होत होता, पण कुणाला सांगणार..? मजुरी करायची  म्हटलं की सर्व काही मनाविरुद्ध असत. जे देतील ते खायचे प्याचे. त्यांनी मला दुपारी जेवण झाल्यानंतर कॉफी दिली होती. त्या कॉफीची चव मी पहिल्यांदाच घेतली; पण मला ते काही वेगळच वाटल. मी त्यांना सांगितलं "मला चहा असेल तर द्या"त्यावेळी त्यांची दोन मुलं व त्यांच्या पत्नी माझ्यावरती खूप हसले, ते मला समजावून सांगत होते की "चहापेक्षा कॉफी खूप चांगली पूर्ण थकवा निघून जातो" तेव्हा मी जबरदस्तीने ती आयुष्यातील पहिलीच कॉफी प्यायलो. तात्यांनी आमच्या आयुष्यात खूप खूप मदत केली. वेळोवेळी पैसे देणे असो किंवा अन्नधान्य ते आम्हाला कधी नाही म्हंटले नाहीत. त्यांचा मुलगा माझ्या पुढील वर्षात होता. त्याचीच पुस्तक,पेन, वह्या मला ते द्यायचे आणि त्याच वह्या-पुस्तकांसोबत मी शाळा शिकत होतो. आई पण त्यांच्याच शेतात रोज कामाला जायची, शेतात उरलेले जेवण काकू आईकडे द्यायच्या, तेच आमचं रात्रीचे जेवण असायचं. काही वर्षांनंतर मी माझ्याच गावचे विजय गडकरी यांच्या गिरणीत कोंडा दळण्यासाठी जायला सुरुवात केली. तिथे पगार पोत्याला पाच रुपये झाला. त्यांच्याकडे पण खूप दिवस हेच काम केले.असेच अहोरात्र कष्ट करून दिवस जगत होतो!!! जगत होतो... म्हणण्यापेक्षा काढत होतो. काही सुचत नव्हत काय कराव, चारी बाजूने फक्त अंधकार होता.

         

पण... माझ्या जीवनात एक चांगली गोष्ट घडत होती ती म्हणजे मला लहानपणापासूनच खूप हुशार आणि छान मित्र-मैत्रिणी भेटले. माझ्या घरी लाईट नसल्या कारणे मी विनोद पाटील यांच्या घरी अभ्यासाला जायचा तिथे मी नववीपर्यंत त्यांच्या घरीच राहून अभ्यास केला. 'विनोद व त्याचे आई-वडिल व दोन बहिणी व एक भाऊ' यांनी मला एक घरचा सदस्य असल्याची वागणूक दिली. एक प्रेमळ असे कुटुंब त्या काळी सर्वजण सुशिक्षित असा तो परिवार. विनोदच्या आई व आजी यांच्या आग्रहाने खूप वेळेला त्यांच्याच घरी माझे जेवण व्हायचे, खूपच बर वाटायचं. भरपेट जेवण भेटायचं कधी कधी सणाला पंचपक्वान पण भेटायचे. त्या नंतर मी दहावीला असताना (१९९६-९७) प्रशांत यांच्या मामाच्या घरी राहायला गेलो. तिथे एक शिक्षक, प्रशांत व मी राहायचे. दहावीचं वर्ष मोलमजुरी करून कसेबसे पूर्ण केले पण मी दोन विषयांमध्ये फेल झालो. आम्हाला पास आणि फेल यामधील फरक कधीच जाणवलाच नव्हता. आम्ही दहावीला साठ ते पासष्ट मुलं मुली होतो.त्या मधील तेरा मुलं मुली पास झाली होती. बाकीचे फेल झालो होतो. आम्हाला फेल झाल्याचे दुःख कधीच झाले नाही. उलट आपल्या बरोबर चे मित्र नापास झाले. ते पण आपल्यापेक्षा जास्त त्यांचे विषयी गेलेत याचा आनंद जास्त होता. मला किंवा माझ्या घरच्यांना फेल झाल्याचे कोणतेच दुःख झाले नाही. पण मुलगा त्या वेळेची मॅट्रिक पर्यंत शिकला हे खूप झालं याचा आई-वडिलांना आनंद होता. कारण शिक्षणाचे कोणतेच महत्त्व ना माझ्या आई-वडिलांना ना आम्हाला समजले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत जेवढं शिकलो तेच खूप महत्त्वाचं होतं. 

        

माझ्या घरी लाईट १९९८ साली आली तो पर्यंत घरी दिवाच होता. आई-वडिलांनी भाजीचा धंदा बंद केला होता तोच धंदा मी पुढे सुरू केला. भाजी विकत असतानापुढे मी ऑक्टोबर मध्ये दहावी पास झालो. आणि त्याच वर्षी ऊस तोडायला अशोक मुकादम (अशोक पाटील) यांची टोळी जॉईन केली. पूर्ण सीजन ऊस तोडणीमध्ये घालवल्यानंतर मी पुढे अकरावीसाठी श्री सरस्वती विद्यालय जुनियर कॉलेज कालकुंद्री या ठिकाणी ऍडमिशन घेतले. कॉलेज करत असताना आई-वडिलांचा बंद पडलेल्या धंदा पण सुरूच ठेवला. माझ्या काही मित्रांनी व गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी मला सल्ला दिला की,"असं तडफडत जीवन जगण्यापेक्षा तु आर्मी मध्ये का जात नाही"? त्यावेळी आर्मी मध्ये जाण्यासाठी वीस हजार रुपये देऊन वशिला लावून मुलं भरती होत होती. आणि माझ्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता. अशात हार न मानता दहा रुपये घेऊन बेळगाव या ठिकाणी भरतीसाठी गेलो आणि पहिल्याच प्रयत्नात भरती झालो.(१९९८-९९) त्या वेळी अंतोन क्रूझ(तात्या) यांनी मला खूप मोठा गुरुमंत्र दिला, तो म्हणजे "आयुष्य सुखकारक घालवायचं असेल तर वाचायला शिक" आणि त्यानंतर मला खरंच शिक्षणाचे महत्त्व समजले. मिलेट्रीत भरती होणे हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सर्वात महत्त्वाचा आणि सोनेरी दिवस होता. असे ते म्हणतात.

         

मी सहावीला किंवा सातवीला असताना ”माझी चार स्वप्न” लायकी नसताना सुद्धा माझ्या वहीमध्ये लिहून ठेवली होती, आणि त्याच स्वप्नांचा मी पाठलाग करत होतो.माझी स्वप्न-१) करायची तर सरकारी नोकरी २) घ्यायची तर हिरो होंडा ची गाडी ३) बांधायचे तर स्वतःचं घर ४)लग्न......... (माझी त्यावेळी लायकी पण नव्हती ते मी हे पाहिलं). आज मी तिन्ही स्वप्ने पूर्ण केली याचा खूप आनंद होतो. 

         

आपले माजी राष्ट्रपती मा. एपीजे अब्दुल कलाम साहेब यांना २००७ साली भेटण्याचा योग आला. त्या वेळी माझी शांती सेना म्हणून आफ्रिका खंडात "काँगो" या देशात निवड झाली होती. त्या वेळी त्यांनी आम्हाला असे म्हटले होते की, "आपली परिस्थिती असली नसली तरी स्वप्न मोठी बघा" मी स्वप्न पाहिले आणि त्याचा पाठलाग पण केला. आज मी सर्वांच्या आशीर्वादाने आर्मीतून (२०१६) रिटायर्ड असून महाराष्ट्र पोलीस (२०१७)म्हणून कार्यरत आहे.


हे सर्व सांगत असताना नकळत डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. जुन्या आठवणींना एक नवीन उजाळा दिल्याचा भास झाला. आज घर,गाडी, बंगला सर्व काही आहे, पण वडील आम्हाला सोडून गेले याचं दुःख होत....


                            ( महाराष्ट्र पोलीस / माजी सैनिक         
                              विजय अर्जुन पाटील 
                              मु. पो. कालकुंद्री, ता. चंदगड, 
                               जि. कोल्हापूर, 
                               मो. नं. ९४८२२७३२९५. )
Photo : viral

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या