Ticker

10/recent/ticker-posts

पावसाळ्यात रानभाज्या खा अन निरोगी राहा

 “पौष्टिक खा, निरोगी राहा” असं वारंवार सांगितलं जातं. अशा वेळी या रानभाज्या प्रत्येकासाठी हेल्थ टॉनिकच

पावसाळ्याच्या दिवसात बाजारात फेरफटका मारल्यास आपल्याला विविध रंगांच्या, प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. डोंगर उतारावर, नदी किनाऱ्यावर, ओढा-विहीर तसंच नदी परिसरात, रानवाटांवर, कधी शेताच्या बांधावर, तर कधी घरामागच्या परसात या भाज्या आपसूकच उगवतात, तेही रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापराशिवाय. फास्टफूड- जंकफूड खाणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढणाऱ्या जमान्यात “पौष्टिक खा, निरोगी राहा” असं वारंवार सांगितलं जातं. अशा वेळी या रानभाज्या प्रत्येकासाठी हेल्थ टॉनिकच ठरत आहेत. पावसाळ्यात निसर्गाची विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात. या रूपांपैकीच एक म्हणजे हिरव्या रंगाच्या विविध छटा असणाऱ्या रानभाज्या. या रानभाज्यांचं वैशिष्टयं म्हणजे त्या रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापराशिवाय आपोआप उगवतात. त्यामुळे त्या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मात दुपटीने वाढ होते. परिणामी या रानभाज्या विविध आजारांवर, विकारांवर गुणकारी ठरतात. पोकळा, केनी, मायाळू, मोहाची फुलं, राजगिरा, आपट्याच्या पानांसारखी पण मऊ लुसलुशीत कोरलाची पानं, गवताप्रमाणे दिसणारी फोडशी, चिंचेच्या पानांप्रमाणे दिसणारा कोवळ्या पानांचा खुरासन, तेलपट, शेवळी, रानटी माठ, लोत, तोरणा, कोरळ, नारणवेल, घालवेल, धोरता, कुंडा, दिंडा, रानमाठ, काटेमाठ, हिरवामाठ यांसारख्या भाज्या भरपूर प्रमाणात खाण्याचा क्रतू म्हणजे पावसाळा. रानभाज्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रासायनिक खतविरहित असल्यामुळे उपवासालाही खाता येतात. मांसाहारी मंडळी या भाज्यांमध्ये ओली किंवा सुकी कोळंबी, तिसरे, सुके बोंबील घालूनही भाज्या बनवतात. रानभाज्यांमध्ये असणाऱ्या तंतुमय (फायबर) घटकांमुळे पावसात मंदावलेली पचनक्रिया गतिमान होते. हेल्थ टॉनिक किंवा आरोग्यासाठी गुटी ठरलेल्या अशा महत्त्वाच्या रानभाज्यांची ही ओळख :-

टाकळा : महाराष्ट्राच्या काही भागांत खासकरून कोकणात ही भाजी टायकळा किंवा टाकळा म्हणून ओळखली जाते टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. कारण कोवळ्या पानांची भाजी पचायला हलकी असते आणि ती तिन्ही दोष कमी करते. रक्‍तवात, रक्‍तपित्त यांसारखे रक्‍ताचे आजार, तसंच नायटा रोगातही ही भाजी आवर्जून खातात. पावसाळ्यात होणारा खोकला, शरीराला सुटणारी खाज, पोटात जंत होणं, दम लागणं याही त्रासात ही भाजी
जरूर खावी.


कुटू : कांदा-लसूण घालून केलेली कुडूची भाजी पोटासाठी सारक ठरते. कुर्डूच्या भाजीत लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे गरोदर स्त्रिया, वाढत्या वयातील मुली, महिला यांनी ती भाजी आवर्जून खावी. कु्डूची फुलं, तसंच बियांची चटणी लघवीच्या विकारांवर औषधी ठरते.


कावळा : या भाजीला संस्कृत भाषेत 'कचाय” असंही म्हणतात. ओलं खोबरं घालून बारीक पानं असलेल्या कावळ्याची भाजी करतात. कच्च्या कावळ्यामध्ये गोड दही आणि सैंधव मीठ घालून कोशिंबीरही केली जाते. ही भाजी कफदोषाच्या विविध आजारांवर गुणकारी समजली जाते. 


कंटोळी : कर्टुल, कंटोळं या नावानेही ही भाजी ओळखली जाते. झाडाझुडुपांत वाढलेल्या कंटोळीची भाजी कांदा-खोबऱ्यासहित परतून केली जाते. संधिवाताच्या, तसंच पित्ताच्या विकारांवर ती अत्यंत लाभदायी ठरते.



भोपळ्याचा वेल : भोपळ्याच्या कोवळ्या वेलाची भाजी पानासकट केली जाते. या वेलीत लोह, तसंच विविध क्षारांचं प्रमाण अधिक असतं. भोपळ्याच्या केशरी रंगाच्या फुलांच्या भाजीपासून मिळणारं लोह शरीराला पूरक ठरतं. फुलांची भाजी रक्‍तविकार आणि अंगाचा दाह कमी करण्यास उपयोगी ठरते.


सुरणाचा कोंब : पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत सुरणाचे कंद रुजून येतात. जमिनीच्या वरच्या बाजूला हिरव्या रंगाची लांब पानं येतात. सुरणाच्या पानांच्या. तंतुमय भाजीत लोह आणि क्षार असतात. लाल तिखट, कढीपत्ता, चिंचेचा कोळ, गूळ घालून केलेली सुरणाच्या कोंबाची भाजी अप्रतिम लागते.


सोन अळंबी : अळंबीची खाण्यायोग्य जात म्हणजे सोनअळंबी. प्रथिनं आणि क्षारांचं भरपूर प्रमाण असणाऱ्या सोनअळंबी या आकारानं लहान असल्या तरी पौष्टिक असतात. भाजी, मसाले भात, पुलाव, कढण यांमध्येही अळंबीचा वापर केला जातो.


चवळी : चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी तांदूळजा किंवा तण्डुलीया या नावाने ओळखली जाते. ही भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी विषद्रव्यं म्हणजे टॉक्सिन शरीराबाहेर टाकण्यासाठी चवळीचा उपयोग केला जातो. या भाजीमुळे लघवीस भरपूर होतं.  बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वेलीच्या चवळीच्या टोकांना कोकणात 'बोके' म्हणतात. या टोकांचीही भाजी केली जाते. तंतुमय अशा सारक भाजीची चव काहीशी तुरट असते.
 

मायाळू : पोतकी, उपोदिका ही मायाळू या भाजीची काही नावं. या भाजीच्या लाल रंगाच्या वेलीवर हिरवी पानं उठून दिसतात.  वात आणि पित्तदोषाचा नाश करणारी हि भाजी शुक्रधातूंची वाढ करण्यासाठी उपयुक्त असते. आजारपणात ही भाजी खाल्ली असता तोंडाला चव येते.


शेवगा : या वनस्पतीची पानं, फुलं आणि शेंगांचा भाजीसाठी वापर केला जातो. शेवग्याला लाल, पांढरा आणि निळसर-काळपट अशा रंगाची फुलं येतात. यांपैकी लाल फुलं येणारा शेवगा आरोग्यदृष्ट्या गुणकारी समजला जातो. फुलांची भाजी खाल्ल्याने लघवीस येणारा उग्र दर्प, जडपणा कमी होतो. मात्र जास्त घाम येणं, चक्कर येणं, नाकातून रक्‍त वाहणं, घसा सुकणं अशी लक्षणं दिसतात, तेव्हा फुलांची भाजी खाऊ नये.


अळू : अळूच्या भाजीमध्ये देठी, ओले चणे-मका तसंच भुईमुगाच्या शेंगाचे दाणे, काळे वाटाणे, फणसाच्या आठळ्या घालून अळूचं साग (जे फतफतं, गरगाट म्हणूनही ओळखलं जातं) बनवलं जातं. अळूवड्या ही स्वादिष्ट लागतात. अळूच्या कंदांपासून म्हणजे अरवीपासूनही विविध पदार्थ तयार केले जातात. अळूची पानं, तसंच देठ यांमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ही भाजी सर्वानी आवर्जून खावी. पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होतं. मात्र बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अळूच्या कंदापासून बनवलेली भाजी जपून खावी. 


अंबाडी : अंबाडीची कोवळी पानं आणि फळांची भाजी करण्याचा प्रघात आहे. अळूची भाजी करताना अंबाडीची फळं, तसंच पाल्याचा वापर केला जातो. फळांपासून सासव किंवा कुठल्याही भाजीत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो. फळं वापरण्यापूर्वी ती तासावी लागतात. आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी सांभाळून खावी.
 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या