Ticker

10/recent/ticker-posts

भेटी लागे जिवा... लागलीसे आस!

अनेक वर्ष उलटली, दशकं पालटलीत. पण, हरीनामाचा महिमा तसाच आहे...

-दादासाहेब येंधे

आषाढात पावसाच्या सरी चिंब करून टाकतात. काळी आई सुखावते. मातीचा सुगंध दरवळू लागतो. वारकरी म्हणजे शेतकरी शेतात पेरणी सुरू करतात. पेरणीचा आनंद पेऱ्यापेऱ्याने वाढत जातो आणि सर्वांना वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. 'भेटी लागी जीवा... लागलीसे आस' अशी आंतरिक उर्मी वारकऱ्यांमध्ये निर्माण होते. 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', जय जय राम कृष्ण हरी... 'विठ्ठल विठ्ठल' अशा नामघोषात वाणी अधीर होते. देहू-आळंदीपासून थेट पंढरपूर पर्यंत पालखी मार्ग वैष्णवांच्या मांदियाळीने गजबजून निघतो. टाळ-मृदंगाचा आवाज जणू गगनाला भिडतो. पंढरीची वारी हे महाराष्ट्रातल्या भाविकांचे सुख आहे.


ज्येष्ठ महिन्याचा कृष्णपक्ष सुरू झाला की विठ्ठल भक्तांना विशेषतः वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरपूरच्या 'वारी'चे. वारी शब्द 'वार' या मूळ संस्कृत शब्दापासून आलेला आहे. अर्थ आहे पाणी किंवा द्रव पदार्थ. वारी म्हणजे प्रवाहीपण. नदीच्या पाण्याचे गंतव्य समुद्रात सामावून जाणे तसेच वारकऱ्यांचे गंतव्य आहे. परमात्मा पांडुरंगात सामावून जाणे. एकरूप होणे. सर्व संत असेच भगवंताशी एकरुपता पावणे. 'देव ते संत देव ते संत! निमित्त त्या प्रतिमा!! हे पूर्णत्व लाभेपर्यंत भक्तांची वारी थांबतही व संपत देखील नाही. मराठीत 'वारी' शब्दाचा अर्थ आहे खेप किंवा फेरा. जी वारंवार केली जाते  ती वारी. या अर्थाने जन्म मग मृत्यू. पुन्हा जन्म परत मृत्यू जन्म-मृत्यूचे चक्र म्हणजे पण वारीच.


'वारकरी' शब्दाचा विग्रह काहीजण 'वार-करी' किंवा 'वारी-करी' असा करतात. जे आपल्या ठिकाणी असलेल्या दोष-विकारांवर  वार करून भगवंताला प्राप्त करतात ते वारकरी. मात्र, जे वारी करतात ते वारकरी असा अर्थ सर्वसामान्य आहे. 


आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. सणवारांची रेलचेल असते. या दिवशी भगवान विष्णू निद्राधीन होतात. ही निद्रा चार महिन्यांची असते. याला विष्णुशयनी एकादशी असेही म्हणतात आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला भगवान जागृत होतात त्या कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात.


आषाढी एकादशीचं दैवत आहे पंढरपूरचा विठुराया. त्याचं रूपही आषाढातल्या सावळ्या मेघासारखं सावळे. परंतु अत्यंत देखणे आहे. भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी गेलेला विठुराया, आई-वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने त्याच्याकडे न पाहता उभं राहण्यासाठी दिलेल्या विटेवर तो विठुराया त्याची वाट बघत उभा राहिला. तो आजही तिथेच म्हणजे पंढरपुरात उभा आहे अशी एक कथा आहे. तळागाळातल्या भोळ्या भाविकांसाठी तो सतत तत्पर आहे. या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा असते. भक्तिभावानं सहजप्रेरनेनं लाखो लोक दिंडी मिरवीत पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. हा सोहळा अवर्णनीय आहे. सातशेहून अधिक वर्षांपासून हा क्रम चालू आहे. ही दिंडी म्हणजे संतांच्या दूरदृष्टीचं, धर्म टिकविण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीचे जिवंत प्रतीक म्हणावं लागेल. जसे बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणपती मांडून सर्वसामान्यांना एकत्र आणलं तसेच काहीच सूत्र धरून संतांनी दिंडी सुरू केली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


अनेक भक्त आहेत ज्यांनी आपलं परमदैवत विठ्ठलाला स्मरून संतसाहित्य समृद्ध केलेलं आहे.  जसा भाव तसा देव. जशी भक्ती तशी वृत्ती आणि सर्वांना आपल्यात सामावून घेण्याची श्रीविठ्ठलाची स्वभावप्रवृत्ती. तो सर्वांना आपला वाटतो. त्याला कोणत्याही संकटात बोलवता येतं. तो सदैव तत्पर असतो. प्रसंगी रखुमाईचा रोष पत्करून तो आपल्या भक्तांच्या मदतीला धावून जातो. तो नाम्यासाठी खरोखरच जेवतो. तो त्याच्या जनीसाठी दळण दळतो. एकनाथांच्या घरी पाणक्या बनतो. आपल्या भक्तासाठी तो लेकुरवाळा विठू होतो. या साऱ्या त्याच्या वृत्तीमुळे तो भक्तमंडळीत प्रिय आहे. तो त्यांचा श्वास आहे.  त्याचं नाव घ्यायला ठराविक वेळ नाही. मोजणी नाही, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी... पापपुण्याचा हिशोबसुद्धा आपल्याला ठेवायचा नाही. याची काळजी देखील तोच घेणार आहे. असा आहे लेकुरवाळा विठुराया...


अनेक वर्ष उलटली, दशकं पालटलीत. पण, हरीनामाचा महिमा तसाच आहे. त्याचं प्रत्यंतर आजही वारीतून येतं.














पंढरीची वारी,पंढरपूर,वारी,श्रध्दा-संस्कृती,लेख,मराठी लेख

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. मस्त लिहिलंय, लिहीत राहा

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान माहिती तसेच हिंदू संस्कृती आणि सणांचे महत्त्व सर्वांना माहित असावे यासाठी अशा लेखातून मिळालेली माहिती खूप महत्वपूर्ण आहे आपण असेच लिहित रहा- संदीप महाडिक

    उत्तर द्याहटवा

Please do not enter any spam link in the comment box.