Ticker

10/recent/ticker-posts

वारी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा झरा

आषाढी वारीला कोणी भक्तीभाव म्हणेल,  कोणी भोळा भाव म्हणेल.. तर कोणी आणखी काही म्हणेल. पण, ही वारी तन-मनात प्रचंड ऊर्जा निर्माण करणारी आणि समाधानाने जगण्याची प्रेरणा देणारी, सकारात्मकता निर्माण करणारी असते. 

-दादासाहेब येंधे

पंढरीची वारी म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा जणू झराच. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोक हे वारीची उपासना करतात. वारी ही महाराष्ट्राची महाउपासना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाहून किमान एकजण तरी पायी वारीला जातोच. म्हणून दुर्गाबाई भागवत यांनी महाराष्ट्राची व्याख्या करताना 'ज्या राज्यात लोक पंढरीच्या वारीला जातात त्या राज्याला महाराष्ट्र म्हटले जाते' असे म्हटले आहे.

तिथीला कोणत्याही निमंत्रण-आमंत्रणाशिवाय लाखो लोक आळंदी, देहूला जमतात. संतांच्या पालख्या अंगावर घेऊन नाचत-गात पंढरपूरला जातात. देवाबरोबरच संतांचाही गजर करतात. कसलीही अपेक्षा न बाळगता लाखो वारकरी एकत्र येतात. 

आषाढी वारीला कोणी भक्तीभाव म्हणेल,  कोणी भोळा भाव म्हणेल.. तर कोणी आणखी काही म्हणेल. पण, ही वारी तन-मनात प्रचंड ऊर्जा निर्माण करणारी आणि समाधानाने जगण्याची प्रेरणा देणारी, सकारात्मकता निर्माण करणारी असते. खरेतर प्रेरणा ही व्यक्ती आणि तिची परिस्थिती यांच्या अंतप्रक्रियेतून निर्माण होणारा घटक. 

आयुष्यात येणारे काही प्रसंग वा घटना तसेच काही शक्ती माणसाला जगण्यासाठी सतत प्रेरणा देत असतात. ही सकारात्मक शक्ती वा ऊर्जा आपल्याला अध्यात्मातून, नामस्मरणातून तसेच देवदर्शनातून मिळते. त्या दृष्टीने विचार करायचा तर वारी ही आपल्याला अशीच प्रचंड ऊर्जा देणारी आणि सकारात्मकतेने भरून टाकणारी आहे. त्यामुळे आयुष्याच्या वाटचालीत येणारी आव्हाने, कटू प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. 'हेही दिवस जातील' हा आत्मविश्वास आपल्यात दृढ होतो. आहे त्या परिस्थितीत आनंदी, समाधानी राहण्याची प्रेरणा वारीमुळे आपल्याला मिळते. संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून जीवनाविषयी दिलेला संदेशही जाणून घेता येतो आणि तो आत्मसात करता येतो.

पंढरपुरात एक विठ्ठलाची मूर्ती आहे. त्या पांडुरंगाच्या दिशेने राज्यभरातील सर्व जाती धर्माचे लोक लाखोंच्या संख्येने चालत जातात. वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्माला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. वारीमुळे द्वेष, अहंकार बाजूला सरला जातो. अंतःकरण शुद्ध होते. वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय जगात कुठेच नाही. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने वारी करायलाच हवी...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या