Ticker

10/recent/ticker-posts

श्रावण प्यावा, श्रावण जगावा...

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे

 -दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

श्रावणामध्ये पाऊस धरणीला अधूनमधून स्नान घालत असतो. या रिमझिंम पावसात भिजलेली ती ओली धरणीं जणू गर्भवती होऊन आपले हिरवे डोहाळेच पुरवते. श्रावणातल्या या पावसात असा हा मातीचा हिरवा उत्सवच साजरा होत असतो.


हिंदू हा कालगणनेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा आसपास श्रवण नक्षत्र असतं, म्हणून या महिन्याचं नाव 'श्रावण" असं पडलं आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूंची व्रतवैकल्यं आणि सण अधिक असल्यामुळे चातुर्मासातील या महिन्याला सर्वाधिक धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असतंच असतं. सोमवारी शिवपूजा आणि अर्धा उपवास करतात. नववधू तांदूळ, तीळ; मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ करून शिवशंकराला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची, तर गुरूवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुक्रवारी गौरी पूजा करतात, सवाष्णीला भोजन देतात आणि त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध-फुटाणे देऊन हळद-कुंकू लावण्याची प्रथा आहे. शनिवारी शनी, मारुती, नरसिंह आणि पिंपळ यांची पूजा करतात. रविवारी सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखतात.


श्रावण महिन्यात बरेच सण येतात. उदाहरणार्थ- शुद्ध पंचमीला “नागपंचमी” म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करून त्यांला दूध देतात. पौर्णिमेला वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरून “नारळी पौर्णिमा” हे नाव पडलं आहे. तर या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, म्हणून या दिवसाला 'रक्षाबंधन' वा 'राखीपौर्णिमा' असंही म्हणतात. श्रावण वद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म झाल्यामुळे तिला “कृष्णाष्टमी” म्हणतात आणि त्या दिवशी रात्री कृष्णजन्मोत्सव साजरा करतात. दुसऱ्या दिवशी बालगोपाळ दहीहंडी बांधून ती फोडण्याचा आनंद घेतात. श्रावणातील अमावास्येला “पिठोरी अमावास्या” असं म्हणतात. कारण या दिवशी संततीप्राप्तीसाठी पिठोरी व्रत केलं जातं. महाराष्ट्रातील काही भागात या दिवशी बैलपोळ्याचा सणही साजरा केला जातो.


रेंगाळणारं ऊन

श्रावणात खरं तर ऊन-पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. रिमझिम पाऊस अंगावर झेलायला मजा वाटते. आभाळात निळे-जांभळे, भुरके ढग जमू लागतात. ते थोडे सावळे झाले की पावसाची सर उन्हाला भेटून जाते. सकाळी सकाळी कोवळं ऊन आणि त्यात पडणारा रिमझिम पाऊस हिरव्यागार गवतावर पडला की, जणू काय पैंजणाचे घुंगरू गवतावर सांडतात. दुपार झाली की, वातावरण थोडं धूसर होतं, कारण ऊन पश्चिमेला आळशासारखं रेंगाळतं. त्या सोनेरी उन्हात श्रावणातील एखादी चंदेरी सर अचानक नाचून जाते. श्रावणातल्या पावसाचं सुंदर वर्णन बालकवींनी आपल्या काव्यात अतिशय रेखीवपणे केलं आहे, ते म्हणतात-

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे...


श्रावणाला गंधाभिषेक

श्रावणातल्या पावसात मातीचा हिरवा उत्सव साजरा होत असतो. पाऊस धरणीला अधून मधून स्नान घालत असतो आणि मग रिमझिम पावसात भिजलेली ती ओली धरणी जणू गर्भवती होऊन आपले हिरवे डोहाळे पुरवते, याचा प्रत्यय घडतो. पशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत असतात. म्हणून बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. अशा वेळी पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते, तर कधी ऊन येऊन जातं. ते लपाछपी खेळत असताना कधी उन्हात पाऊस 'पडतो, तर कधी पावसात ऊन पडतं. पाऊस वेडा आहे म्हणून किंवा आषाढात तो माणसाला झोडपतो म्हणून निसर्ग श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधीत असावा. श्रावणी थेंबांच्या आरशात चंद्रचांदण्या आपलं रूप न्याहाळून घेतात. पहाटे श्रावण स्पर्शाने तरारलेला निशिगंध अर्धोन्मीलित कळ्यांतून सुगंधांची बरसात करत असतो. जाई, जुई, मोगरा, रातराणी, अंजनाचा शुद्ध कोंदणातील मनोहारी गंध वातावरणात उतरतो आणि श्रावणालाच गंधाभिषेक होतो. श्रावणाचा महिना म्हणजे रिमझिम पाऊस! तसंच सणासुदीच्या दिवसांचा महिना असतो. असा श्रावण अंगोपांगी बहरणारा, मनस्वी सुखावणारा, पापण्यात साठवायचा तरी किती? मनाला लागलेलं त्याचं वेड घालवायचं कसं? त्याच्या नुसत्या आगमनाने धुंद फुलणारा मनमोराचा पिसारा मिटवून मिटेल का? अशा प्रश्नांना मनात थारा न देता श्रावण प्यवा नि श्रावण जगावा, साठवता येईल तेवढा साठवून घ्यावा... कारण साठवणीच्या आठवणीवरच त्याची वर्षभर वाट पाहायची असते.








 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या