Ticker

10/recent/ticker-posts

पावसाळी सहल होऊ नये सजा...

अतिउत्साही पर्यटनाचे बळी

-दादासाहेब येंधे

पाऊस सुरू झाला की सह्याद्रीचे डोंगरकडे, धबधबे गडकोट किल्ले या ठिकाणी पर्यटकांचा पूर आलेला दिसून येतो. या ठिकाणी असलेले धोके माहिती करून घेणे खूप आवश्यक असते. कारण येथील निसरड्या वाटा, दाट धुके, अचानक येणारा मोठा पाऊस आणि त्यामुळे दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले यापैकी कोणत्याही ठिकाणी आणि प्रसंगी कसलेही वेडे धाडस करू नये. त्यामुळे पावसाळी पर्यटनाची मजा सजा होऊ शकते आणि ते जीवावरही बेतू शकते.

अलीकडच्या काळात मुंबई, पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागात पावसाळी सहलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत झाले. पावसाळी ट्रेकिंग तरुणाईला भुरळ घालत आहे. नेहमीच्या कार्यालयीन कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ काढून अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात आपली सुट्टी व्यतीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच शहरवासीयांची पावले निसर्गाकडे वळू लागली आहेत. कोणी माळशेज घाटातील धबधब्यावर जात आहे, तर कोणी माहुली किल्ला सर करत आहे. तर कोणी गोरखगडावर चढाई करत आहे. कित्येकजण कर्जतच्या आसपासच्या धबधब्यांवर कुटुंबासह जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. कुणी पनवेलहून तर कोणी कर्जतहून माथेरान हिल स्टेशन गाठत आहे. काही पुणेकरच नव्हे तर मुंबईकर सुद्धा राजमाची, ताम्हणी घाट, महाबळेश्वर, पावनखिंडीपर्यंत भटकंती करू लागले आहेत. केवळ लोणावळ्याच्या घाटातच नव्हे तर आडमार्गावरील अरुंद रस्त्यावरील पर्यटकांच्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे अनुभव प्रत्येक पर्यटकाला येऊ लागले आहेत.

लोणावळ्याच्या आसपासच्या गड किल्ल्यांवर पर्यटकांच्या चंगराचेंगरीचे प्रकार घडू लागले आहेत. लोणावळा शहरात पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण करता करता पोलिसांची प्रत्येक पावसाळ्यात चांगली दमचक होत आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावर तर दरवर्षी पर्यटकांचे विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना बऱ्याचदा पावसाआज तीव्रता, वाऱ्याचा वेग, वाढत्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे कित्येक पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकून पडत आहेत. काहीजण जंगलात भटकंती करताना वाट चुकत आहेत, काहीजण धबधब्यांवर भिजण्याचा आनंद लुटत असताना तोल जाऊन खाली पडत आहेत. पावसात समुद्र, नदी, धरण अथवा तलावांमध्ये पोहायला जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अति उत्साहाच्या भरात आपला जीव गमावून बसत आहेत. मुंबईच्या मोरवे येथील समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या पाच पैकी तीन जण गेल्या वर्षी मृत्यूमुखी पडले होते. जव्हारच्या दाभोसे येथील धबधब्यात बुडणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला होता. तर नुकतेच काही दिवसापूर्वी लोणावळा येथे एकाच कुटुंबातील १० जण पावसाच्या पुरात वाहून जाऊन मृत्युमुखी पडल्याची घटना ताजीच आहे. त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.

व्हिडिओ पहा...👇


पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना अनेकजण जीवानिशी जात आहेत. तर कित्येकजण जायबंदी होत आहेत. यात तरुण वर्गाचे प्रमाण मोठे आहे. आपल्या कुटुंबीयांचा आधारवड बनलेली कर्तबगार मुले छोट्याशा चुकीने पाय घसरून दरीत कोसळत आहेत. सेल्फीच्या नादात कड्यावरून पडत आहेत. अति उत्साह हासुद्धा अनेकांच्या अंगलट येत आहे. काही पर्यटक दारू पिऊन धिंगाणा करीत असल्याचेही पोलिसांना आढळून येत आहे.

पावसाळ्यातील पर्यटन, गिर्यारोहण या संदर्भात तज्ञ गिर्यारोहक, सहल आयोजक यांच्याकडून कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. तसेच पाण्यात, डबक्यात उडी मारताना अपघातांचे धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल होऊनही पर्यटक सहलीची मजा लुटताना स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करत नाहीत असेच दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे काम स्थानिक प्रशासनाने करणे गरजेचे असले तरी नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगत पावसाळी पर्यटन करणे योग्य ठरेल.

पावसाळी पिकनिक, सहलीला गेल्यावर धबधब्याच्या डोहात उडी मारणे आनंददायी असते खरे पण; ते तितकेच धोकादायकही ठरू शकते. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच लहान-मोठे दगडखाली येऊ शकतात. ते शरीराला इजा करू शकतात. शिवाय धबधब्याचे पाणी वेगाने खाली पडत असल्याने डोहात भवरा तयार झालेला असतो. त्यातून बाहेर पडणे पट्टीच्या पोहणाऱ्यालाही अवघड असते. तसेच पाण्याच्या प्रवाहाभोवतीचा भाग निसरडा असतो. त्यावर घसरून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात डोंगर उतारावरील वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून लहान मोठे दगड खाली येत असतात. अशा वाटेवरून चालत असताना काळजी घ्यावी. तसेच पावसाळ्यात शक्यतो डोंगरवाट निवडू नये. पावसाळी पर्यटन जीवघेणे नव्हे तर आनंददायी व्हावे यासाठी प्रत्येकाने स्वतःचे व त्याच्या सोबतच्या व्यक्तींची काळजी घेतली तर संभाव्य अपघात निश्चित टाळता येतील म्हणून पावसाळी पर्यटन जपून करण्याची नितांत गरज आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या